Headlines

दिशा सालियनच्या वडिलांकडून सीबीआयला पुराव्याचा पेनड्राइव्ह:माझा दिशाशी कधीही संबंध नाही; आदित्य ठाकरेंचा खुलासा




दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची माजी व्यवस्थापक दिशा सालियन हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला पुन्हा एकदा मोठे कायदेशीर व राजकीय वळण मिळाले आहे. दिशाचे वडील सतीश सालियन यांनी पाठवलेल्या ५०० कोटी रुपयांच्या अब्रुनुकसानीच्या नोटिशीला उबाठा नेते आदित्य ठाकरे यांनी २५ पानांचे विस्तृत कायदेशीर उत्तर पाठवून सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. “दिशा सालियन यांच्याशी माझी कधीही भेट किंवा संबंध आलेला नाही; निव्वळ राजकीय हेतूने माझे चारित्र्यहनन केले जात आहे,” असा दावा करत ठाकरे यांनी माफी मागण्यास किंवा कोणतीही नुकसानभरपाई देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. दुसरीकडे, ठाकरे यांच्या भूमिकेला आव्हान देत सतीश सालियन यांनी गुरुवारी मुंबईतील केंद्रीय अन्वेषण विभागाच्या कार्यालयात हजर राहून प्रकरणाशी संबंधित महत्त्वाची माहिती असलेली ८ जीबी क्षमतेची पेनड्राइव्ह तपास अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली. सीबीआयच्या तज्ज्ञांनी दोन पंच साक्षीदारांच्या उपस्थितीत या डेटाची अधिकृत ‘फॉरेन्सिक इमेज’(डिजिटल प्रत) तयार करून मूळ पुरावा सीलबंद केला आहे. सीबीआय तपासात शताब्दी रुग्णालयातील तिसरी महिला रडारवर उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर सीबीआयच्या वरिष्ठ अधिकारी सीमा पाहुजा यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या तपासात नवा धागा समोर आला आहे. प्राथमिक पडताळणीनुसार, ८ जून २०२० च्या रात्री गंभीर अवस्थेत दिशाला कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करताना दोन पुरुषांसोबत एक तिसरी महिलाही उपस्थित असल्याची नोंद आढळली आहे. तत्कालीन हवालदाराच्या जबाबात उल्लेख असलेल्या या अज्ञात महिलेचा शोध सीबीआय घेत आहे. ५०० कोटींची मागणी निराधार; ठाकरे यांच्याकडून नोटीस अमान्य सतीश सालियन यांचे वकील ॲड. नीलेश ओझा यांनी आदित्य ठाकरे व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना नोटीस पाठवून जाहीर माफी आणि ५०० कोटींच्या भरपाईची मागणी केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना ठाकरे यांच्या वकिलांनी स्पष्ट केले की, १६ सप्टेंबर रोजी केलेल्या पोस्टमध्ये सतीश सालियन यांचा कोणताही थेट उल्लेख नव्हता. त्यामुळे अब्रुनुकसानीचा प्रश्नच उद्भवत नाही. जाणीवपूर्वक हा वाद उभा केला जात असून ५०० कोटींची मागणी पूर्णपणे निराधार आहे. ठाकरे खोटे बोलतात, पुरावे समोर आणणार: सतीश सालियन ठाकरेंच्या उत्तरावर तीव्र आक्षेप घेत सतीश सालियन म्हणाले, दिशाशी ओळख नव्हती, तर मग ते न्यायालयात बाजू मांडायला का घाबरत आहेत? तत्कालीन तपास यंत्रणांनी कुणाचा तरी बचाव करण्यासाठीच सत्य दडपले. आमच्याकडे पेनड्राइव्ह, ऑडिओ रेकॉर्डिंग, प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि कॉल डिटेल्स उपलब्ध आहेत. हे सर्व डिजिटल व तांत्रिक पुरावे आम्ही सीबीआयकडे देत आहोत, असेही ते म्हणाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *