Headlines

बादल्या, पाईप, कुंड्यांनी सांगितली देशाची गोष्ट:"पारस''च्या सातही प्लँटमध्ये सामाजिक संदेशांची कलात्मक मांडणी‎




गणेशोत्सव म्हणजे केवळ उत्सव नव्हे, तर सामाजिक प्रबोधनाची संधीही आहे. याच भावनेतून पारस उद्योग समूहाच्या नगर एमआयडीसी आणि भाळवणी येथील सातही प्लँटमध्ये यंदा विविध सामाजिक संदेश देणाऱ्या आकर्षक सजावटी साकारण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे पारस उद्योग समूहात तयार होणाऱ्या विविध उत्पादनांचा कल्पक व कलात्मक वापर करून या सजावटी उभारण्यात आल्या. भाळवणी येथील प्लँटमध्ये ‘पंचतत्त्व’, ‘विविधतेतून एकता’, ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ आणि ‘मेक इन इंडिया’ अशा विविध संकल्पनांवर आधारित सजावट करण्यात आली आहे. तर नगर एमआयडीसीतील प्लँटमध्ये केदारनाथ मंदिराची प्रतिकृती साकारून गणेश मंडप उभारण्यात आला. उत्पादनांचा केवळ वापर न करता त्यातून सामाजिक संदेश प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न या सजावटीतून करण्यात आला. पारस पॉली इंडस्ट्रीजच्या सर्व युनिटमधील कर्मचारी, कंपनीचे संचालक पेमराज बोथरा, संतोष बोथरा व सतीश बोथरा यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्षांपासून वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने गणेशोत्सव साजरा करतात. यंदा घरगुती वापराच्या वस्तू, विविध प्रकारचे पाईप व फिटिंग, रंगीबेरंगी बादल्या, टब, झाडांच्या कुंड्या, ट्रे यांसह कंपनीत तयार होणाऱ्या विविध उत्पादनांचा कलात्मक वापर करण्यात आला आहे. प्लँटहेड गौरव बिहाणी यांनी सांगितले की, पारसच्या पाईप व फिटिंगचा वापर करून इंडिया गेटची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. त्यातून ‘जय जवान, जय किसान’, ‘स्वच्छ भारत अभियान’, ‘हर घर शौचालय’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनांचा संदेश देण्यात आला आहे. महावीर कर्नावट यांनी सांगितले की, ‘विविधतेतून एकता’ या संकल्पनेतून देशाची विविधता आणि एकतेचा संदेश देण्यात आला आहे. घरगुती वापरातील वस्तूंच्या माध्यमातून कारंजे, ठिबक सिंचन तसेच ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेची प्रभावी मांडणी करण्यात आली आहे. वैभव पाटील यांनी सांगितले की, ‘पंचतत्त्व’ संकल्पनेत विविध पाईपचा कल्पक वापर करून पृथ्वी, जल, वायू, अग्नी आणि आकाश या पाच तत्त्वांचे दर्शन घडविण्यात आले आहे. ही सजावट साकारण्यासाठी कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. गोकुळ कलमदाने यांनी नगर एमआयडीसीतील प्लँटमध्ये केदारनाथ मंदिराची आकर्षक प्रतिकृती साकारण्यात आली असून, त्यासाठी पारसच्या विविध उत्पादनांचा वापर केल्याचे सांगितले. या वैशिष्ट्यपूर्ण सजावटी पाहण्यासाठी पारस समूहातील कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक सहकुटुंब भेट देत आहेत. या उपक्रमासाठी पारस ग्रुपचे रौनक, प्रणेश, प्रसन्न, गौरव व रोहन बोथरा बंधू यांचे मार्गदर्शन लाभले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *