Headlines

पुढच्या वर्षी लवकर या..:गणरायाच्या जयघोषाने दुमदुमले शेवगाव शहर




गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात गणेशोत्सवाची शुक्रवारी उत्साहपूर्ण वातावरणात सांगता झाली. शहरातील मुख्य विसर्जन मिरवणुकीत मानाच्या सहा गणपतींचा सहभाग राहिला. ढोल-ताशांचा निनाद, गणेशभक्तांचा उत्साह आणि मंडळांनी सादर केलेल्या विविध देखाव्यांमुळे शहरातील वातावरण गणेशमय झाले होते. शहराची धार्मिक परंपरा जपणाऱ्या पेशवेकालीन जाधव वाड्यातील मानाच्या गणपतीची आरती नायब तहसीलदार संजय गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक मोहन बोरसे, नगरसेवक आशुतोष डहाळे, डॉ. नीरज लांडे, रोहित काथवटे, बंडू रासने, दत्तात्रय फुंदे उपस्थित होते. आरतीनंतर मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक मार्गस्थ झाली. विविध मंडळांच्या गणेशभक्तांनी मिरवणुकीत कलाविष्कार सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले. धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून गणेशोत्सवात सामाजिक सलोखा आणि जनजागृतीचा संदेश देण्यात आला. शिवसेनेचे नेते अरुण मुंढे यांनी मुख्य विसर्जन मिरवणुकीतील मानाचे गणपतीचे अध्यक्ष यांचा फेटा बांधून सत्कार केला. पावसाने ओढ दिल्याने तालुक्यावर दुष्काळाचे सावट असतानाही गणेशभक्तीचा उत्साह कायम राहिला. मात्र, काही मंडळांनी नवव्या, दहाव्या व अकराव्या दिवशी गणरायाला निरोप दिला. विसर्जनाच्या आदल्या दिवशी विविध मंडळांनी धार्मिक, सामाजिक आणि जनजागृतीपर देखावे सादर केले. सोशल मीडिया व मोबाइलचा वाढता वापर, मानवता यांसारख्या विषयांवर संदेश देण्यात आला. बाळासाहेब भारदे विद्यालयाच्या जनजागृती अभियानालाही प्रतिसाद मिळाला. मुख्य विसर्जन मिरवणुकीला सायंकाळी चार वाजता सुरुवात झाली. मानाच्या शेवटच्या गणपतीचे रात्री बारा वाजण्याच्या सुमारास विसर्जन करण्यात आले. दरम्यान, गणेशोत्सवाच्या सुरुवातीपासूनच शेवगाव पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले होते. शहरातील प्रमुख चौक, धार्मिक स्थळे तसेच पोलिसांचे फिरते पथकाची विशेष नजर होती. महिलांच्या सुरक्षेसाठी दामिनी पथकाची नियुक्ती करण्यात आली होती. कृत्रिम तलावांत घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन पर्यावरणपूरक विसर्जनाला चालना देण्यासाठी नगरपरिषदेने शहीद भगतसिंग चौक, कोर्ट परिसर आणि खंडोबा नगर येथे कृत्रिम तलाव तयार केले होते. या ठिकाणी अनेक घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. मोठ्या गणेशमूर्तींचे जोहरापूर येथे विसर्जन करण्यात आले. या ठिकाणी नगरपरिषद कर्मचारी व पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *