Headlines

तुला भगवान बाबाची शपथ, पण बजरंग सोनवणेच्या पोराला अडकवाच!:विलास घुले हत्येत वाल्मीक कराडचा जेलमधून कट?; ऑडिओ क्लिप जाहीर करत खासदार सोनवणेंचा राजकीय बॉम्ब




केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले खून प्रकरणाला आता अत्यंत नाट्यमय आणि राजकीय वळण मिळाले आहे. बीडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) खासदार बजरंग सोनवणे यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन एक धक्कादायक ऑडिओ क्लिप जाहीर केली आहे. “तुरुंगात असलेला वाल्मीक कराड हा सुग्रीव कराडला फोन करून ‘तुला भगवानबाबाची आणि मावशीची शपथ आहे, मृतदेह पोलीस ठाण्यात ठेवा, पाण्याच्या टाकीवर चढा, आंदोलने करा, पण काहीही करून बजरंग सोनवणेंच्या मुलाला (सौरभ सोनवणे) या खून प्रकरणात अडकवाच,’ अशा सूचना देत असल्याचा खळबळजनक कट उघडकीस आला आहे,” असा गंभीर आरोप खासदार बजरंग सोनवणे यांनी केला. या संपूर्ण संभाषणाची ऑडिओ क्लिप पत्रकारांना ऐकवत सोनवणे यांनी बीड जिल्हा कारागृह प्रशासन, केज पोलीस ठाण्यातील काही पोलीस कर्मचारी आणि राजकीय विरोधकांवर थेट हल्ला चढवला. तसेच विनाकारण मुलाचे नाव गोवून बदनामी करणाऱ्या 12 ते 13 जणांवर 500 कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. मृतदेह ठाण्यासमोर ठेवा, टाकीवर चढा; पण मुलावर गुन्हा दाखल कराच! पत्रकार परिषदेत ऐकवण्यात आलेल्या कथित ऑडिओ क्लिपचा हवाला देत बजरंग सोनवणे म्हणाले, “वाल्मीक कराड आणि सुग्रीव कराड यांच्यातील हे थेट संभाषण आहे. फोनवर वाल्मीक कराड सुग्रीव कराडला शिवीगाळ करत ‘बजरंग सोनवणेंच्या पोरावर कसल्याही परिस्थितीत गुन्हा दाखल झालाच पाहिजे, यासाठी मृताचा देह पोलीस ठाण्यात न्या, पाण्याच्या टाकीवर चढा, रास्ता रोको करा’ अशा सूचना देत असल्याचे स्पष्ट ऐकू येत आहे. समोरून सुग्रीव कराड ‘जी अण्णा, जी अण्णा’ म्हणत होकार भरत होता.” कट कोणाचा? “विलास घुले यांच्या हत्येचा कट माझ्या मुलाने रचला होता की माझ्या मुलाला या प्रकरणात अडकवण्याचा कट वाल्मीक कराड आणि टोळीने रचला होता, हे या क्लिपवरून सिद्ध होते. मी स्वतः बीडच्या पोलीस अधीक्षकांना (SP) हे सर्व पुरावे अधिकृत पत्रासह देणार असून या दोघांवर तातडीने गुन्हे दाखल करण्याची मागणी करणार आहे.” विलास घुले हत्या अनैतिक संबंधांतून; मूळ प्रकरण दाबण्याचा प्रयत्न घुले खून प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर प्रकाश टाकताना खासदार सोनवणे म्हणाले, “विलास घुले यांच्यावर 20 जून रोजी हल्ला झाला आणि 21 जूनला उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 21 तारखेला नोंदवण्यात आलेल्या मूळ एफआयआरमध्ये माझ्या मुलाचे कुठेही नाव नव्हते. पोलिसांनी सुरुवातीलाच स्पष्ट केले होते की सौरभ सोनवणेचा यात सहभाग नाही. मग राजकीय दबावातून पुरवणी जबाबात त्याचे नाव कोणी आणि का गोवले? याचे उत्तर पोलीस अधीक्षकांनी दिले पाहिजे.” अनैतिक संबंधांतून घटना? “या प्रकरणाचे मूळ कारण एका महिलेवरील अत्याचार आणि अनैतिक संबंध हे आहे. मृत विलास घुले यांच्याशी त्यांचा सख्खा भाऊ रमेश घुले गेल्या 6 महिन्यांपासून बोलतही नव्हता. या प्रकरणात खोटी ॲट्रॉसिटी दाखल करण्यात आली होती, हेही पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. यात जाणीवपूर्वक जातीय रंग भरून मला आणि माझ्या कुटुंबाला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला.” कारागृह प्रशासनावर आरोप- 32 फोन, आयफोन आणि संन्याशाला फाशी कारागृहातील अनागोंदी कारभारावर सोनवणे यांनी अत्यंत गंभीर आरोप केले. “वाल्मीक कराड तुरुंगात 32 मोबाईल फोन वापरतो आणि त्यातील 20 फोनवरून तो बाहेर अनेकांशी बोलल्याचे भक्कम पुरावे माझ्याकडे आहेत. ही सर्व सिमकार्डे इतर गुन्हेगारांच्या नावावर आहेत. या प्रकरणातील कॉल रेकॉर्ड्स फॉरेन्सिक लॅबमध्ये (FSL) पाठवून आवाजाची तपासणी करावी.” कर्मचाऱ्यांवर थातूरमातूर कारवाई “कारागृह प्रशासनाने दोन दिवसांपूर्वी केलेली कारवाई म्हणजे ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’ देण्याचा प्रकार आहे. जेलमधील बॅरेक क्रमांक 9 आणि चांदणे यांच्या रूमला सीसीटीव्ही का नाहीत? जेल कर्मचाऱ्यांकडे अचानक महागडे आयफोन कुठून आले? जेलमधील डॉ. पारखे यांना तत्काळ हटवले पाहिजे. केज पोलीस ठाण्यातील नागरगोजे आणि गित्ते नावाचे कर्मचारी आरोपींशी लागेबांधे ठेवून काम करत होते. सुग्रीव कराड हा कर्नाटक पोलिसांना वॉन्टेड असतानाही तो उजळ माथ्याने फिरत होता,” असा आरोपही त्यांनी केला. “मी धनंजय मुंडेंसाठी दोनदा रडलो, पण…” परळीच्या राजकीय संघर्षावर आणि पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधताना सोनवणे म्हणाले, “माझ्या कारखान्याचे भूमिपूजन धनंजय मुंडे यांच्या हस्ते झाले होते. त्यांच्यासाठी मी दोन वेळा रडलो आहे. त्यांना विधान परिषदेची आमदारकी मिळावी म्हणून मी दिवंगत गोपीनाथ मुंडे साहेबांचे पाय धरले होते. 2014च्या निवडणुकीत मी त्यांना आर्थिक मदत केली होती, तर मला खासदार करण्यासाठीही त्यांनी मदत केली होती. मात्र, आज ज्या पद्धतीने माझ्या कुटुंबावर चिखलफेक केली जात आहे, ते सहन केले जाणार नाही.” 500 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार “मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असता, त्यांनीही हे प्रकरण चुकीचे असल्याचे मान्य केले होते. एका निष्पाप मुलाला पोलीस ठाण्याची पायरी चढावी लागली, या वेदना एका पित्यालाच ठाऊक असतात. बजरंग सोनवणे कधीही चोरी किंवा लफडे करत नाही. ज्या 12 ते 13 लोकांनी मला आणि माझ्या मुलाला या प्रकरणात गोवून बदनामी केली, त्या सर्वांवर मी 500 कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहे,” असा इशारा देत सोनवणे यांनी आपल्याकडे अजूनही व्हिडिओ आणि ऑडिओ पुरावे शिल्लक असल्याचे स्पष्ट केले. —————————— हेही वाचा… आमचे शहर म्हणजे ‘जैनांची नगरी’ अन् ‘मिनी राजस्थान- मेहता:मिरा भाईंदर कोळी, आगरी अन् मराठी माणसांचं, कुठली मस्ती आलीये?- मनसे मिरा भाईंदर शहराच्या सांस्कृतिक आणि सामाजिक ओळखीवरून सुरू असलेला राजकीय वाद आता तापला आहे. ठाण्यात झालेल्या एका जैन समुदायाच्या कार्यक्रमात भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी मिरा भाईंदरचा उल्लेख ‘जैनांची नगरी’ आणि ‘मिनी राजस्थान’ असा केला होता. या वक्तव्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अत्यंत आक्रमक भूमिका घेत मेहतांवर कडाडून टीका केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *