![]()
हिंगोली जिल्हा परिषदेच्या वतीने एक दिन एक घंटा एक साथ महाश्रमदान या उपक्रमांतर्गत गुरुवारी ता . १ नरसी नामदेव येथे कयाधू नदीचा परिसर स्वच्छ करण्यात आला. यावेळी प्रशासनाचे अधिकारी कर्मचाऱ्यांसह गावकऱ्यांची उपस्थिती होती स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२६ दरम्यान राबविण्यात येत असलेल्या “स्वच्छता ही सेवा” मोहिमेंतर्गत हिंगोली जिल्ह्यात विविध ठिकाणी स्वच्छता कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षीच्या मोहिमेची संकल्पना “स्वच्छतेमध्ये सहभाग, स्वच्छ भारत – विकसित भारत” अशी असून या मोहिमेचाच एक भाग म्हणून गुरुवारी ता १ रोजी “एक दिन, एक घंटा, एक साथ” या श्रमदान मोहिमेचे आयोजन हिंगोली जिल्ह्यातील सर्व ५६५ ग्रामपंचायतीमध्ये करण्यात आले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी केशव गड्डापोड, समृद्धी दिवाणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविले जात आहे. दरम्यान आज हिंगोली जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन, धार्मिक व अध्यात्मिक स्थळ असलेल्या नरसी नामदेव येथे श्री संत शिरोमणी नामदेव महाराज मंदिर परिसर आणि कयाधू नदी घाट परिसरात विशेष स्वच्छता व श्रमदान मोहीम राबविण्यात आली. सदर ठिकाणी मंदिर परिसर, नदी घाट, गावातील सार्वजनिक ठिकाणे या ठिकाणी श्रमदानातून साफसफाई करण्यात आली. या अभियानात उपमुख्य कार्यकारी अधिकारी समृद्धी दिवाणे, विस्तार अधिकारी विष्णू भोजे, संत नामदेव संस्थानचे उपाध्यक्ष भिकाजी कीर्तनकार, ग्रामविकास अधिकारी डी. एन. इंगोले, पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे तज्ञ सल्लागार संवाद तज्ञ शामसुंदर मस्के, राजेंद्र सरकटे, रघुनाथ कोरडे, नरसी (नामदेव) मंदिर विश्वस्त मंडळ, पंचायत समिती कर्मचारी प्रमोद मोहिते, संतोष चव्हाण, आसिफ खान पठाण, सरपंच, ज्येष्ठ नागरिक, युवक, ग्रामपंचायत सफाई कर्मचारी, स्काऊट गाईडचे शाळेतील विद्यार्थी व गावातील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात उस्फूर्तपणे सहभाग घेतला. या परिसरात प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी व गावकऱ्यांच्या मदतीने परिसर स्वच्छ करण्यात आला. अवघ्या एक तासात सुमारे एक ट्रॅक्टर कचरा नदीपात्राच्या परिसरातून काढण्यात आला. यापुढेही स्वच्छतेचे अभियान राबविले जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले.
Source link
हिंगोली जिल्ह्यात "एक दिन, एक घंटा, एक साथ" महा-श्रमदान उत्साहात:नरसी नामदेव येथील परिसरात केली स्वछता