Headlines

उरलेले नक्षलवादी सीजेपीच्या आंदोलनामागे!:देशात बांगलादेशसारखी अराजकता माजवण्याचा कट, परकीय फंडिंगचा संशय; भाजप आमदार परिणय फुकेंचा आरोप




केंद्रीय निवडणूक आयोगातील कथित गैरव्यवहार आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी कॉकरोच जनता पार्टीने (CJP) आज 2 ऑक्टोबर (गांधी जयंती) रोजी मुंबईतील ऐतिहासिक शिवाजी पार्कवर पुकारलेल्या ‘जेल भरो’ आंदोलनावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठा राजकीय संघर्ष पेटला आहे. या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारलेली असतानाच, भाजपचे आमदार परिणय फुके यांनी या आंदोलनावर अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप केले आहेत. “गेल्या काही वर्षांत सुरक्षा दलांनी जंगलात घुसून नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. मात्र, त्यातून जे नक्षलवादी लपून वाचले आहेत, तेच आता सीजेपीच्या आंदोलनाच्या पाठीशी राहून देशात अराजकता पसरवण्याचा डाव रचत आहेत,” असा स्फोटक दावा परिणय फुके यांनी केला आहे. तसेच या आंदोलनाला परदेशातून मोठ्या प्रमाणावर फंडिंग मिळत असून, भारतात बांगलादेशसारखी अराजकता निर्माण करण्याचा हा पद्धतशीर कट असल्याचा आरोपही त्यांनी केला. डाव्या संघटना आणि लपलेल्या नक्षलवाद्यांचा पाठिंबा? पत्रकारांशी बोलताना भाजप आमदार परिणय फुके म्हणाले, “सुरक्षा यंत्रणांच्या कारवाईतून वाचलेले नक्षलवादी आणि डाव्या संघटना आज या आंदोलनामागे सक्रिय आहेत. हे आंदोलन शांततेचे नसून त्या आडून देशविरोधी वातावरण तयार केले जात आहे. केंद्रीय आणि राज्य गुप्तचर यंत्रणा या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत, त्यामुळे सरकार योग्य वेळी कठोर कायदेशीर पाऊल उचलेल.” “आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणे हा लोकशाहीतील अधिकार आहे; परंतु सीजेपीच्या राजकीय अजेंड्यामध्ये डावे विचार आणि नक्षल समर्थक घटक घुसले आहेत. अशा आंदोलनात सहभागी होऊन देशातील निरपराध तरुणांनी आपले शैक्षणिक आणि वैयक्तिक भविष्य धोक्यात घालू नये. कोणाच्याही चिथावणीला बळी पडून देशविरोधी कृत्यांमध्ये सहभागी होऊ नका,” असे आवाहन फुके यांनी तरुणांना केले. सीजेपीला फॉरेन फंडिंग; बांगलादेशसारखी स्थिती निर्माण करण्याचा डाव आंदोलनामागील आर्थिक स्त्रोतांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना फुके म्हणाले, “सुरुवातीला सीजेपीने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लढत असल्याचे भासवले. मात्र, आता त्यांचा छुपा राजकीय अजेंडा उघड झाला आहे. या आंदोलनाला फॉरेन फंडिंग मिळत असून, या पैशांच्या जोरावर देशात अराजकता आणि अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.” “अभिजीत दिपके हे मूळचे आम आदमी पार्टीचे (AAP) कार्यकर्ते आहेत. ते नुकतेच अमेरिकेत जाऊन आले; तिथे जाऊन ते कोणती फंडिंग घेऊन आले आणि काय मंत्र शिकून आले, याची माहिती समोर आली पाहिजे. बांगलादेशात ज्याप्रमाणे सत्ता उलथवून टाकण्यासाठी अराजकता माजवली गेली, तसाच प्रयोग भारतात करण्याचा हा डाव आहे. केंद्र आणि राज्य सरकारने या फॉरेन फंडिंगची तत्काळ चौकशी करावी.” मनोज जरांगेंची कॉपी करण्याचा प्रयत्न; विरोध फक्त भाजपशासित राज्यांतच का? अभिजीत दिपके यांच्या कार्यपद्धतीवर टीका करताना फुके म्हणाले, “मनोज जरांगे ज्याप्रमाणे वारंवार मुंबईत येऊन आंदोलनाची भाषा करायचे, अगदी तसेच दिपकेही जरांगेंची कॉपी करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. शिवाजी पार्क हे सायलंट झोन असून तिथे ठराविक कार्यक्रमांनाच कायदेशीर परवानगी असते, हे माहीत असतानाही हा हट्ट धरला जात आहे.” “सीजेपीचा अजेंडा पूर्णपणे भाजपविरोधी आहे. ते केवळ भाजपशासित राज्यांमध्येच आंदोलने का करत आहेत? पंजाब किंवा झारखंडसारख्या विरोधी पक्षांच्या राज्यांत ते आंदोलन का करत नाहीत? जर त्यांना राजकारणच करायचे असेल, तर त्यांनी उघडपणे राजकीय पक्ष स्थापन करून मैदानात उतरावे; विद्यार्थ्यांची ढाल करू नये.” “एका वर्तमानपत्रात आलेल्या अपुऱ्या माहितीच्या आधारे १३ कोटी मतदार वगळल्याचा कांगावा केला जात आहे. प्रत्यक्ष मतदार पडताळणी मोहीम सुरू असताना हे कुठे झोपले होते?” असा सवाल त्यांनी केला. रोहित पवारांनी तालुक्या-तालुक्यात गुंड पोसले! राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांच्यावरही फुके यांनी अत्यंत शेलक्या शब्दांत निशाणा साधला. “रोहित पवारांनी प्रत्येक तालुक्यात फिरून गुंड तयार केले आहेत. त्यांच्या विरोधात कोणी सत्य बोलले किंवा प्रश्न विचारले, की हे गुंड विरोधकांचा आणि माध्यमांचा आवाज दाबण्याचे काम करतात. काल पत्रकारांवर त्यांच्या गुंडांनी केलेला भ्याड हल्ला अत्यंत निषेधार्ह आहे.” संघटनांवर खापर फोडण्याचा उद्योग “स्वतःच्या कार्यकर्त्यांनी पत्रकारांवर हल्ला केल्यानंतर आता रोहित पवार त्या गुंडांचा संबंध अभाविपशी (ABVP) जोडून हात झटकण्याचा आणि दिशाभूल करण्याचा हास्यास्पद प्रयत्न करत आहेत,” असा टोलाही आमदार परिणय फुके यांनी लगावला. मुंबईत 2 ऑक्टोबरच्या ‘जेल भरो’ आंदोलनावरून पोलिसांनी कडक नाकाबंदी केलेली असताना, भाजपच्या या आक्रमक भूमिकेमुळे आणि फॉरेन फंडिंगच्या आरोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापले आहे. ————————————————— हेही वाचा… मुंबईत कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी; शिवाजी पार्कवर कडेकोट बंदोबस्त कॉकरोच जनता पार्टी आज संध्याकाळी 4 वाजल्यापासून मुंबईतील शिवाजी पार्क येथे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करणार आहे. CJPचे संयोजक अभिजीत दीपके यांनी 24 सप्टेंबर रोजी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन ज्ञानेश कुमार हे या देशातील सर्वात मोठे देशद्रोही असल्याचे म्हटले होते. लोकांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेतला जात आहे. मात्र, पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी दिलेली नाही. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *