Headlines

दुष्काळावर 3 दिवसांचे विशेष विधानसभा अधिवेशन बोलवा:सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल- मुलांना रस्त्यावर उतरावे लागणे हे सरकारचे अपयश, रोहित पवारांवरील आरोपांनाही प्रत्युत्तर




“2 ऑक्टोबर हा महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री या भारताच्या थोर सुपुत्रांच्या विचारांचे स्मरण करण्याचा दिवस आहे. मात्र, अशा पवित्र दिवशी राज्यात आणि देशात सर्वसामान्य जनता, शेतकरी आणि तरुण मोठ्या प्रमाणावर आंदोलने करत रस्त्यावर उतरत आहेत. लोकशाही धोक्यात असल्याचे हे अत्यंत चिंताजनक संकेत आहेत. आज आपल्या मुलांनी शाळा, महाविद्यालये किंवा नोकरीवर असणे अपेक्षित असताना त्यांना परीक्षा आणि हक्कासाठी रस्त्यावर आंदोलने करावी लागत आहेत. हे अतिशय दुर्दैवी असून सरकारने यावर गांभीर्याने आत्मचिंतन करण्याची गरज आहे,” असा परखड हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना खासदार सुप्रिया सुळे यांनी एमपीएससी (MPSC) विद्यार्थ्यांचे आंदोलन, राज्यातील भीषण दुष्काळ, रोहित पवारांवर सत्ताधाऱ्यांकडून झालेले आरोप, पत्रकारांवरील हल्ले आणि पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवर सविस्तर भूमिका मांडली. एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन गंभीर; 11 वाजता आंदोलकांची भेट घेणार पुण्यात सुरू असलेल्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर बोलताना त्या म्हणाल्या, “एमपीएससीच्या अध्यक्षांचा राजीनामा घेण्यात यावा आणि परीक्षा पद्धतीतील गोंधळ दूर व्हावा, या प्रमुख मागणीसाठी विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. मुलांच्या नेमक्या काय भावना आणि अडचणी आहेत, हे थेट समजून घेण्यासाठी मी स्वतः सकाळी 11 वाजता आंदोलनस्थळी जाऊन त्यांची भेट घेणार आहे. विद्यार्थ्यांच्या या भावना सरकार दरबारी तातडीने मांडल्या पाहिजेत.” “हे वय मुलांचे आंदोलनात वेळ घालवण्याचे नाही, तर नोकरीवर रुजू होण्याचे आहे. मात्र सातत्याने पेपर फुटणे आणि परीक्षांचे वेळापत्रक कोलमडणे यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. ही परिस्थिती अत्यंत चीड आणणारी आहे.” दुष्काळावर 3 दिवसांचे विशेष विधानसभा अधिवेशन बोलवा राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर त्यांनी सरकारकडे सर्वपक्षीय चर्चेची मागणी केली. “ज्याप्रमाणे केंद्रात महत्त्वाच्या आणि राष्ट्रीय विषयांवर ऑल पार्टी मीटिंग बोलावली जाते, तसाच गंभीर विचार राज्य सरकारने दुष्काळाच्या बाबतीत केला पाहिजे. यासाठी राज्य शासनाने विधानसभेचे किमान तीन दिवसांचे विशेष चर्चासत्र अथवा अधिवेशन बोलवावे. सर्व आमदारांचा आणि लोकप्रतिनिधींचा फीडबॅक घेऊन शेतकऱ्यांना तातडीने दिलासा द्यावा, कारण ग्रामीण भागातील परिस्थिती अतिशय बिकट आहे.” रोहित पवारांवर ‘अर्बन नक्षल’चा आरोप हास्यास्पद रोहित पवार यांच्या उपस्थितीनंतर आंदोलन पुन्हा भडकल्याचा आणि ते ‘अर्बन नक्षल’ तयार करत असल्याचा आरोप भाजपकडून केला जात असल्याबाबत विचारले असता सुप्रिया सुळे यांनी रोखठोक प्रत्युत्तर दिले. “भाजपच्या मित्रांना विरोधकांवर आरोप करण्यासाठी नवनवीन शब्द शोधून काढण्याची सवयच लागली आहे. इथे कोणताही ‘अर्बन नक्षल’चा प्रकार नसून, मुले केवळ आपल्या पोटापाण्याच्या प्रश्नासाठी आणि गुणवत्तेच्या (Merit) जोरावर हक्काचा न्याय मागत आहेत.” 200 आमदारांच्या सरकारला चर्चेची भीती का? “सभागृहात 200 हून अधिक आमदारांचे पाठबळ असलेल्या या सरकारला विद्यार्थ्यांशी संवाद साधायला अडचण काय आहे? लोकशाहीत बैठकीत काही तोडगा निघाला तरी पुढील टप्प्यांवर सतत चर्चा होत राहिली पाहिजे. विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून हा तिढा कायमचा सोडवला पाहिजे.” पुण्यातील कायदा-सुव्यवस्था आणि पत्रकारांवरील हल्ल्यावर संताप पत्रकारांवरील हल्ल्याचा तीव्र निषेध करताना त्यांनी पुण्यातील गुन्हेगारीचा अधिकृत डेटा समोर ठेवला. “कुठल्याही पत्रकाराला किंवा सामान्य भारतीय नागरिकाला मारहाण होणे हे पूर्णपणे चुकीचे आणि अयोग्यच आहे. मात्र, या प्रकरणात नोंदवलेल्या एफआयआरमध्ये (FIR) ‘पत्रकार संरक्षण कायद्या’चे कलम का लावले गेले नाही? पोलीस यंत्रणा या घटनेची पुरेशी गांभीर्याने दखल घेत नसल्याचे स्पष्ट दिसत आहे.” पुण्यात गुन्हेगारीत वाढ; केंद्राच्या अहवालाचा दाखला “पुण्यातील वाढती गुन्हेगारी, कोयता गँगची दहशत आणि महिलांवरील अत्याचारांच्या घटना अत्यंत चिंताजनक आहेत. हा डेटा माझा नसून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या केंद्रीय गृह मंत्रालयाचा (NCRB) अधिकृत डेटा आहे. त्या अहवालानुसार पुणे हे राज्यातील गुन्हेगारीत अव्वल क्रमांकावर पोहोचले आहे. पोलिसांच्या पाठीशी असलेल्या राजकीय दबावामुळेच आज सामान्य जनतेला आणि पत्रकारांनाही संरक्षण मिळणे कठीण झाले आहे,” असा घणाघात सुप्रिया सुळे यांनी केला. —————————————— हेही वाचा… MPSC पेपरफुटी प्रकरण: अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीवर विद्यार्थी ठाम, पुण्यात रोहित पवारांचा विद्यार्थ्यांसोबत रात्रभर ठिय्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक (Drug Inspector) भरती परीक्षेत उघडकीस आलेल्या पेपरफुटीच्या प्रकारामुळे राज्यभरातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून आयोगाचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, या मुख्य मागणीसाठी विद्यार्थ्यांनी पुण्यातील एस. एम. जोशी पुलावर गुरुवारी सायंकाळपासून बेमुदत ठिय्या आंदोलन पुकारले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या आंदोलनाला थेट पाठिंबा देत विद्यार्थ्यांसोबत रात्रभर पुलावरच ठिय्या दिला. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *