Headlines

Pradeep Purnekar Murder Case; 100 CCTV Scanned


ठाण्यातील मानपाडा परिसरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या कार्यालयात घुसून झालेल्या निर्घृण हत्याकांडाने संपूर्ण ठाणे शहर हादरले आहे. राजकीय वैमनस्यातून घडलेल्या या थरारक गुन्ह्याची उकल करण्यासाठी ठाणे पोलि

.

कार्यालयात घुसून गोळ्या झाडल्या, कोयत्याने वार; ठाणे हादरले

मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास मानपाडा येथील गणेशनगर भागात प्रदीप पूर्णेकर हे आपल्या जनसंपर्क कार्यालयात बसलेले असताना अचानक पाच हल्लेखोर आत घुसले. हल्लेखोरांनी पूर्णेकर यांच्यावर अत्यंत जवळून गोळीबार केला आणि त्यानंतर धारदार कोयत्याने सपासप वार करून त्यांची निघृण हत्या केली. हल्ला इतका भीषण होता की पूर्णेकर यांचा जागीच तडफडून मृत्यू झाला.

या घटनेनंतर संपूर्ण ठाण्यातील ठाकरे गटाचे शिवसैनिक, कुटुंबीय आणि स्थानिक नागरिक रस्त्यावर उतरले होते. “जोपर्यंत मुख्य सूत्रधारांना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही आणि अंत्यसंस्कार करणार नाही,” असा आक्रमक पवित्रा पूर्णेकर कुटुंबीयांनी पोलीस ठाण्याबाहेर घेतला होता.

100 हून अधिक CCTV कॅमेरे तपासले; मित्र, नातेवाईक अन् दुकानदारांचे जबाब

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी व्यापक मोहीम हाती घेतली. हल्लेखोर कोणत्या मार्गाने आले, कोणत्या वाहनांवरून पसार झाले, याचा माग काढण्यासाठी मानपाडा, घोडबंदर रोड आणि ठाण्यातील १०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज रात्रंदिवस तपासण्यात आले.

परिसरातील स्थानिक दुकानदार, व्यावसायिक आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. तसेच, पूर्णेकर यांच्या निकटवर्तीयांची आणि नातेवाईकांचीही चौकशी करून गेल्या काही दिवसांतील त्यांचे वाद किंवा धमक्यांविषयी माहिती गोळा करण्यात आली.

9 पथके तैनात; तिघे गजाआड, पप्या शिंदेसह साथीदारांकडून दुचाकी जप्त

हत्येतील आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी ठाणे पोलिसांनी तत्काळ 9 विशेष पथके स्थापन केली. यात खंडणीविरोधी पथकाची 3 पथके आणि गुन्हे शाखेची 5 हून अधिक पथके मुंबई, ठाणे आणि लगतच्या जिल्ह्यांत ठाण मांडून आहेत. पोलिसांनी आतापर्यंत पप्या शिंदे, निखिल यादव आणि नितेश पवार या तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. ठाणे न्यायालयाने आरोपी निखिल यादव आणि नितेश पवार यांना 8 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

मुख्य आरोपी पप्या शिंदे याची दुचाकी तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या इतर दोन दुचाकी पोलिसांनी शोधून काढून जप्त केल्या आहेत. हत्येचा कट रचताना आणि गुन्हा घडण्यापूर्वी पप्या शिंदेच्या सतत संपर्कात असणाऱ्या ३ महिला आणि २ पुरुष अशा पाच जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. या हत्याकांडात सक्रिय असलेला मुख्य संशयित संतोष कनोजिया उर्फ ‘टल्ली’ आणि त्याचा आणखी एक साथीदार अद्याप फरार असून, पोलीस त्यांच्या मागावर आहेत.

माजी महापौर मीनाक्षी शिंदे व पतीवर थेट आरोप; पुरवणी एफआयआरनंतरच अंत्यसंस्कार

या हत्येला राजकीय संघर्षाची किनार असल्याचे समोर आले आहे. मृत प्रदीप पूर्णेकर यांचे बंधू जयनाथ पूर्णेकर आणि मुलगा राम पूर्णेकर यांनी शिवसेना (शिंदे गट) नेत्या तथा ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर हत्येचा कट रचल्याचा थेट संशय व्यक्त केला होता.

कुटुंबीयांच्या तीव्र विरोध आणि आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्या दबावानंतर ठाणे पोलिसांनी पुरवणी जबाबात संशयित म्हणून मीनाक्षी शिंदे व राजेंद्र शिंदे यांच्या नावांचा समावेश केला. त्यानंतरच तणावपूर्ण वातावरणात पूर्णेकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले. आता सीसीटीव्ही पुरावे आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलीस या संपूर्ण हत्येमागील अंतिम सूत्रधारांपर्यंत कधी पोहोचतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

————————————————

हेही वाचा…

तुकडे-तुकडे गँग’च्या खांद्यावर हात ठेवून ठाकरेंचे मोर्चे: आदित्य ठाकरेंचा पासपोर्ट जप्त करा, ते देश सोडून पळू शकतात; नितेश राणे यांचा खळबळजनक आरोप

“केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या नावाखाली शिवाजी पार्कवर काढण्यात आलेले आंदोलन हे प्रत्यक्षात देशविरोधी शक्तींना बळ देणारे होते. ज्या उमर खलिदला देशाचे तुकडे करायचे आहेत, त्याच्या सुटकेची मागणी करणारे पोस्टर्स या आंदोलनात फडकवले गेले. आता दोन्ही ठाकरे बंधू (उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे) याच ‘तुकडे-तुकडे गँग’च्या दावणीला बांधले गेले आहेत का?” असा घणाघाती सवाल मंत्री नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.