Headlines

स्वराज्यासोबत 'स्वभाषे'चा नारा शिवरायांनीच दिला:संत साहित्यापासून ते महामानवांपर्यंत समाजाला दिशा देण्याचे काम मराठीने केले- CM देवेंद्र फडणवीस




संत साहित्यापासून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘स्वभाषे’च्या आग्रहापर्यंत आणि महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महामानवांच्या समतेच्या विचारांपर्यंत समाजाला दिशा देण्याचे महान कार्य माय मराठीने केले असून, ही समृद्ध भाषा आपल्या सर्वांसाठी नितांत अभिमान आणि स्वाभिमानाची बाब आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. मराठी अभिजात भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले, खरं तर ही भाषा अतिशय सुंदर अशी भाषा आहे. जी शाहीरांनी लोककलावंतांनी फुलवली. जी भाषा भक्तीच्या रूपाने आपल्या सर्वांना पाहायला मिळाली. चक्रधर स्वामी यांच्या काळात आद्यग्रंथ म्हणतात लिळाचरित्र ग्रंथ असो, ज्ञानेश्वरांनी रचलेली ज्ञानेश्वरी असो, संत तुकाराम महाराजांनी आपल्या ओव्यांमधून, अभंगांच्या माध्यमातून दिलेले ज्ञान असो, या प्रत्येक गोष्टीने आपल्या माय मराठीचे माहात्म्य आपल्या पर्यंत पोहोचवला. छत्रपती शिवाजी महाराजांनी तर केवळ स्वराज्याचा नारा नाही दिला. स्वराज्यासोबत स्वभाषेचा नारा देखील छत्रपती शिवरायांनी दिला आणि पहिल्यांदा मराठी भाषेसाठी, संपूर्ण राज्यकारभार मराठी भाषेत चालला पाहिजे त्यासाठी मराठी राजभाषा कोष निर्माण करणारे पहिले राजे जर कोणी असतील तर ते छत्रपती शिवाजी महाराज होते. पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराजांपासून ते लोकमान्य टिळक यांच्या पर्यंत सर्वांनीच स्वराज्याची भूमिका याच मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवली. महात्मा फुले असतील, न्यायमूर्ती रानडे असतील, आगरकर असतील, गोखले असतील, ज्यांनी सुधारणांच्या माध्यमातून समाजात एक विचार रुजवला. हा विचार रुजवताना मराठी भाषेतूनच रुजवण्याचे काम केले. छत्रपती शाहू महाराज असतील, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर असतील ज्यांनी समाजात समतेचे बीजारोपण केले. हे समतेचे बीजारोपण करताना त्यांची भाषा देखील माय मराठी होती. ही आपल्यासाठी अभिमानाची आणि स्वाभिमानची बाब आहे. जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये 13व्या क्रमांकावर मराठी मराठीत विचार आहे, ज्ञान आहे, संघर्ष आहे, अभिमान आहे आणि मराठी जाज्वल्य देखील आहे, ती नाजूक देखील आहे, ती प्रखर देखील आहे, ती राकटही आहे, ती गोंडसही आहे, ती मायाळू देखील आहे, ती तेजवान देखील आहे, तिच्यात तेज आहे, ओझ आहे, तिच्यात करुणा आहे, तिच्यात शील आहे, तिच्यात चारित्र्य आहे, तिच्यात पराक्रम आहे आणि आपली मराठी ही क्षमाशील देखील आहे. अशा प्रकारच्या विविध अंगांनी नटलेली आपली मराठी आपल्या सर्वांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये 13व्या क्रमांकावर आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 20 व्या शतकात तयार झालेल्या मराठी शब्दकोषात 13 लाख शब्द देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपण जर विचार केला, या भाषेचे सौंदर्य काय आहे, तर 20 व्या शतकात तयार झालेल्या मराठी ज्ञानकोष आणि मराठी शब्द रत्नाकर, यात 11 लाख ते 13 लाख शब्द आपल्याला पाहायला मिळतात. जगात इंग्रजीसाठी जी प्रमाण मानली जाते ती ऑक्सफोर्ड डिक्शनरी आहे, त्यात त्याच्या अर्धेच केवळ 6 लाख शब्द पाहायला मिळतात. जगात सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये ज्यांचा वरचा क्रमांक आहे ती चीनची भाषा असेल किंवा फ्रेंच असेल, त्याच्यात एकूण 3 ते साडे तीन लाख शब्द बघायला मिळतात. पण 20 व्या शतकात तयार झालेल्या मराठी शब्दकोषात 13 लाख शब्द पाहायला मिळतात अशी ही आपली मराठी भाषा आहे. अर्थातच उदय सामंतजी आपल्याला खूप काम करायचे आहे. कारण आपल्या शासनाच्या वतीने जो मराठी शब्दकोष तयार केला आहे, त्यात केवळ 3 लक्ष शब्दांपर्यंतच आपण पोहोचू शकलो आहोत. भाषेचा वापर, वावर आणि संशोधन या तीनही गोष्टी महत्त्वाच्या देवेंद्र फडणवीस म्हणाले, भाषा हे केवळ संपर्काचे, संवादाचे माध्यम तर आहेच. पण आपल्या संस्कृतीचे वाहक देखील भाषा आहे. आपल्या इतिहासाची साक्ष देखील आपली भाषा आहे. म्हणून ज्यावेळेस भाषा संपते तेव्हा एक पूर्ण सभ्यता, संस्कृती संपते आणि त्यामुळेच भाषा अतिशय महत्त्वाची असते. अडीच हजार वर्षांपूर्वी देखील आपल्या मराठी भाषेचे अस्तित्व आपल्याला पाहायला मिळते. जर आपल्याकडे अशा स्वरूपात आपली भाषाच नसेल तर अडीच हजार वर्षांपूर्वीच्या संस्कृती काय आहे, प्रथा परंपरा काय आहेत, त्या कधीच समजणार नाहीत. आज आपल्याकडे अनेक प्रकारचे ज्ञान पोहोचते, हे सगळे आपल्यापर्यंत पोहोचतात त्या आपल्या भाषेच्या माध्यमातून पोहोचतात. भाषा जीवंत ठेवायची असेल तर त्या भाषेचा वापर, वावर आणि संशोधन या तीनही गोष्टी महत्त्वाच्या आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *