![]()
सोयगाव-शेंदुर्णी मार्गाची दुरवस्था झाली असून, खड्ड्यांमुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. विशेष म्हणजे अवघ्या चार किलोमीटरच्या या रस्त्याची जानेवारीत डागडुजी करण्यात आली होती. मात्र काही महिन्यांतच रस्ता पुन्हा उखडल्याने दुरुस्तीच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. खड्डे चुकवताना वाहनचालकांना अचानक ब्रेक लावावे लागतात. त्यामुळे मागून येणाऱ्या वाहनांची धडक होण्याचा धोका वाढला आहे. रात्रीच्या वेळी खड्ड्यांचा अंदाज न आल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनते. खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसानही होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत. जामनेर, पाचोरा व जळगाव येथे शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचीही या मार्गावर वर्दळ असते. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्याची जानेवारीत डागडुजी करण्यात आली होती. या कामासाठी अंदाजे २० लाख खर्च झाल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता धनराज दराडे यांनी दिली. ठेकेदाराशी पत्रव्यवहार करून दुरुस्ती करून घेणार सोयगाव-शेंदुर्णी रस्त्याची पाहणी करून दुरुस्तीची तातडीने चौकशी करण्यात येईल. दुरुस्तीचा कालावधी सुरू असेल तर संबंधित ठेकेदाराशी पत्रव्यवहार करून रस्त्याची पुन्हा दुरुस्ती करून घेतली जाईल.असे सार्वजनिक बांधकाम उपविभाग, सोयगावचे कार्यकारी अभियंता ब्रह्मानंद तायडे यांनी सांगितले.
Source link
जानेवारीत 20 लाखांची डागडुजी:सोयगाव-शेंदुर्णी चार किमी रस्ता उखडला; वाहनधारकांची कसरत, कार्यकारी अभियंत्यांकडून होणार पाहणी