![]()
मराठा आरक्षण आंदोलनाबाबत प्रश्न विचारणाऱ्या महिलांना समाजमाध्यमांवर ट्रोल करून बदनाम केले जात असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयक रेखा कोंडे आणि अंतरवली सराटी येथील ललिता तारक यांनी केला. महिलांना लक्ष्य करणाऱ्यांवर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी सोमवारी पुण्यातील पत्रकार भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत केली. यावेळी अश्विनी मल्हारे आणि वेदश्री जोशी उपस्थित होत्या. कोंडे म्हणाल्या, “जरांगे यांच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित केल्यास महिलांचे चारित्र्यहनन केले जाते. त्यांच्याकडे पाच हजार जणांची सोशल मीडिया टीम असल्याचा आमचा आरोप आहे. आरक्षणाइतकाच महिलांचा आत्मसन्मानही महत्त्वाचा आहे.” समाजाने जरांगे यांच्यावर विश्वास ठेवला; मात्र त्यांच्या निर्णयांमुळे समाजाचे नुकसान झाल्याचा दावाही त्यांनी केला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये उमेदवार उभे करण्याची घोषणा करून ऐनवेळी माघार का घेतली, असा प्रश्न कोंडे यांनी उपस्थित केला. मागील तीन वर्षांतील अकरा आंदोलनांतून समाजाला नेमके काय मिळाले, याचा हिशेब द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. प्रत्येक वेळी ‘अंतिम लढाई’ सांगितली जाते; मात्र ठोस निष्पत्ती समोर येत नसल्याची टीका त्यांनी केली. मराठा आरक्षणासाठी दीर्घकाळ संघर्ष सुरू असून, नेतृत्वाशिवाय ५८ मोर्चे शांततेत झाल्याचे कोंडे म्हणाल्या. जरांगे सातत्याने उल्लेख करत असलेल्या ५८ लाख नोंदींची यादी सार्वजनिक करावी, अशी मागणीही त्यांनी केली. आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केलेल्या कुटुंबांसाठी काय केले, असा सवाल उपस्थित करत त्यांनी आंदोलनातील निर्णयांबाबत पारदर्शकतेची अपेक्षा व्यक्त केली. ललिता तारक यांनी आंदोलनाच्या सुरुवातीच्या घटनांचा उल्लेख केला. “२९ ऑगस्ट २०२३ रोजी आंदोलनासाठी मी स्वतः पोलिसांकडे गेले होते. लाठीचार्जच्या वेळी महिलांनी मार सहन करून जरांगे यांना वाचवले,” असे त्यांनी सांगितले. आंदोलन व्यापक झाल्यानंतर अनेकजण भावनिकपणे सहभागी झाले; मात्र जखमींची आणि स्थानिक कुटुंबांची अपेक्षित विचारपूस झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला. अंतरवली सराटीतील ग्रामस्थांचा आंदोलनासाठी वापर करण्यात आल्याची टीकाही तारक यांनी केली. “आमच्या कुटुंबांचा विचार न करता आम्हाला ट्रोल केले जाते. याबाबत अंबड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे,” असे त्यांनी सांगितले. हैदराबाद गॅझेटच्या आधारे मिळालेल्या नोंदी आणि आंदोलनांनंतरच्या शासन निर्णयांची माहिती समाजासमोर ठेवावी, अशी मागणी त्यांनी केली. पत्रकार परिषदेत आंदोलनांमधील गुन्हे, कार्यकर्त्यांचे भवितव्य, सवलती आणि आर्थिक व्यवहारांबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले. प्रश्न विचारणे हा अधिकार असून त्याला धमक्या किंवा बदनामीने उत्तर देऊ नये, अशी भूमिका दोघींनी मांडली. महिलांविरोधातील आक्षेपार्ह मजकुराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
Source link
मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर प्रश्न विचारणाऱ्या महिला ट्रोल:रेखा कोंडे, ललिता तारक यांची कारवाईची मागणी; अंबड पोलिसांत तक्रार