![]()
“ठाकरे हे नाव म्हणजे महाराष्ट्राचा महाकाय वटवृक्ष आहे, त्याच्या छायेत वाढून मोठे झालेले आज ठाकरेंची जागा हरवल्याची भाषा करत आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या याच वटवृक्षावर वाढलेली भाजप ही केवळ एक विषारी वेल आहे. निवडणुकांमध्ये पारदर्शकता हवी असेल तर ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घेऊन दाखवा, भाजपची खरी ताकद आणि अग्निपरीक्षा तिथेच सिद्ध होईल,” अशी सडकून टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातील पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रा. दत्तात्रय लहाने यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सावंत अमरावतीत आले होते. शिक्षक आमदार अभिजित वंजारी, आमदार सिद्धार्थ खरात, नरेंद्र खेडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी शिक्षक मतदारसंघातील उमेदवारी, केंद्रीय निवडणूक आयोगातील गैरव्यवहार, एसआयआर (SIR) घोटाळा, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप आणि मुंबईतील मोर्चावर दाखल झालेल्या गुन्ह्यांवरून केंद्र व राज्य सरकारवर चौफेर हल्ला चढवला. अमरावती शिक्षक मतदारसंघात दत्तात्रय लहाने अधिकृत उमेदवार अमरावती शिक्षक मतदारसंघातील रणनीती स्पष्ट करताना खा. अरविंद सावंत म्हणाले, “पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पश्चिम विदर्भातील शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी किंवा अहंकार नसलेला, स्वच्छ प्रतिमेचा आणि प्रामाणिक उमेदवार म्हणून दत्तात्रय लहाने यांना मैदानात उतरवले आहे. विधान परिषदेत शिक्षकांचे प्रश्न मांडणारा एक उजवा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचा विजय निश्चित आहे.” काँग्रेसच्या उमेदवारीवर समन्वय “काँग्रेसनेही या जागेवर उमेदवार दिला असला तरी महाविकास आघाडीत कुठेही फाटाफूट नाही. अर्ज मागे घेण्याची मुदत अद्याप शिल्लक आहे. मुंबईतील विराट मोर्चात काँग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरातांसह सर्व घटक पक्ष उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंसोबत मंचावर एकत्र होते. स्थानिक पातळीवरील पेचावर उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते चर्चा करून नक्कीच सकारात्मक तोडगा काढतील.” पेन्शन व अनुदान मिळेपर्यंत आमदारकीचे मानधन घेणार नाही- उमेदवार लहानेंचे प्रतिज्ञापत्र उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रा. दत्तात्रय लहाने यांनी एक ऐतिहासिक आणि धाडसी घोषणा केली, “शिक्षकांचे प्रश्न केवळ भाषणांपुरते न ठेवता प्रामाणिकपणे सोडवण्यासाठी मी बी. टी. देशमुखांच्या आदर्शावर काम करण्याचा संकल्प केला आहे. राज्यातील शिक्षकांची जुनी पेन्शन योजना (OPS) आणि गेली 20 वर्षे रखडलेले शाळांचे अनुदान जोपर्यंत शासन मंजूर करत नाही, तोपर्यंत मी आमदारकीचे एक रुपयाचेही मानधन स्वीकारणार नाही, असे रीतसर प्रतिज्ञापत्र मी सादर केले आहे.” शिक्षणाच्या बजेटवर ताशेरे “महाराष्ट्राचा जीडीपी 46 लाख कोटींचा असताना शिक्षणासाठी केवळ 86 हजार कोटी (1.86%) दिले जातात. कोठारी आयोगासह नव्या शैक्षणिक धोरणात 6 टक्के तरतुदीची शिफारस असताना निधीअभावी 15 हजार मुख्याध्यापकांची पदे रद्द झाली आहेत. हजारो शाळांमध्ये एकाच शिक्षकावर किंवा शून्य शिक्षकांवर शाळा सुरू आहेत. शासनाने ठोस आर्थिक तरतूद केली नाही तर मराठी आणि मातृभाषेतील शाळांचे अस्तित्व धोक्यात येईल.” शांततापूर्ण मोर्चावर गुन्हे? संविधानाने दिलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य कुठे गेले? निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात मुंबईत काढलेल्या मोर्चावर पोलिसांनी गुन्हे दाखल केल्याच्या प्रश्नावर सावंत यांनी संताप व्यक्त केला. “घटनेच्या कलम 19 नुसार प्रत्येक नागरिकाला शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचे आणि मत मांडण्याचे मूलभूत अधिकार आहेत. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढताना हुतात्म्यांनी ब्रिटिशांची परवानगी घेतली होती का? आजच्या सत्ताधाऱ्यांना आमच्या शब्दांचे वार झोंबत असल्याने ते पोलिसांमार्फत गुन्हे दाखल करून दडपशाही करत आहेत.” महिलांवरील अत्याचाराचा निषेध “जंतरमंतरवर आंदोलक विद्यार्थिनी आणि महिलांशी पोलिसांनी ज्या प्रकारे गैरवर्तन केले, त्यांचे कपडे खेचून विटंबना केली, त्यावरून या सरकारचा नैतिक अधिकार संपुष्टात आला आहे. उच्च आणि सर्वोच्च न्यायालयानेही शांततापूर्ण निदर्शने करणाऱ्यांवर कारवाई न करण्याचे निर्देश दिले असताना सरकार हुकूमशाहीच्या मार्गाने चालले आहे.” ज्ञानेश कुमार म्हणजे भाजपचे एजंट; केरळमधील 215 कोटींचा घोटाळा उघड! केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर त्यांनी स्फोटक आरोप केले. “ज्ञानेश कुमार केरळमध्ये असताना 215 कोटींच्या रस्ते घोटाळ्यात कंत्राटदाराकडून लाच मागितल्याचे प्रकरण समोर आले असून त्यांच्या चौकशीचे आदेश दिले गेले आहेत. इतकेच नव्हे, तर केरळच्या मुख्य सचिवांना फोन करून भाजपच्या उमेदवाराला मदत करण्याचे आदेश ज्ञानेश कुमारांनी दिले होते. मग हा माणूस निष्पक्ष कसा असू शकतो? हा थेट भाजपचा कार्यकर्ता म्हणून काम करत आहे.” मतदार यादीतील एसआयआर (SIR) चा खेळ “मतदार यादीतून महाराष्ट्रात कोट्यवधी मतदारांची नावे संशयास्पदरीत्या वगळली गेली आणि अचानक विधानसभा निवडणुकीपूर्वी लाखो मते वाढवली गेली. फॉर्म 6 वर निवडणूक आयुक्तांच्या सहकाऱ्यांनी तब्बल 14 वेळा आक्षेप नोंदवूनही मनमानी कारभार सुरू ठेवला गेला. सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना निवडणूक आयुक्त निवड समितीतून वगळून पंतप्रधानांनी आपल्या मर्जीतील व्यक्तींना बसवले, हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार आहे.” बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या “जर सत्ताधाऱ्यांमध्ये आणि निवडणूक आयोगात हिंमत असेल तर आगामी सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घेऊन दाखवाव्यात. ईव्हीएममधील घोळ आणि मतचोरी थांबल्यास भाजपला त्यांची खरी जागा जनता दाखवून देईल,” असा थेट इशारा अरविंद सावंत यांनी शेवटी दिला. ———————————————————- हेही वाचा… महायुतीच्या ‘ट्रिपल इंजिन गँग’मध्ये टोळीयुद्ध सुरू: टिळक भवनात पोलिसांचा धुडगूस म्हणजे फडणवीसांचे ‘घाशीराम कोतवाल’ राज; हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्लाबोल “महाराष्ट्रात सध्या सुरू असलेला सत्ताधाऱ्यांचा कारभार म्हणजे संविधानाची उघड पायमल्ली आहे. पुण्यात मंगेश चिवटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सत्ताधारी गँगमध्येच एकमेकांवर कुरघोडी सुरू झाली आहे. हे सरकार नसून ‘ट्रिपल इंजिन सरकारची गँग’ आहे आणि या गँगमध्ये आता टोळीयुद्ध पेटले आहे. आगे आगे देखो होता है क्या!”, असा टोला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावला आहे. नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेसचे मुख्यालय असलेल्या ‘टिळक भवन’मधील बेकायदेशीर पोलीस बंदोबस्त आणि आदिवासी विद्यार्थ्यांची अडवणूक, अन्न व नागरी पुरवठा विभागातील तांदूळ घोटाळा, केंद्रीय निवडणूक आयुक्तांवरील आरोप, ‘सत्याग्रह’ पोर्टल आणि विधान परिषद निवडणुकीतील महाविकास आघाडीची रणनीती यावर सविस्तर आणि आक्रमक भूमिका मांडली. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, भाजपची खरी अग्निपरीक्षा होईल!:अमरावतीतून अरविंद सावंतांचा हल्लाबोल, दत्तात्रय लहानेंचा उमेदवारी अर्ज दाखल