Headlines

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मोठा खुलासा:सुपारी देऊन थंड डोक्याने हत्या केल्याचा पोलिसांचा कोर्टात दावा, घटनेच्या 10 दिवस आधी पप्या शिंदेचा आरोपींशी 150 वेळा संपर्क




शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे जात आहे, तसतशी या हत्येच्या नियोजनाबाबत नवी माहिती समोर येत आहे. पूर्णेकर यांची हत्या पूर्वनियोजित पद्धतीने आणि सुपारी देऊन करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी सोमवारी ठाणे न्यायालयात केला. या प्रकरणातील आरोपी सुभाष शिंदे उर्फ पप्या याची इतर आरोपींसोबत हत्या होण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात फोनवरून चर्चा झाल्याचेही पोलिसांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हत्येच्या घटनेच्या सुमारे दहा दिवस आधी सुभाष शिंदे हा अन्य आरोपींच्या सातत्याने संपर्कात होता. या कालावधीत आरोपींमध्ये तब्बल 150 वेळा संपर्क झाल्याची माहिती कॉल डिटेल्स रेकॉर्डमधून समोर आली आहे. त्यामुळे पूर्णेकर यांच्या हत्येपूर्वी आरोपींमध्ये काही प्रकारचे नियोजन झाले होते का, याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे. या प्रकरणात सुभाष शिंदे, निखिल यादव आणि नितेश पवार या तिघांना अटक करण्यात आली आहे. तर संतोष कनोजिया उर्फ टल्ली याच्यासह आणखी एक आरोपी अद्याप फरार आहे. फरार आरोपींचा शोध घेण्याबरोबरच हत्येसाठी वापरण्यात आलेली शस्त्रे आणि आरोपींना घटनास्थळावरून पसार होण्यासाठी मदत करणाऱ्या वाहनाचा शोध घेण्याचे कामही सुरू आहे. पप्या शिंदेने आरोपींना कार उपलब्ध करून दिल्याचा पोलिसांचा दावा सुभाष शिंदे उर्फ पप्या याने हत्या झाल्यानंतर इतर आरोपींना घटनास्थळावरून पळून जाण्यासाठी कार उपलब्ध करून दिल्याचा दावा पोलिसांनी न्यायालयात केला. ही कार तपासासाठी महत्त्वाची असून ती जप्त करणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी सांगितले. याशिवाय गुन्ह्याच्या वेळी सुभाषने वापरलेले मोबाइल क्रमांक त्याच्या स्वतःच्या नावावर नसल्याचेही तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे या मोबाइल क्रमांकांचा वापर नेमका कोणाच्या माध्यमातून करण्यात आला आणि हत्येच्या कटात त्यांचा काय संबंध आहे, याचा तपास केला जात आहे. हत्येचा उद्देश अद्याप स्पष्ट नाही पूर्णेकर यांच्या हत्येमागचा नेमका उद्देश अद्याप स्पष्ट झालेला नसल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. सुभाष शिंदे याला या हत्येच्या हेतूबाबत माहिती असल्याचा पोलिसांचा दावा आहे. मात्र, तो तपास यंत्रणेला अपेक्षित माहिती देत नसून उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे पोलिसांनी म्हटले. हत्येच्या कटामागे नेमके कोण होते, त्यासाठी कोणाकडून सुपारी देण्यात आली आणि त्यामागील कारण काय होते, याचा तपास करणे बाकी असल्याने सुभाषच्या पोलीस कोठडीची आवश्यकता असल्याचे पोलिसांनी न्यायालयात स्पष्ट केले. शस्त्रे कुठे आहेत? फरार आरोपीकडे असल्याचा दावा या प्रकरणातील फरार आरोपी संतोष कनोजिया उर्फ टल्ली आणि आणखी एका आरोपीचा ठावठिकाणा सुभाष शिंदे याला माहिती असल्याचा पोलिसांचा दावा आहे. हत्येत वापरण्यात आलेली शस्त्रे संतोष कनोजिया याच्याकडे असल्याचे सुभाषने सांगितले आहे. मात्र, या शस्त्रांबाबत आणि फरार आरोपींच्या ठिकाणाबाबत तो स्पष्ट माहिती देत नसल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. हत्येतील शस्त्रे जप्त करणे, फरार आरोपींचा शोध घेणे आणि गुन्ह्यात वापरलेली कार ताब्यात घेणे या दृष्टीने सुभाषची अधिक चौकशी आवश्यक असल्याचे पोलिसांनी नमूद केले. घटनापूर्वी आरोपींच्या भेटीगाठीही झाल्या तपासादरम्यान अटक करण्यात आलेले आरोपी आणि फरार आरोपी घटनेच्या दिवशी मनोरमानगर, पवारनगर आणि एका मॉल परिसरात भेटल्याची माहिती समोर आल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. या भेटींचा पूर्णेकर यांच्या हत्येशी संबंध आहे का, याचा तपास केला जात आहे. घटनेच्या आधी आरोपींमध्ये झालेला मोठ्या प्रमाणातील संपर्क आणि घटनेच्या दिवशी झालेल्या भेटी यामुळे हत्येचे नियोजन आधीपासून झाले होते का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. पोलिसांनी मागितली होती 9 दिवसांची कोठडी सुभाष शिंदे याच्या आधीच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला सोमवारी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस. बी. साबळे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांनी तपासाची माहिती न्यायालयासमोर मांडत सुभाषच्या पोलीस कोठडीत आणखी 9 दिवसांची वाढ करण्याची मागणी केली. सुभाषविरुद्ध यापूर्वी सात गुन्हे दाखल असल्याची माहितीही पोलिसांनी न्यायालयाला दिली. या प्रकरणातील कटाचा उलगडा करण्यासाठी त्याची अधिक चौकशी आवश्यक असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांचा युक्तिवाद आणि आरोपीच्या वकिलांची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने सुभाष शिंदेच्या पोलीस कोठडीत 9 ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे. ‘सुपारी देणाऱ्याचा शोध घ्यायचा आहे’ पूर्णेकर यांची हत्या सुपारी देऊन करण्यात आल्याचा पोलिसांचा प्राथमिक दावा आहे. मात्र, ही सुपारी कोणी दिली, याचा तपास अद्याप पूर्ण झालेला नाही. सुभाष शिंदे याला याबाबत माहिती असूनही तो ती लपवत असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. हत्येची सुपारी देणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी सुभाषकडून माहिती मिळवणे महत्त्वाचे असल्याने त्याची कोठडी आवश्यक असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास आता केवळ प्रत्यक्ष हल्लेखोरांपुरता मर्यादित न राहता हत्येच्या कटामागील व्यक्तींपर्यंत पोहोचण्याच्या दिशेने सुरू असल्याचे दिसून येत आहे. आरोपीच्या वकिलांचा पोलिसांना सवाल दरम्यान, सुभाष शिंदेच्या वतीने अॅड. संग्राम शिंदे यांनी न्यायालयात पोलिसांच्या तपासाबाबत सवाल उपस्थित केला. राम पूर्णेकर यांच्या पुरवणी जबाबामध्ये दोन राजकीय व्यक्तींच्या नावांचा उल्लेख असल्याचा दावा त्यांनी केला. या दोन्ही व्यक्तींची पोलिसांनी चौकशी केली आहे का? त्यांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत का? असा प्रश्न आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात उपस्थित केला. त्यामुळे आता तपासात या दोन राजकीय व्यक्तींच्या भूमिकेबाबत पोलिसांनी काय कारवाई केली, याकडेही लक्ष लागले आहे. दरम्यान, पोलिसांकडून आरोपींच्या मोबाइल संपर्काचा तपशील, घटनापूर्वीच्या भेटी, वाहनाची उपलब्धता, हत्येतील शस्त्रे आणि कथित सुपारी देणाऱ्या व्यक्तीचा शोध या सर्व दिशांनी तपास सुरू आहे. फरार आरोपींची अटक झाल्यानंतर या हत्येच्या कटामागील संपूर्ण साखळी स्पष्ट होण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. हेही वाचा…. हिंगोलीत फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग:2 ठार, 7 जण जखमी, रुग्णालयात दाखल; आग आटोक्यात आणतांना अग्निशमन दलाच्या वाहनानेही घेतला पेट हिंगोली शहरातील कपडागल्ली परिसरात फटाक्यांच्या गोदामाला सोमवारी (5 ऑक्टोबर) रात्री पावणेआठच्या सुमारास भीषण आग लागली. गोदामात मोठ्या प्रमाणावर फटाक्यांचा साठा असल्याने आगीसोबत जोरदार स्फोट होऊ लागले. या दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू झाला असून 7 जण भाजल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी हिंगोलीतील लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, आग विझविताना फटाक्यांच्या स्फोटामुळे अग्निशमन दलाचे वाहनही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. सविस्तर वाचा….



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *