![]()
स्वतःच्या नावावरील फ्लॅट दिराच्या नावावर करावा यासाठी पत्नीचा छळ करत तिला आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले. पतीच्या जाचाला कंटाळून विष प्राशन केलेल्या पत्नीने जीव वाचवण्यासाठी स्वतः गाडी चालवत रुग्णालय गाठले. मात्र, पैशांची हाव आणि संशयाने पछाडलेल्या पोलिसपतीने तिच्या उपचारांसाठी रुग्णालयात डिपॉझिट भरण्यास नकार देत पत्नीला सिव्हिल हॉस्पिटलच्या पायऱ्यांवर सोडून पळ काढला. उपचारादरम्यान विवाहितेचा मृत्यू झाला असून, या प्रकरणी संशयित पती अनिल पवार यास अटक केली असून, न्यायालयाने ९ ऑक्टाेबरपर्यंत त्यास पाेलिस काेठडी सुनावली आहे. महात्मानगरातील क्लासिक निकेतन अपार्टमेंट येथील रहिवासी दीपाली अनिल पवार (३२) असे या मृत परिचारिकेचे नाव आहे. याप्रकरणी दीपाली यांचे वडील सयाजी गायकवाड (रा. त्र्यंबक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सातपूर पोलिसात पती अनिल सोन्याबापू पवार, सासू सुशिला, सासरे सोन्याबापू, दीर सुनिल पवार, त्याची पत्नी सुवर्णा, ननंद रेखा किशोर धोत्रे आणि तिचे पती किशोर धोत्रे (सर्व रा. घारगाव, श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) या सात जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असा सुरू झाला पैशांचा खेळ… दीपाली यांचा विवाह २०१४ मध्ये अनिल पवार याच्याशी झाला होता. दीपाली या जातेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारिका म्हणून कार्यरत होत्या, तर पती अनिल हा सुरुवातीला एसआरपीएफ दौंड येथे व सध्या नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयात वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहे. दीपाली यांनी स्वतःच्या पैशातून अहिल्यानगर येथे घेतलेला फ्लॅट दीर सुनिल याच्या नावावर करण्यासाठी सासरच्या मंडळींनी दबाव टाकत हाेते. एटीएम कार्ड हिसकावले केवळ फ्लॅटच नाही, तर दीपाली यांच्या पगाराचे एटीएम कार्डही अनिलने स्वतःच्या ताब्यात ठेवले होते. तिचे सर्व पैसे परस्पर काढून घेत. दीपाली यांनी ७ वर्षांच्या मुलाच्या (शिवांश) शिक्षणासाठी एटीएम कार्ड परत घेतल्यावर हा छळ अधिक वाढला. वारंवार कामानिमीत्त फाेनवर बेालत असल्यास त्यांच्या चारित्र्यावर संशय घेत त्यांना मारहाण सुरू केली. या त्रासाला कंटाळून दीपाली यांनी न्यायालयात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रारही दाखल केली होती. पोलिस उपनिरीक्षक राहुल नळकांडे करत आहे. इनसाइड स्टोरी: भावाची धाव, पण नियतीचा घाला दीपाली यांनी विष प्राशन केल्यानंतर त्यांच्या वडिलांना फोनवरून माहिती दिली. वडिलांनी तातडीने त्यांचा भाऊ भूषणला नाशिकला पाठवले. दुपारी १.३० वाजता भाऊ जिल्हा रुग्णालयात पोहोचला व त्यांना खासगी रुग्णालयात हलवले. उपचारादरम्यान साेमवारी (दि.५)सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
Source link
चारित्र्यावर संशय, फ्लॅट दिराच्या नावावर करण्यासाठी छळ:नाशिकमध्ये पोलिस पत्नीने जीवन संपवले