Headlines

नानांच्या दत्तक धोंदलगावात 4.5 किमी नाला खोलीकरण‎:नाना पाटेकर यांच्याकडून 2015 मध्ये पाहणी, 2025 मध्ये वेरूळ लेणीला भेट‎




अभिनयाच्या दुनियेत दमदार भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या जाण्याने केवळ चित्रपटसृष्टीचेच नव्हे, तर महाराष्ट्राच्या सामाजिक आणि जलसंधारण क्षेत्राचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे. एका बाजूला वेरूळच्या अद्भुत शिल्पकलेचे कौतुक करणारे संवेदनशील कलाकार, तर दुसऱ्या बाजूला दुष्काळग्रस्त शेतकरी अन् गावकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे सच्चे सामाजिक कार्यकर्ते म्हणून नानांची ओळख सदैव अजरामर राहणारी आहे. नाना पाटेकर यांनी २०१५ मध्ये धोंदलगावला नाम फाउंडेशनच्या माध्यमातून दत्तक घेतले. केवळ मदत देऊन न थांबता, नानांनी गावकऱ्यांसोबत शेताच्या बांधावर उतरून पाण्याचे गणित मांडले. श्रमदान आणि आधुनिक यंत्रसामग्रीच्या जोरावर ओढे-नाल्यांतील गाळ काढण्यात आला. पात्रांचे रुंदीकरण, खोलीकरण आणि सलग समपातळी चर खोदून पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवला गेला. परिणामी, भूजल पातळी वाढली. २०२६ मध्ये वैजापूर दुष्काळी उंबरठ्यावर असताना नाना आपल्यात नाहीत; मात्र अकरा वर्षांपूर्वी त्यांनी उभा केलेला हा जलसंधारण पॅटर्न प्रशासनास मार्ग दाखवणारा आहे. आजही त्यांचे कार्य धोंदलगावकर स्मरणात ठेवून आहेत. धोंदलगाव : १२ बंधाऱ्यांतील गाळही फाउंडेशनने काढला धोंदलगाव दत्तक घेतल्यानंतर नाम फाउंडेशनने ४.५ किलोमीटर नाल्याचे रुंदीकरण व खोलीकरण केले. त्यासोबत १२ बंधाऱ्यांतील गाळ काढला. या कामांमुळे गावाची पाणी साठवण क्षमता तब्बल २० कोटी लिटरने वाढली. त्याचा थेट परिणाम भूजलावर झाला; विहिरींची पाणीपातळी सुधारली. दुष्काळात टँकरवर अवलंबून असलेल्या धोंदलगावला या जलसंधारणाने अशी ताकद दिली की, गेल्या दहा वर्षांत भीषण उन्हाळ्यातही गावाला पिण्याच्या पाण्यासाठी एकाही टँकरची गरज भासली नाही. मात्र, आताच्या दुष्काळी परिस्थितीत त्यांची आठवण कायम राहणारी असल्याची खंत आहे. वेरूळ : लेणीतील सौंदर्याने भारावले होते ‘नाना’ २४ नोव्हेंबर २०२५ रोजी नाना पाटेकर यांनी वेरूळ लेणीला भेट दिली होती. येथील शिल्पकला आणि ऐतिहासिक वैभव पाहून ते अक्षरशः थक्क झाले होते. “हा किती अप्रतिम देखावा आहे! हा वारसा खरंच अद्भुत आणि अद्वितीय आहे,’ अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. या भेटीदरम्यान त्यांनी लेणीच्या परिसरात अनेक छायाचित्रे काढली होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *