![]()
यंदाच्या शारदीय नवरात्रोत्सवास रविवार, ११ ऑक्टोबरपासून प्रारंभ होत आहे. मराठवाड्याचे प्रमुख श्रद्धास्थान व कुलदैवत असलेल्या लासूरगाव (ता. वैजापूर) येथील कुलस्वामिनी श्री देवी दाक्षायणी मातेच्या दर्शनासाठी यंदा नवरात्रोत्सवात देशभरातून आठ लाख भाविक हजेरी लावतील, असा अंदाज मंदिर प्रशासनाने वर्तवला आहे. उत्सव काळात भाविकांना दर्शन घेता यावे यासाठी दररोज पहाटे ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत मंदिर खुले ठेवले जाणार असल्याची माहिती व्यवस्थापक विष्णू हरिश्चंद्रे यांनी दिली. शिवना नदीच्या निसर्गरम्य काठावर वसलेल्या या ऐतिहासिक मंदिरात रविवारी घटस्थापना व आकर्षक वस्त्रालंकाराने नवरात्रोत्सवाचा श्रीगणेश होणार आहे. उत्सव काळात दूरवरून येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी फराळ, पिण्याचे पाणी आणि राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर परिसरात ४२ सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले आहेत. भाविकांच्या सोयीसाठी प्रशस्त वाहनतळ, पिण्याचे पाणी व अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उत्सव काळात वैजापूर पोलिसांचा बंदोबस्त राहणार असून वीज मंडळ आणि आरोग्य विभागाने सतर्क राहावे, असे निर्देश तहसीलदार सुनील सावंत यांनी बैठकीत दिले आहेत. दाक्षायणी देवी लासूरगावी प्रकट झाल्याची आख्यायिका वैजापूर तालुक्यातील शिवना नदीकाठी वसलेले श्री दाक्षायणी देवीचे मंदिर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. वडिलांच्या यज्ञात उडी घेतल्यानंतर देवी लासूरगावी प्रकट झाल्याची आख्यायिका असून या स्मरणार्थ मंदिरात अखंड यज्ञ तेवत असतो. या यज्ञाचा अंगारा लावून मागितलेले साकडे पूर्ण होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. हेमाडपंती शैलीतील या मंदिरात दीपमाळेवर वाघाच्या मूर्ती, सभामंडपातील नक्षीकाम आणि अखंड दगडी शिळेतील वाघ व कासवाची मूर्ती आकर्षण ठरतात. दिव्य मराठी नॉलेज वैजापूर पोलिसांकडून मंदिरात २४ तास कडेकोट बंदोबस्त राहणार मंदिराचे पदसिद्ध विश्वस्त तथा तहसीलदार सुनील सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापक विष्णू हरिश्चंद्रे, संतोष शेलार यांच्यासह मंदिराचे कर्मचारी व सफाई कामगार भाविकांना सुविधा देण्यासाठी सज्ज झाले आहेत. उत्सव काळात वैजापूर पोलिसांचा २४ तास बंदोबस्त राहणार आहे.
Source link
देवी दाक्षायणीच्या दर्शनासाठी यंदा आठ लाख भाविक येणार:पहाटे 5 ते रात्री 11 वाजेपर्यंत मंदिर भाविकांसाठी खुले