![]()
आपल्या आई-वडिलांमध्ये जर ईश्वराचे रूप पाहिले, तर प्रपंचातील कोणतीही विवंचना उरत नाही. सध्या शेतकरी दुष्काळाने त्राही त्राही झाला आहे. या संकटातून बाहेर पडायचे असेल, तर संत तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे निसर्गाशी आणि वृक्षवल्लींशी सोयरीक साधणे हाच एकमेव मार्ग आहे, असे प्रतिपादन ढवळेश्वर संस्थानचे मठाधिपती ज्ञानदास माऊली महाराज यांनी केले. कन्नड तालुक्यातील देभेगाव येथे ढवळेश्वर संस्थान, विश्वनाथ कारभारी बोडखे आणि विमल बोडखे यांच्या सहकार्याने आयोजित शिव महापुराण कथा सप्ताहाचा समारोप झाला. या सोहळ्यात काल्याच्या कीर्तनात ज्ञानदास माऊली महाराज बोलत होते. भक्त पुंडलिकाने आई-वडिलांची निष्काम सेवा करून पांडुरंगाला प्राप्त केले. आई-वडिलांच्या रूपात घरातच शिव-पार्वती वास करत असतात. घरातील सर्व सदस्य जेवल्यानंतर आई-वडील जेवतात, पण आज घरातून संस्कार आणि आध्यात्मिकतेचा लोप होत चालला आहे. लहान मुलांच्या चुकांवर पांघरूण घालू नका. रात्री उशिरा येणाऱ्या मुलाला आईने मागच्या दाराने घरात घेतले, तर तोच मुलगा पुढे आई-वडिलांना घराबाहेर काढतो. मुलांवर वेळेत सुसंस्कार करा, असे आवाहन त्यांनी केले. मन निर्मळ आणि आचार-विचार शुद्ध ठेवल्यास तिथेच देवाची वस्ती असते, असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा परिषद सदस्य डॉ. संजय गव्हाणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. १५ हजार भाविकांना महाप्रसादाचे वितरण, शिवमहापुराण कथेची सांगता या सोहळ्यात १५ हजार भाविकांना महाप्रसाद देणारे विश्वनाथ बोडखे यांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख उपस्थित म्हणून जिल्हा परिषद सदस्य डॉ. संजय गव्हाणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कीर्तनात अरुण महाराज वाळके यांनी टाळकरी म्हणून, तर सागर महाराज व वैभव महाराज यांनी मृदंगाची साथसंगत केली. याप्रसंगी गणेश शेळके, अनिल काका बोडखे, सुरेश बोडखे, नारायणसेठ बोडखे, अण्णा सुखदेव बोडखे, रवी चंद्रभान बोडखे, दीपक बोडखे, शिवनाथ बोडखे, राजू किसन थोरात, संजय पवार, संदीप बोडखे, रावसाहेब लगड आणि गुलाबराव सुराशे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी व तालुक्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Source link
शिवमहापुराण कथेच्या समाप्तीनिमित्त भाविकांना मार्गदर्शन:आई अन् वडिलांची सेवा करणे हीच खरी ईश्वरप्राप्ती- ज्ञानदास माऊली महाराज