Headlines

दुष्काळावर मात करण्यासाठी ‘प्लॅन बी’; झेंडू लागवडीतून उत्सवांत कमाई:तीन टप्प्यांत 17 हजार रोपांची लागवड; थेट विक्रीतून नफ्याचे गणित‎


.

पारंपरिक पिकांवर पूर्णपणे अवलंबून न राहता शेतीत विविध प्रयोग व नवनवीन संकल्पना राबवल्यास शेती अधिक फायदेशीर ठरू शकते, हे अकोट तालुक्यातील शेतकरी युवराज मिश्रा यांनी फुलशेतीच्या प्रयोगातून दाखवून दिले आहे. बदलत्या हवामानाचा व बाजारभावातील चढ-उतारांचा सामना करण्यासाठी त्यांनी पारंपरिक पिकांसोबत फुलशेतीचा पर्याय स्वीकारला. गत ३५ वर्षांपासून फुलांची शेती करणाऱ्या मिश्रा यांनी झेंडूच्या फुलशेतीवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

कापूस, सोयाबीन, ज्वारी, तूर तसेच डाळींच्या विविध पिकांवर अवलंबून शेतकऱ्यांना अनेकदा उत्पादन चांगले होऊनही अपेक्षित दर मिळत नाही. एखाद्या वर्षी कापसाला चांगला भाव मिळतो, तर त्याचवेळी तुरीचे दर घसरतात. कधी हवामान साथ देत नाही, तर कधी बाजारभावातील अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम होतो. या पारंपरिक शेतीच्या ‘दुष्टचक्रा’तून बाहेर पडण्यासाठी मिश्रा यांनी ‘प्लॅन बी’ म्हणून फुलशेतीचा पर्याय स्वीकारला. सुरुवातीच्या काळात मिश्रा यांनी झेंडूसोबत गुलाब, शेवंती, मोगरा आदी विविध फुलांची लागवड करून पाहिली. मात्र इतर फुलझाडांपासून अपेक्षेइतके उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे अनुभवातून त्यांनी झेंडूच्या फुलशेतीला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला. झेंडूचे पीक तुलनेने कमी कालावधीत उत्पादन देणारे असून सण-उत्सवांच्या काळात त्याला मोठी मागणी असते. त्यामुळे योग्य वेळी उत्पादन बाजारात आणण्याचे नियोजन केल्यास चांगला दर मिळू शकतो, असा मिश्रा यांचा अनुभव आहे.

झेंडूच्या फुलशेतीसाठी पाण्याची उपलब्धता हा महत्त्वाचा घटक आहे. पाऊस नसेल तर झाडांना नियमित पाणी देणे आवश्यक असते. पाण्याची कमतरता झाल्यास फुलांचा आकार कमी होऊन उत्पादन आणि दर्जावर परिणाम होतो. सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांसाठी झेंडूची फुलशेती हा चांगला पर्याय ठरू शकतो, असे मिश्रा यांचे मत आहे. झेंडूच्या फुलांच्या दरात हंगामानुसार मोठी चढ- उतार पाहायला मिळतो. सामान्य काळात घाऊक बाजारात फुलांना साधारण १५ रुपये किलो, तर किरकोळ बाजारात सुमारे ३० रुपये किलो दर मिळतो. मात्र दसरा आणि दिवाळीच्या काळात मागणी वाढल्यामुळे किरकोळ बाजारात हाच दर १०० रुपये किलोपर्यंत पोहोचतो. अर्थात, उपलब्ध पुरवठा आणि बाजारपेठेतील मागणी यावर दर अवलंबून असतो. त्यामुळे फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना बाजाराचा कल ओळखून माल विक्रीचे नियोजन करावे लागते. केवळ व्यापारी वर्गावर अवलंबून न राहता मिश्रा यांनी थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग स्वीकारला आहे. दरवर्षी घटस्थापनेच्या दिवसापासून घरासमोर झेंडू फुलांचे विक्री केंद्र सुरू केले जाते. हे विक्री केंद्र दिवाळीपर्यंत सुरू असते. थेट ग्राहकांना फुले विकल्यामुळे मध्यस्थांची साखळी कमी होते आणि किरकोळ बाजारातील दराचा फायदा शेतकऱ्याला मिळतो. त्यामुळे उत्पादनासह विक्रीचे नियोजन केल्यास शेतकऱ्यांना चांगला नफा मिळतो.

थेट ग्राहकांना विक्रीने किरकोळ बाजार दराचा फायदा

फुलशेती हा चांगला पर्याय ^पारंपरिक पिकांसोबतच थोड्या क्षेत्रावर फुलशेती करणे हा चांगला पर्याय आहे. सिंचनाची सोय असणाऱ्या शेतकरी वर्गाने वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांची शेती केली पाहिजे. बाजारपेठेतील मागणी व सण-उत्सवांचा कालावधी लक्षात घेत लागवडीचे नियोजन केल्यास फुलशेतीतून चांगले उत्पन्न मिळू शकते. – युवराज मिश्रा, शेतकरी.

साडेतीन एकरावर लागवड यंदा मिश्रा यांनी पातूर येथील खासगी नर्सरीतून प्रति रोप साडेतीन रुपये दराने झेंडूची सुमारे १७ हजार रोपे खरेदी केली. या सर्व रोपांची साडेतीन एकर क्षेत्रावर लागवड करण्यात आली. विशेष म्हणजे, सर्व रोपांची एकाच वेळी लागवड न करता त्यांनी लागवडीचे नियोजन तीन टप्प्यांत केले. त्यामुळे फुलांचे उत्पादन वेगवेगळ्या कालावधीत मिळते आणि सण- उत्सवांच्या काळात बाजारपेठेतील मागणीचा फायदा घेता येतो.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *