Headlines

पोटाला चिरा न देता श्वानाच्या मूत्राशयातील कर्करोगाच्या गाठी काढल्या:15 वर्षांच्या एंजलवर नैसर्गिक मूत्रमार्गातून उपचार; डॉक्टरांचा भारतातील पहिल्या शस्त्रक्रियेचा दावा




गेल्या सहा महिन्यांपासून लघवीतून रक्तस्राव होत असलेल्या १५ वर्षांच्या ‘एंजल’ या शिह त्झू जातीच्या श्वानाच्या मूत्राशयातील कर्करोगाच्या दोन गाठी काढण्यात पुण्यातील पशुवैद्यकीय तज्ज्ञांना यश आले. अवघे ५.६ किलो वजन आणि वाढते वय लक्षात घेऊन पोटाला चिरा न देता नैसर्गिक मूत्रमार्गातून दुर्बिणीच्या साहाय्याने ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यात आली. भारतात श्वानावर अशा प्रकारची शस्त्रक्रिया प्रथमच केल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे. एंजलच्या लघवीतून सहा महिन्यांपासून रक्त येत होते. सुरुवातीला हा त्रास मूत्रमार्गातील संसर्ग किंवा मुतखड्यामुळे असावा, अशी शक्यता होती. मात्र, रक्तस्राव सुरूच राहिल्याने तिच्या मालकांनी पुण्यातील ‘द स्मॉल ॲनिमल क्लिनिक’मध्ये तपासणीसाठी आणले. लघवीच्या तपासणीत कर्करोगाच्या पेशी आढळल्यानंतर संगणकीय छायाचित्रण तपासणी करण्यात आली. त्यात मूत्राशयात प्रत्येकी दोन सेंटीमीटरच्या दोन गाठी आढळल्या. त्यांचे निदान ‘ट्रान्झिशनल सेल कार्सिनोमा’ या प्रकारचा कर्करोग असे झाले. पशुवैद्यकीय शल्यचिकित्सक डॉ. नरेंद्र परदेशी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ‘टीयूआरबीटी’ या अत्यल्प छेदाच्या तंत्राचा वापर करून सुमारे अडीच ते तीन तासांत शस्त्रक्रिया पूर्ण केली. सूक्ष्म कॅमेरा आणि विशेष उपकरणांच्या साहाय्याने दोन्ही गाठी काढण्यात आल्या. संपूर्ण प्रक्रियेत ०.५ मिलिलिटरपेक्षाही कमी रक्तस्राव झाला. शस्त्रक्रियेनंतर १५ मिनिटांत चालू लागली शस्त्रक्रियेनंतर अवघ्या १५ मिनिटांत एंजल चालू लागली. त्याच दिवशी तिला घरी सोडण्यात आले. पुढील दोन ते तीन दिवसांत लघवीतील रक्तस्राव कमी झाला. सध्या तिची प्रकृती सुधारत असून ती सक्रिय आहे. काढलेल्या गाठींचे नमुने पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. कर्करोगाचा प्रसार आणि पुढील उपचार याबाबतचा निर्णय अंतिम अहवालानंतर घेतला जाणार आहे. वयोवृद्ध श्वानांच्या लघवीतून सातत्याने रक्त येत असल्यास दुर्लक्ष न करता तातडीने तपासणी करावी, असे आवाहन डॉ. परदेशी यांनी केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *