![]()
शारदीय नवरात्रोत्सवाला उद्यापासून सुरुवात होत असून, जिल्ह्यातील प्रमुख देवी मंदिरांत तयारी पूर्ण झाली. पुढील १० दिवस विविध धार्मिक, आध्यात्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचा जागर रंगणार असून, भाविकांच्या सोयीसाठी सर्वच मंदिरांत यंदा विशेष नियोजन केले. श्री अंबिका देवी मंदिरात यंदा १५०० दिव्यांचा नयनरम्य दीपोत्सव साजरा होणार असल्याने यंदाचा नवरात्रोत्सव आगळा-वेगळा होणार आहे. श्री एकवीरा देवी मंदिरात यंदा विद्युत रोषणाईत विशेष बदल केला असून परिसर आकर्षक रोषणाईने उजळून निघणार आहे. येथे दररोज पहाटे ४ वाजता महाआरती होणार असून दुपारी ३ वाजता मंदिर काही वेळेसाठी बंद राहील. गर्दीच्या नियोजनासाठी महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र दर्शन रांगा केल्या असून, दीडशे कर्मचाऱ्यांचा ताफा तैनात केला आहे. भाविकांसाठी दररोज महाप्रसादाचेही आयोजन केले आहे. श्री अंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवात सचिन देव महाराजांच्या प्रवचनांचे आयोजन केले आहे. महिला भाविकांची गर्दी लक्षात घेऊन ओटी भरण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे.नेरपिंगळाई येथील पिंगळाई देवी मंदिराकडे जाणारा रस्ता यंदा नव्याने तयार केल्याने भाविकांची ये-जा सुलभ होणार असून येथे यात्रा भरणार आहे. यात्रेकरूंसाठी सुसज्ज पार्किंग व्यवस्था केली असून सुरक्षेसाठी ३० सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. शिरखेड पोलिसांचे ३० कर्मचारी, मंदिर व्यवस्थापनाचे स्वयंसेवक कायदा व सुव्यवस्था राखणार असून १० दिवस महाप्रसाद वाटप सुरू राहील. कोंढणपूर येथील श्री अंबिका देवी मंदिरात यंदा १५०० दिव्यांचा नयनरम्य दीपोत्सव साजरा होणार आहे; गेल्या वर्षी येथे ११०० दिवे प्रज्वलित केले होते. हे मंदिर भाविकांसाठी सकाळी ५ ते रात्री १०:३० या वेळेत दर्शनासाठी खुले राहील. यासह जिल्ह्यातील प्रमुख शक्तिपीठांत घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत धार्मिक अनुष्ठान र आहे. नवरात्रोत्सवाच्या नऊ रात्री पूजेपुरत्या मर्यादित नसून, विविध मंदिरांच्या प्रांगणात, सार्वजनिक मंडळांत भक्तिमय गरबा व दांडियाचा उत्साह ओसंडून वाहतो. गुजराती, राजस्थानी मराठी संस्कृतीचा सुरेख संगम या काळात पाहायला मिळतो. पारंपरिक वेशभूषा परिधान करून तरुणी, महिला देवीची भक्तीगीते व लोकगीतांच्या तालावर ठेका धरतात. यासोबतच लोककलावंतांतर्फे भारुड, गोंधळ, जोगवा आणि भजन संध्या पारंपरिक लोककलांचे सादरीकरण होते. यामुळे रात्री मंदिरांचा परिसर अध्यात्म, मनोरंजनाच्या अनोख्या संगमाने भक्तिरसात न्हाऊन निघतो.
Source link
प्रमुख शक्तिपीठांत आजपासून नवरात्र; दहा दिवस विविध धार्मिक कार्यक्रम:अंबिका देवी मंदिरात 1500 दिव्यांचा नयनरम्य दीपोत्सव