![]()
आयुष्यभर शेतात राबायचे, घर-संसार सांभाळायचा, कुटुंबाच्या गरजांसाठी झटायचे… पण ज्या पाण्यावर शेतीचे आणि संपूर्ण संसाराचे चक्र फिरते, त्या पाण्याचा अथांग साठा प्रत्यक्ष पाहण्याची संधी मात्र कधी मिळाली नाही. श्रीरामपूरमधील कष्टकरी आणि शेतकरी कुटुंबांतील
.
धरणाचे विस्तीर्ण जलाशय पाहताना महिलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. आपल्या हक्काचे पाणी येते कुठून, ते किती मोठ्या प्रमाणावर साठवले जाते, याची प्रत्यक्ष अनुभूती त्यांना प्रथमच मिळाली. लोकहक्क फाउंडेशनच्या वतीने कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत शिवणकला प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांसाठी या विशेष सहलीचे आयोजन करण्यात आले होते. रोजच्या कामाच्या व्यापात घराबाहेर पडण्याची संधी क्वचितच मिळणाऱ्या महिलांना या उपक्रमामुळे निसर्गाच्या सान्निध्यात काही क्षण मनमोकळेपणाने घालवता आले. भंडारदरा धरणातील अथांग पाणी, परिसरातील निसर्गसौंदर्य आणि धरणाचे विशाल रूप पाहून महिलांनी सहलीचा मनसोक्त आनंद लुटला.
भंडारदरा धरणाच्या पाण्यावर जिल्ह्यातील शेती, पिण्याच्या पाण्याची गरज आणि अनेक कुटुंबांचे जीवन अवलंबून आहे. मात्र, हे पाणी प्रत्यक्ष कुठून येते आणि त्याचा साठा कसा असतो, हे अनेक महिलांनी पहिल्यांदाच अनुभवले. ही सहल केवळ मनोरंजनापुरती मर्यादित न राहता पाण्याचे महत्त्व जाणून घेण्याची आणि आपल्या जलसंपत्तीशी नाते जोडण्याची संधी ठरली. लोकहक्क फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार लहू कानडे म्हणाले, शेतकरी कुटुंबातील महिला घरातील कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि शेतीतील कामांमध्ये सतत व्यस्त असतात. त्यामुळे त्यांना स्वतःसाठी वेळ देता येत नाही किंवा बाहेर फिरण्याची संधी मिळत नाही. ही बाब लक्षात घेऊन महिलांना प्रशिक्षणासोबतच वेगळा अनुभव मिळावा, आनंदाचे काही क्षण जगता यावेत, या भावनेतून सहलीचे आयोजन केले. महिलांच्या कौशल्यविकासाबरोबरच त्यांना नवे अनुभव, आत्मविश्वास आणि आनंद मिळवून देण्याचा फाउंडेशनचा हा उपक्रम लक्षवेधी ठरला.