![]()
शहरातील मोकाट कुत्र्यांचा आणि जनावरांचा वाढत्या उपद्रवामुळे नागरिक त्रस्त झाले असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेच्या निषेधार्थ सोमवारी नेवासकरांनी नगरपंचायतीवर धडक मोर्चा काढला. पिसाळलेल्या कुत्र्यांच्या हल्ल्यांत वृद्ध महिला आणि शाळकरी मुलांसह अनेक जण जखमी झाल्याच्या घटना घडूनही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करत मोर्चेकऱ्यांनी बांगड्या आणि साडी देऊन प्रशासनाचा निषेध केला. सामाजिक कार्यकर्ते शांताराम गायके, शिवा राजगिरे आणि विकास चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नेवासा पंचायत समितीच्या प्रवेशद्वारापासून मोर्चाला सुरुवात झाली. मुख्य रस्त्याने हा मोर्चा नगरपंचायत कार्यालयावर धडकला. मोर्चेकऱ्यांनी मुख्याधिकारी कार्यालय गाठले; मात्र मुख्याधिकारी उपस्थित नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. शहरातील गंभीर प्रश्नांवर निर्णय घेण्यासाठी जबाबदार अधिकारीच उपस्थित नसतील, तर दाद मागायची कुणाकडे, असा सवाल त्यांनी केला. नगरपंचायतीला तातडीने कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी नियुक्त करण्याची मागणीही करण्यात आली. यानंतर मोर्चेकऱ्यांनी नगराध्यक्षांच्या दालनात उपस्थित कार्यालयीन अधीक्षक सागर झावरे यांना घेराव घालून मोकाट कुत्रे आणि जनावरांच्या बंदोबस्ताबाबत जाब विचारला. साडी परिधान करून आलेल्या शांताराम गायके यांनी साडी काढून झावरे यांना बांगड्यांचा आहेर दिला आणि प्रशासनाच्या कारभाराचा निषेध नोंदविला. नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले पाटील यांनी मोर्चेकऱ्यांच्या मागण्यांशी सहमती दर्शवत तातडीने कारवाईचे आश्वासन दिले. मोकाट जनावरांसाठी जागेची पाहणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. बाहेरील व्यक्ती शहरात मोकाट कुत्रे आणून सोडत असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर पुलाजवळ सीसीटीव्हीच्या माध्यमातून संबंधितांवर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या मोर्चात आम आदमी पार्टीचे राज्य नेते अॅड. संजय सुखदान, शिवा राजगिरे, शांताराम गायके, विकास चव्हाण, अल्ताफ पठाण, बंडू आलवणे, विकास पोतदार, अनिल सोनवणे, योगेश वर्मा, राहुल मुंडलिक, रुपेश उपाध्ये, सुलेमान मणियार, भाजपचे शहर मंडल अध्यक्ष मनोज पारखे, व्यापारी गफुरभाई कुरेशी, सामाजिक कार्यकर्ते इम्रानभाई दारुवाले, कुणाल मांडण, जमिर बागवान, इम्रान पटेल आणि सरफराज पठाण यांच्यासह नेवासकर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. { मोकाट कुत्रे आणि जनावरांचा तातडीने बंदोबस्त करावा. { कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या घटनांना आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात. नगरपंचायतीला कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी नियुक्त करावा. { बाहेरून शहरात कुत्रे आणून सोडणाऱ्यांवर सीसीटीव्हीच्या मदतीने कारवाई करावी. नागरिकांच्या प्रमुख मागण्या
Source link
कुत्र्यांच्या दहशतीने नेवासकर रस्त्यावर; प्रशासनाला साडी अन् बांगड्यांचा आहेर:कुत्र्यांच्या हल्ल्यांमुळे नागरिकांत संताप, कारवाईचे नगराध्यक्षांचे आश्वासन