![]()
ठाण्यातील मानपाडा, आझादनगर आणि मनोरमा नगर परिसरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या निर्घृण हत्याकांडाने संपूर्ण ठाणे शहर हादरले असताना, या प्रकरणात आता एक अत्यंत धक्कादायक वळण आले आहे. पूर्णेकर यांच्या कार्यालयात घुसून गोळ्या झाडणाऱ्या आणि धारदार चॉपरने वार करणाऱ्या हल्लेखोरांपैकी एका ‘हेल्मेटधारी’ पाचव्या आरोपीला ठाणे गुन्हे शाखेने प्रयागराजमधून अटक केल्याचा दावा केला आहे. मात्र, पोलिसांनी पकडलेला अमित सिंग नावाचा आरोपी आणि हत्येच्या वेळी सीसीटीव्हीत कैद झालेला खरा हेल्मेटधारी मारेकरी यांची शरीरयष्टी पूर्णपणे विसंगत असल्याचा संशय प्रदीप पूर्णेकर यांचा मुलगा राम पूर्णेकर यांनी उघडपणे व्यक्त केला आहे. मुलाच्या या खळबळजनक विधानामुळे पोलिसांच्या तपासाभोवती संशयाचे मोठे जाळे निर्माण झाले आहे. दुसरीकडे, या हत्याकांडामागील मूळ सूत्रधारांना सत्ताधाऱ्यांचे राजकीय संरक्षण मिळत असल्याचा गंभीर आरोप करत, “माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्यावर तात्काळ कारवाई झाली नाही, तर नवरात्र संपण्यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर आमरण उपोषण करेन,” असा थेट इशारा राम पूर्णेकर यांनी दिला आहे. सीसीटीव्हीतील हेल्मेटधारी तो नाहीच! गुन्हे शाखेने या हत्याकांडातील फरार आरोपी संतोष कनोजिया उर्फ टल्ली आणि कथित हेल्मेटधारी अमित सिंग या दोघांना उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून बेड्या ठोकल्या. यावर प्रतिक्रिया देताना राम पूर्णेकर यांनी पोलिसांच्या थिअरीवरच प्रश्न उपस्थित केले. “पोलिसांनी ज्या पाचव्या आरोपीला हेल्मेटधारी म्हणून पकडले आहे, तो कोणत्याही कोनातून सीसीटीव्हीत दिसणारा व्यक्ती वाटत नाही. सीसीटीव्ही फुटेजमधील हेल्मेट घातलेल्या मारेकऱ्याची शरीरयष्टी, त्याची हालचाल आणि पकडलेल्या अमित सिंगची शारीरिक ठेवण यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. सीसीटीव्ही पाहणारा कोणीही सामान्य माणूस सांगेल की हा तो आरोपी नाही. मग खरा मारेकरी नक्की कुठे आहे?”, असा सवाल राम पूर्णेकर यांनी केला. कार्यालयात बसलेले असताना चार ते पाच मारेकऱ्यांनी दिवसाढवळ्या पूर्णेकर यांच्यावर गोळीबार करत कोयत्याने सपासप वार करून त्यांची हत्या केली होती. हल्लेखोरांपैकी एकाने चेहऱ्याची ओळख पटू नये म्हणून हेल्मेट घातले होते. पोलीस कोठडीत वाढ; अजूनही दोन पिस्तूल व चॉपरचा शोध सुरू ठाणे न्यायालयाने या हत्याकांडातील प्रमुख आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ केली आहे. मुख्य संशयित सुभाष ऊर्फ पप्या शिंदे याला 13 ऑक्टोबरपर्यंत, तर प्रयागराजमधून आणलेले संतोष कनोजिया उर्फ टल्ली आणि अमित सिंग यांना 19 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, हत्येत दोन पिस्तूल आणि तीन चॉपरचा वापर करण्यात आला होता. मात्र, अद्याप केवळ एकच पिस्तूल पोलिसांच्या हाती लागले आहे. उर्वरित शस्त्रे, आरोपींचे रक्ताने माखलेले कपडे, त्यांना आर्थिक रसद पुरवणारे आणि कट रचण्यासाठी झालेल्या गुप्त बैठकांचा तपास अजूनही प्रलंबित आहे. राजकीय आश्रय मागे घ्या, पाच मिनिटांत हत्येचा छडा लागेल! हत्येमागील राजकीय कटावर बोलताना राम पूर्णेकर यांनी माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांच्या भूमिकेवर थेट बोट ठेवले. “मी सुरुवातीपासून मीनाक्षी राजेंद्र शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांची नावे पोलिसांना दिलेली आहेत. परंतु, अद्याप त्यांच्यावर साधी चौकशीचीही कारवाई झालेली नाही. मी मोर्चामध्येही स्पष्ट सांगितले होते की, पोलिसांनी राजकीय दबाव झुगारून निष्पक्ष काम केले आणि संशयितांच्या डोक्यावरून नेत्यांचा हात बाजूला झाला, तर अवघ्या पाच मिनिटांत या खटल्याचे खरे वास्तव समोर येईल. शिवसेनेने (शिंदे गट) मीनाक्षी शिंदे यांचा तत्काळ राजीनामा घेतला पाहिजे किंवा पक्षातून त्यांची हकालपट्टी केली पाहिजे. माझ्या वडिलांच्या हत्येचे घाणेरडे राजकारण करू नका.” शिंदे सेनेची उदासीनता “वडिलांच्या निधनानंतर भाजपचे स्थानिक आमदार, खासदार, नगरसेवक भेटायला आले. उद्धव ठाकरे, संजय राऊत, मनसेचे नेते अविनाश जाधव आणि संपूर्ण आगरी समाजाने माझ्या पाठीशी ताकद उभी केली. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील एकाही नेत्याला आमच्या दुःखाची साधी विचारपूस करावीशी वाटली नाही,” अशी तीव्र खंत त्यांनी बोलून दाखवली. एकनाथ शिंदेंच्या बंगल्याबाहेर उपोषणाचा इशारा; CBI, CID चौकशीचा आग्रह आपल्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी टोकाचा लढा देण्याचा निर्धार व्यक्त करताना राम पूर्णेकर म्हणाले, “मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सर्व वस्तुस्थिती त्यांच्या कानावर घालायची आहे. आम्ही सर्व कायदेशीर मार्ग अवलंबले आहेत. नवरात्रीचे नऊ दिवस संपायच्या आत आम्हाला जर न्याय मिळाला नाही, तर माझ्यासोबत कोणी आले नाही तरी चालेल, मी एकटा एकनाथ शिंदे साहेबांच्या ठाण्यातील बंगल्याबाहेर उपोषणाला बसणार आहे.” सीबीआय चौकशी हवी “स्थानिक पोलिसांवर प्रचंड राजकीय दबाव असल्याने या खटल्याची सखोल आणि निष्पक्ष चौकशी सीआयडी (CID) किंवा थेट सीबीआय (CBI) कडे सोपवण्यात यावी,” अशी आग्रही मागणी त्यांनी केली. प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येला आता राजकीय संघर्षाचे आणि संशयास्पद तपासाचे वळण मिळाले असून, मुलाने थेट पकडलेल्या आरोपीच्या ओळखीवरच शंका उपस्थित केल्यामुळे ठाणे पोलिसांच्या पुढील तपासाकडे संपूर्ण राजकीय आणि सामाजिक वर्तुळाचे लक्ष वेधले गेले आहे. ——————————————————————— हेही वाचा… मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी आता 26 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ: मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती, 16 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार अंतिम यादी मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार यादीवरील दावे आणि हरकती दाखल करण्यासाठी २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली. सुधारित वेळापत्रकानुसार दावे-हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया १० नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार असून, अंतिम मतदार यादी १६ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
प्रदीप पूर्णेकर यांच्या मुलाचा ठाणे पोलिसांच्या तपासावर संशय:सीसीटीव्हीतील तो मारेकरी अन् पकडलेला आरोपी वेगळाच; खरा शूटर कोण? मीनाक्षी शिंदेंवर कारवाईची मागणी