.

पावसाअभावी चारा पिके धोक्यात आल्याने संभाव्य टंचाईचा सामना करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने जिल्ह्यात तालुकानिहाय सर्वेक्षण सुरू केले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ६४ हजार पशुपालकांशी संपर्क साधून पशुधनाची माहिती संकलित करण्यात आली आहे. पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून पशुधनाची संख्या, चाऱ्याची मागणी आणि उत्पादनाची क्षमता यांचा एकत्रित आढावा घेऊन स्वतंत्र नियोजन केले जाणार आहे. टंचाईच्या काळात पशुधनाला चारा उपलब्ध करून देण्यासाठी हा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ महत्त्वाचा ठरणार आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात टंचाई आढावा बैठका घेताना चारा टंचाईबाबत अनेक तक्रारी समोर आल्या. पशुधनाची उपलब्ध आकडेवारी, चारा उत्पादनाचे नियोजन आणि बियाणे वाटपातील त्रुटी लक्षात घेऊन विखे पाटील यांनी प्रत्येक तालुक्यासाठी स्वतंत्र आराखडा तयार करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या.
त्यानुसार पशुसंवर्धन विभागाचे वरिष्ठ आणि क्षेत्रीय अधिकारी सर्वेक्षण करत आहेत. यात पशुपालकांची संख्या, पशुधनाची संख्या, चारा उत्पादक शेतकरी, चाऱ्याची मागणी करणारे शेतकरी आणि शासनाच्या योजनेतून मोफत बियाणे घेऊन चारा उत्पादन करण्यास इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांची माहिती गोळा केली जात आहे. जिल्ह्यात यापूर्वी पशुधनाची गणना करून जनावरांचे टॅगिंग करण्यात आले आहे. आता या नोंदींची पुन्हा पडताळणी होत असल्याने चाऱ्याची नेमकी गरज निश्चित करण्यास मदत होणार आहे. अहिल्यानगर जिल्हा दूध उत्पादनासाठी ओळखला जात असल्याने पशुधनाचे संरक्षण आणि चारा उपलब्धतेचे नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, कमी जागेत नियंत्रित पद्धतीने हिरवा चारा तयार करण्यासाठी हायड्रोफोनिक्स तंत्रज्ञानाचा प्रायोगिक वापर करण्याची सूचना विखे पाटील यांनी केली आहे. या उपक्रमासाठी आवश्यक सहकार्य करण्याची तयारीही त्यांनी दर्शवली आहे.
चारा उत्पादनासाठी प्रशासनाचा स्वतंत्र आराखडा प्रत्येक तालुक्यातील पशुधन आणि चाऱ्याची मागणी निश्चित करणे. मोफत बियाणे घेऊन चारा उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांची नोंद करणे. पशुधनाच्या टॅगिंग व नोंदींची पडताळणी करणे. हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाचा प्रायोगिक वापर करून हिरव्या चाऱ्याचे पर्यायी उत्पादन तपासणे.