Headlines

उपोषणाचा पाचवा दिवस:मतदारांच्या हक्कांसाठी रिपाइंचा एल्गार; एसआयआर रद्दसाठी साखळी उपोषण, निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी; स्फूर्तिगीतांनी लक्ष वेधले‎




मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला (एसआयआर) विरोध दर्शवत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) पक्षाच्या वतीने अहिल्यानगर शहरात सुरू असलेल्या साखळी उपोषणाचा मंगळवारी (दि. १३) पाचवा दिवस होता. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांनी राजीनामा द्यावा, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि एसआयआर प्रक्रिया रद्द करावी, अशा मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत. मार्केटयार्ड चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन सुरू आहे. मतदार यादीतील कथित त्रुटी आणि पात्र मतदारांची नावे वगळली जाण्याच्या शक्यतेबाबत आंदोलकांनी चिंता व्यक्त केली. पात्र नागरिकांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी पुनरीक्षण प्रक्रिया पारदर्शक असावी, अशी मागणी त्यांनी केली. आंदोलनस्थळी दिवसभर घोषणाबाजी करण्यात आली. रात्रीदेखील साखळी उपोषण सुरू ठेवण्यात आले. पोवाडे, देशभक्तीपर गीते आणि स्फूर्तिगीतांच्या माध्यमातून आंदोलकांनी नागरिकांचे लक्ष वेधले. मतदार यादीतील नावांबाबत त्रुटी आढळल्यास त्या दुरुस्त करण्यासाठी नागरिकांना योग्य मार्गदर्शन मिळावे, तक्रारींचे वेळेत निराकरण व्हावे आणि पात्र मतदारांची नावे चुकीने वगळली जाणार नाहीत, याची खात्री करावी, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली. या आंदोलनात रिपाइंचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के यांच्यासह गुलाम शेख, विजय शिरसाठ, अजीम खान, नईम शेख, विल्सन रुकडीकर, स्वप्नील साठे, राहुल ठोकळ आणि अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. महिला आघाडीच्या ज्योती पवार, संपदा म्हस्के, मनीषा गायकवाड, विश्रांती पठारे, प्रियंका पठारे, शीतल नाटिकर, रेश्मा जाधव आणि प्रमिला शिरसाठ यांच्यासह महिला कार्यकर्त्यांनीही सहभाग घेतला. समविचारी पक्ष व विविध संघटनांचे प्रतिनिधी आंदोलनस्थळी उपस्थित राहून पाठिंबा देत आहेत. प्रमुख मागण्या मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याची मागणी. त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. एसआयआर प्रक्रिया रद्द करावी. पात्र मतदारांची नावे वगळली जाणार नाहीत, याची खात्री करावी. मतदारांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण करावे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *