Headlines

711 घटांची स्थापना; अखंड ज्योत सप्ताहास प्रारंभ:मालखेडमध्ये अंबा देवी नवरात्रोत्सव उत्साहात, महाआरती, भजन, कीर्तन, देवी स्तोत्रांचे पठण सुरु‎




तालुक्यातील भानामती नदीच्या काठावर वसलेले मालखेड येथील ग्रामदैवत अंबा माता व शिव मंदिरात नवरात्रोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे. अखंड ज्योत सप्ताहानिमित्त यंदा तब्बल ७११ घटांची विधिवत स्थापना करण्यात आली आहे. सकाळी व सायंकाळी होणाऱ्या महाआरतीसाठी शेकडो भाविक उपस्थित राहतात. नवरात्रोत्सवामुळे मालखेड नगरीला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मालखेड येथील अंबा माता मंदिरात सन १९९७ पासून अखंड ज्योत स्थापनेची परंपरा सुरू झाली. तेव्हापासून दरवर्षी भक्तिभावाने ही परंपरा जोपासली जात आहे. यंदा ७११ घटांची स्थापना करण्यात आल्याने उत्सवाचे धार्मिक महत्त्व अधोरेखित झाले आहे. नवरात्रोत्सवादरम्यान सकाळी व सायंकाळी महाआरती, भजन, कीर्तन, देवी स्तोत्रांचे पठण असे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. पुराणकालीन संदर्भांनुसार, विदर्भ प्रदेशाचा राजा वृषभदेव याला दहा पुत्र होते. त्यापैकी केतुमाल या पुत्राच्या नावावरून या परिसरातील वस्तीला सुरुवातीला ‘मालकेतू’ असे संबोधले जात होते. कालांतराने या नावाचा अपभ्रंश होऊन ‘मालखेड’ हे नाव रूढ झाल्याची आख्यायिका सांगितली जाते. स्थानिक धार्मिक परंपरेनुसार, केतुमालाने भानामती नदीच्या काठावर अंबा मातेची भक्तिभावाने आराधना केली. त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन देवी प्रकट झाली. भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी याच ठिकाणी ती स्वयंभू स्वरूपात विराजमान झाली, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे अंबा माता ही मालखेडवासीयांची ग्रामदेवता म्हणून ओळखली जाते. सातारा जिल्ह्यातील शंकपाळ कुळी घराण्याची कुलदेवता मालखेडवासिनी अंबा माता असल्याचे सांगितले जाते. याशिवाय सातारा जिल्ह्यासह अनेक गावांतील भाविकांचीही अंबा माता कुलदेवता आहे. त्यामुळे वर्षभर मंदिरात भाविकांची वर्दळ असते. विशेषतः नवरात्रोत्सवात राज्यासह इतर राज्यांतील विविध भागांतून भाविक दर्शनासाठी येतात. घटस्थापना करतात. या कार्यक्रमांमुळे मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघतो. गावातील पंडित संजयपंत जोशी महाराज यांच्याकडून नियमित पूजा-अर्चा व आरतीचे नियोजन केले जाते. उत्सवानिमित्त भव्य महाप्रसादाचेही आयोजन शुक्रवार, २३ ऑक्टोबरला करण्यात आले आहे. काल्याचे कीर्तन महंत आदेशपुरी महाराज यांच्या सुमधुर वाणीतून होणार आहे. परिसरातील विविध गावांमधील भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतात. मंदिराच्या सेवेसाठी महंत शिवानंद पुरी महाराज गेल्या ३२ वर्षांपासून अहोरात्र कार्यरत आहेत. ते श्री पंचदशनाम जुना आखाड्याचे सचिव म्हणूनही जबाबदारी सांभाळतात. त्यांच्या कार्यकाळात मंदिराचा जीर्णोद्धार झाला. विकासही झाला, असे ग्रामस्थ सांगतात. रेल्वे प्रवासादरम्यानही घडते मंदिराचे दर्शन मुंबई-नागपूर रेल्वेमार्ग मंदिराच्या शेजारून जात असल्याने रेल्वे प्रवासादरम्यानही प्रवाशांना अंबा माता मंदिराचा परकोट, घुमट, कळसाचे दर्शन घडते. हिरवाईने नटलेला परिसर, पिंपळ व चिंचेची झाडे, नदीचे पात्र, शेतपायवाटा यांमुळे मंदिर परिसर अधिकच नयनरम्य दिसतो. मंदिराच्या गर्भगृहाचे प्रवेशद्वार ठेंगणे आहे. आत प्रवेश करताच स्वयंभू अंबा मातेचे दर्शन घडते. निसर्गसौंदर्य आणि धार्मिक परंपरेचा संगम असलेले हे मंदिर परिसरातील भाविकांसाठी श्रद्धास्थान बनले आहे. महाबळेश्वरहून येऊन पूर्वजांची परंपरा कायम देवी भागवतासह इतर पुराणग्रंथांत मालखेड येथील भानामती नदी आणि अंबा मातेचा उल्लेख आढळतो, ‘क्षत्रियांचा इतिहास’ या पुस्तकातही मालखेडवासिनी अंबा मातेचा उल्लेख आहे. आमच्या घराण्यातील पूर्वज महाबळेश्वरहून दरवर्षी दर्शनासाठी येथे येत असत. – प्रदीप भिल्लारे, भाविक, महाबळेश्वर, जि. सातारा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *