Headlines

एफडीए कारवाई:संभाजीनगरात बजाज ऑटो कँटीनचा परवाना निलंबित, अस्वच्छतेविषयी नोटिसीनंतरही त्रुटी




वाळूज एमआयडीसीतील कामगारांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कॉर्पोरेट कँटीन आस्थापनांवर अन्न व औषध प्रशासनाने मोहिमेअंतर्गत कारवाई केली आहे. बजाज कंपनीच्या कँटीनचा कंत्राटदार असलेल्या ‘मे. सोडेक्सो इंडिया सर्व्हिसेस प्रा. लि.’ या आस्थापनेचा अन्न परवाना अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ मधील नियमांच्या उल्लंघनाप्रकरणी पुढील आदेशापर्यंत निलंबित केल्याची माहिती सहआयुक्त श्रीकांत करकळे यांनी दिली आहे. सहायक आयुक्त दयानंद पाटील यांनी निलंबनाचे आदेश जारी केले आहेत. दररोज ४ हजार कामगार, कर्मचाऱ्यांच्या जेवण्याची सोय करणाऱ्या या कँटीनची अन्न सुरक्षा अधिकारी कुचेकर यांनी आधी तपासणी केली होती. त्यात अन्न सुरक्षा नियमांची पायमल्ली होत असल्याचे उघड झाल्यानंतर सुधारणा नोटीस बजावली होती. सोडेक्सो प्रशासनाने नोटिसीवर सादर केलेला खुलासा समाधानकारक नसल्याने १२ ऑक्टोबर रोजी प्रशासनाने केली. यातही गंभीर त्रुटी तशाच आढळल्या. निलंबनाच्या कालावधीत सोडेक्सोने अन्न पदार्थाचे उत्पादन, साठा, विक्री अथवा कँटीनमध्ये वितरण बंद ठेवावे, असे निर्देश दिले आहेत. फेरतपासणीतील अस्वच्छता अन् दुर्लक्षाचा पंचनामा तापमान नियंत्रणाचा अभाव: अन्न गरम किंवा थंड ठेवणे तसेच फ्रीझिंगसाठी पुरेशी यंत्रणा आणि तापमान नियंत्रणाची सोय नव्हती.
अस्वच्छता, साचलेले पाणी: अन्न तयार करणे व हाताळण्याच्या जागेत अत्यंत अस्वच्छता होती. तिथे पाणी साचून राहत होते.
धोकादायक स्वयंपाकघर: स्वयंपाकघरातील मजले निसरडे बनले होते, भिंती, छत व दरवाजांचे प्लास्टर उखडलेल्या अवस्थेत होते.
उपायांचा अभाव: नाल्यांची (ड्रेनेज) रचना अयोग्य होती आणि कीटक किंवा झुरळांना रोखण्यासाठी कोणतेही सापळे बसवले नव्हते. अन्नपदार्थांभोवती घाण आढळली.
पुढे काय? : कँटीनचालकाला एफडीएने दर्शवलेल्या अस्वच्छता, पाणी चाचणी आणि पेस्ट कंट्रोलबाबतच्या सर्व त्रुटी आधी दूर कराव्या लागतील. त्यानंतर सुधारणा अहवाल सादर करून पुनर्तपासणीची विनंती करावी लागेल. एफडीए अधिकारी प्रत्यक्ष पाहणी करून समाधानी झाल्यास आणि लेखी परवानगी दिल्यावरच कँटीन पुन्हा सुरू करता येईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *