Headlines

टँकरऐवजी शाश्वत पाण्याचे स्रोत निर्माण करण्याला प्राधान्य द्यावे- जिल्हाधिकारी:पंचनाम्यांचा अहवाल 3 दिवसांत सादर करण्याचे निर्देश‎




जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने आतापासूनच धडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पाणीटंचाई निवारणार्थ ग्रामपंचायतनिहाय सूक्ष्म नियोजन करून तातडीने कृती आराखडा सादर करावा. तसेच, टँकरच्या दैनंदिन नियंत्रणासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात यावा. नियोजन करताना शाश्वत स्रोत निर्माण होतील, अशाच प्रस्तावांना प्राधान्य द्या, असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी दिले. जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजना आणि दुष्काळी परिस्थितीबाबत आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (१४ ऑक्टोबर) बैठक पार पडली. या बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, कन्नडचे उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, पैठणच्या उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, छत्रपती संभाजीनगरचे तहसीलदार शिवानंद बिडवे, उमेश पाटील आदी उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम. व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांच्यासह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले. जिल्हाधिकारी गौडा यांनी स्पष्ट केले की, प्रत्येक गावातील उपलब्ध जलस्रोत, पाण्याची मागणी आणि संभाव्य टंचाई लक्षात घेऊन गटविकास अधिकाऱ्यांनी तातडीने ग्रामपंचायतनिहाय कृती आराखडा तयार करावा, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. नादुरुस्त पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती, तात्पुरत्या पाइपलाइन, विहिरींचे अधिग्रहण आणि खोलीकरण यासारख्या उपाययोजना प्राधान्याने राबवाव्यात. अत्यावश्यक परिस्थितीतच टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा आणि पिण्याच्या पाण्याला प्राधान्य द्यावे. शेतकऱ्यांना शासनाची मदत वेळेत मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी नुकसानीच्या पंचनाम्यांचे अंतिम अहवाल येत्या दोन ते तीन दिवसांत जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावेत. पात्र शेतकऱ्यांच्या याद्या अद्ययावत ठेवून मदत वितरणाच्या प्रक्रियेत कोणताही विलंब होणार नाही, याची दक्षता अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. जिल्ह्यात ९७ गावांना १७० टँकरचा आधार जिल्ह्यात ९७ गावे आणि २७ वाड्यांसाठी तब्बल १७० खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. यात गंगापूर तालुक्यात सर्वाधिक ६७, पैठणमध्ये ४९, वैजापूरमध्ये २८, छत्रपती संभाजीनगर तालुक्यात १६ आणि फुलंब्री तालुक्यात १० टँकर सुरू आहेत. टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असलेल्या गावांची संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी करावी, टँकरच्या फेऱ्या आणि वेळापत्रकाची तपासणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. पाण्याचा अनधिकृत उपसा होणार नाही, याचीही दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पाण्याची लाइन, बोअरवेल दुरुस्ती Ãटँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याऐवजी शाश्वत पाण्याचे स्रोत निर्माण करण्यावर भर आहे. याबाबत सूचना दिल्या आहेत. जुन्या विहिरी, पाण्याची लाइन, बोअरवेल दुरुस्ती करण्यात येणार आहे. यासोबतच पाणी योजनेच्या कामाला देखील प्राधान्य देण्यात येणार आहे. अत्यंत अत्यावश्यक असेल, तरच आम्ही पाण्याचे टँकर देणार आहोत. -विनय गौडा जी. सी., जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *