![]()
सटाण्यातील राष्ट्रीय महामार्गाचे अपूर्ण काम तीन महिन्यांत पूर्ण करा आणि शहराच्या बायपास रस्त्याचा विकास आराखडा (डीपीआर) तातडीने सादर करा, असे निर्देश केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी संबंधित विभागाचे सचिव शेलार यांना दिले. आमदार दिलीप बोरसे यांनी दिल्ली येथे गडकरी यांची भेट घेऊन निवेदन सादर केल्यानंतर प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. नंदुरबार- साक्री- पिंपळनेर- सटाणा- चांदवड- मनमाड- शिर्डी राष्ट्रीय महामार्ग ७५२ जी अंतर्गत सटाणा ते मंगरूळ या रस्त्याचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. मात्र, सटाणा शहरातील काम अपूर्ण असल्याने वाहतूक कोंडी, अपघात आणि सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. सुकडनाला ते आरम नदीदरम्यान रस्त्याची मोजणी करून शासकीय जागा निश्चित करावी आणि अतिक्रमणे हटवावीत. आवश्यक ठिकाणी भूसंपादन करावे. चौपदरीकरण करताना पावसाच्या पाण्यासाठी बांधिव गटारे, फुटपाथ, पाणीपुरवठा व मलनिस्सारण वाहिन्या आणि विद्युत वाहिन्यांसाठी काँक्रीट डक्टची तरतूद करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. आरम नदी पूल ते कंधाना फाटा या भागातील भूसंपादन तातडीने करावे. सटाणा महाविद्यालयासमोरील पुलाचे चौपदरीकरण करावे, तसेच आरम नदी पूल ते एमव्हीपी संस्थेच्या आयटीआयदरम्यान डांबरी बाजूपट्ट्या आणि बांधिव गटारे उभारावीत, अशी मागणीही करण्यात आली आहे. रिंगरोडचा डीपीआर तयार करा शहराच्या बाह्यवळण रस्त्यास मंजुरी देऊन डीपीआर कन्सल्टंट नियुक्त केल्याबद्दल आमदार बोरसे यांनी गडकरी यांचे बागलाणवासीयांच्या वतीने आभार मानले. राष्ट्रीय महामार्गासह मालेगाव, नामपूर आदी मार्गांवरील वाहतुकीमुळे शहरात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पूर्वेकडील बाह्यवळण रस्ता आवश्यक आहे. पश्चिमेकडील बाह्यवळणामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीचे अंतरही कमी होईल.
Source link
सटाणा शहरातील महामार्गाचे काम तीन महिन्यांत पूर्ण करा:केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश