Headlines

Cases Against Dodla Dairy, Priyagold & UEIR Organic Foods


5 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण अर्थात FSSAI ने खाद्यपदार्थांमध्ये गंभीर अनियमितता आढळल्यानंतर तीन मोठ्या कंपन्यांविरुद्ध फौजदारी खटले दाखल करण्याची कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. यामध्ये प्रियागोल्ड बिस्किटे बनवणारी कंपनी ‘सूर्या फूड अँड ॲग्रो’, ‘डोडला डेअरी’ आणि ‘UEIR ऑर्गेनिक फूड्स’ यांचा समावेश आहे.

FSSAI ला बिस्किटांमध्ये जनावरांना खाऊ घातला जाणारा कोंडा, दुधात डिटर्जंट व कास्टिक सोडा आणि मनुकांमध्ये धोकादायक कीटकनाशकांचे अवशेष आढळले आहेत. FSSAI ने शनिवारी सोशल मीडिया पोस्टद्वारे या तिन्ही कंपन्यांविरुद्ध प्रकरण सुरू करण्याची माहिती दिली.

प्रियागोल्ड बिस्किटे: तंतूंचे प्रमाण वाढवण्यासाठी जनावरांचा कोंडा मिसळला

FSSAI ला एका ग्राहकाकडून प्रियागोल्ड बिस्किटे बनवताना निष्काळजीपणा केला जात असल्याची तक्रार मिळाली होती. तक्रारीनंतर अन्नसुरक्षा पथकाने सूर्या फूड अँड ॲग्रोच्या प्रकल्पाची पाहणी केली असता, तेथे अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या गंभीर त्रुटी आढळून आल्या.

तपासणी अहवालानुसार कंपनी बिस्किटमध्ये तंतूंचा स्रोत वाढवण्यासाठी ज्या कोंड्याचा वापर करत होती, तो मानवांच्या सेवनासाठी योग्य नव्हता. हा कोंडा पशूंच्या चाऱ्यासाठी तयार करण्यात आला होता.

याशिवाय प्लांटमधील स्वच्छता, कीड नियंत्रण, कर्मचाऱ्यांची स्वच्छता आणि वस्तूंच्या देखभालीमध्येही अनियमितता आढळून आली. FSSAI ने यापूर्वी कंपनीचा परवाना निलंबित केला होता आणि आता न्यायालयात खटला चालवण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.

पशूंच्या कोंड्यामुळे होणारे नुकसान: मायकोटॉक्सिन आणि बुरशीजन्य संसर्गाचा धोका निर्माण होऊ शकतो तसेच पचनाशी संबंधित गंभीर आजार होऊ शकतात.

डोडला डेअरी: फुल क्रीम दुधात डिटर्जंट आणि कास्टिक सोडा आढळला

दुसरे प्रकरण डोडला डेअरीशी संबंधित आहे. FSSAIच्या पथकाने तपासणीसाठी डोडला डेअरीच्या ‘फुल क्रीम मिल्क’चा नमुना घेतला होता. अन्नविश्लेषकांनी प्राथमिक तपासणीत दुधातील चरबीचे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा कमी आढळल्याने ते सब-स्टँडर्ड म्हणजेच निकृष्ट दर्जाचे घोषित केले होते.

कंपनीने या निर्णयाविरोधात अपील केले, त्यानंतर नमुना ‘रेफरल फूड लॅबोरेटरी’कडे पाठवण्यात आला. रेफरल लॅबच्या तपासणीत उघड झाले की दूध केवळ निकृष्ट दर्जाचे नव्हते, तर त्यात डिटर्जंट आणि कास्टिक सोडाची उपस्थिती असल्याने ते आरोग्यासाठी पूर्णपणे ‘असुरक्षित’ होते. लॅबच्या अहवालाच्या आधारे डोडला डेअरी तसेच तिचे उत्पादन आणि मार्केटिंगशी संबंधित अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

दुधातील डिटर्जंट/कास्टिक सोड्याचे दुष्परिणाम: पोटात अल्सर, आतड्यांना नुकसान, यकृत आणि मूत्रपिंडांवर गंभीर परिणाम होऊ शकतो.

UEIR ऑर्गेनिक फूड्स: पिवळ्या मनुकांमध्ये आढळलेल्या धोकादायक कीटकनाशकाचा परिणाम

तिसरी कारवाई UEIR ऑर्गॅनिक फूड्सविरुद्ध करण्यात आली आहे. FSSAI ने कंपनीकडून विकल्या जाणाऱ्या ‘यलो रेझिन्स’ म्हणजेच पिवळ्या मनुक्यांचा नमुना घेऊन प्रयोगशाळेत तपासणी केली होती.

प्रयोगशाळेच्या अहवालात मनुक्यांमध्ये निर्धारित मानकांपेक्षा अधिक पेस्टिसाइड रेसिड्यू म्हणजेच कीटकनाशकांचे अवशेष आढळले. ऑर्गॅनिक म्हणजेच सेंद्रिय म्हणून विकल्या जाणाऱ्या उत्पादनात रसायने आणि कीटकनाशके आढळणे हे अन्नसुरक्षा नियमांचे थेट उल्लंघन आहे. यासाठी FSSAI ने कंपनीविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

मनुक्यांमधील कीटकनाशकांमुळे होणारे नुकसान: दीर्घकाळ सेवन केल्यास हार्मोन्स आणि मज्जासंस्थेवर परिणाम होऊ शकतो.

अन्नसुरक्षा कायदा २००६: असुरक्षित अन्न विकल्यास शिक्षा

अन्नसुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ (FSS Act 2006) अंतर्गत निकृष्ट किंवा असुरक्षित खाद्यपदार्थ विकणे हा गुन्हा आहे. दुधात डिटर्जंट आणि बिस्किटांमध्ये प्राण्यांचा कोंडा मिसळल्यास ते अन्न ‘असुरक्षित’ श्रेणीत येते.

या कायद्यानुसार संबंधित कंपन्यांचे परवाने रद्द करण्यासोबतच जबाबदार अधिकाऱ्यांवर मोठा दंड आणि न्यायालयीन खटल्यानंतर कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. FSSAI ने स्पष्ट केले आहे की ग्राहकांच्या आरोग्याशी आणि अन्नसुरक्षेशी कोणत्याही प्रकारची तडजोड सहन केली जाणार नाही.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *