![]()
गोरेगाव पूर्व भागातील दिंडोशी परिसरात एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. 14 ऑक्टोबरच्या रात्री एका दहा वर्षांच्या मुलीने 18 महिन्यांच्या चिमुकलीला इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून थेट मोकळ्या डक्टमध्ये फेकल्याने त्या निष्पाप चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी हळहळ आणि संताप व्यक्त केला जात आहे. पीडित कुटुंबाने या घटनेमागे मोठा कट असल्याचा संशय व्यक्त केला आहे. मयत मुलीच्या वडिलांनी आरोप केला आहे की, ज्या अल्पवयीन मुलीवर या खुनाचा संशय आहे, तिच्या आईनेच आम्हाला घर खाली करण्यास भाग पाडण्यासाठी हे भयंकर कारस्थान रचले असावे. पीडित कुटुंब 1 ऑक्टोबर रोजीच ‘नागरी निवारा’ परिसरातील या इमारतीत राहायला आले होते आणि ते संशयित मुलीच्या समोरच्याच फ्लॅटमध्ये राहत होते. सध्या संशयित कुटुंब तिथून निघून गेले असले तरी ते पोलिसांच्या संपर्कात असल्याचे समजते. सीसीटीव्ही फुटेज आणि चौकशीची मागणी नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, इमारतीतील सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही 10 वर्षीय मुलगी चिमुकलीला डक्टमध्ये फेकत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. या भयंकर कृत्यानंतर ती स्वतःच्या घरात जाताना आणि नंतर निर्धास्तपणे सायकल चालवतानाही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या संपूर्ण प्रकारात सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या आणखी एका मुलीचा सहभाग असू शकतो, त्यामुळे तिच्याही भूमिकेची सखोल चौकशी व्हावी, अशी आग्रही मागणी पीडित कुटुंबाने पोलिसांकडे केली आहे. मृत मुलीच्या वडिलांनी अपघात असल्याचा दावा फेटाळला मयत मुलीच्या वडिलांनी सुरुवातीपासूनच हा केवळ अपघात असल्याचा दावा फेटाळून लावला होता. कारण त्यांची मुलगी इतकी लहान होती की ती स्वतःहून पॅरापेटवर (कठड्यावर) चढूच शकत नव्हती. या घटनेबाबत बोलताना ते म्हणाले, रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास मला समजले की माझी मुलगी खाली पडली आहे आणि तिला दुखापत झाली आहे. मी आणि माझी पत्नी तातडीने रुग्णालयात पोहोचलो, तिथे आम्हाला सांगण्यात आले, की ती आता या जगात राहिली नाही. त्यानंतर आम्हाला पोलिस चौकीत पाठवण्यात आले. माझी मुलगी अवघी दीड फूट उंच होती. ती इतक्या उंचावर कशी चढू शकते आणि तिथून कशी पडू शकते? तसेच, या संपूर्ण प्रकरणात नातेवाईकांनी हस्तक्षेप केल्यानंतरच पोलिस कारवाईला वेग आला आणि त्यानंतरच पोलिसांनी पंचनामा करत इमारत व सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली, असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. सायकलवरून झालेला क्षुल्लक वाद मयत चिमुकलीच्या वडिलांनी या घटनेमागे त्यांच्या मोठ्या मुलाच्या सायकलवरून झालेला वाद कारणीभूत असल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यांच्या माहितीनुसार, शेजाऱ्यांनी सायकलमुळे ये-जा करण्यास अडचण होत असल्याची तक्रार केली होती. यानंतर त्यांच्या मुलाने सामंजस्याची भूमिका घेत फ्लॅटच्या मुख्य दरवाजासमोरील (सेफ्टी डोअर) सायकल तत्काळ हटवून ती खिडकीजवळ ठेवली होती. केवळ याच कारणावरून हा भयंकर प्रकार घडला असावा, असा त्यांचा अंदाज आहे. घर खाली करण्यासाठी रचलेला कट या घटनेमागे शेजाऱ्यांचा मोठा कट असल्याचा गंभीर आरोप मयत मुलीच्या वडिलांनी केला आहे. आम्ही 1 ऑक्टोबरलाच येथे राहायला आलो होतो, मग अवघ्या 13 दिवसांत त्यांच्या मनात इतका द्वेष कसा निर्माण झाला? असा सवाल करत त्यांनी शेजाऱ्यांच्या हेतूवर शंका उपस्थित केली. त्यांच्या मते, शेजारील जोडप्याला त्यांनी हे घर सोडून जावे असे वाटत होते. त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडल्यास हे कुटुंब घाबरून घर खाली करेल, याच उद्देशाने संशयित अल्पवयीन मुलीच्या आईनेच तिला चिमुकलीला डक्टमध्ये फेकून देण्यास प्रवृत्त केले असावे, असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे.
Source link
10 वर्षांच्या मुलीने 18 महिन्यांच्या चिमुकलीला 6 व्या मजल्यावरून फेकले!:मुलीच्या आईवर कटाचा संशय; गोरेगावातील धक्कादायक घटना