![]()
“मीरा-भाईंदर शहरात लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारांवर आणि सामान्य नागरिकांवर महापालिकेच्या सभागृहात नगरसेवकांकडून भरदिवसा जीवघेणे हल्ले केले जातात. एवढ्यावरच न थांबता, भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 250 ते 300 जणांचा जमाव मध्यरात्री एका तरुण आयएएस (IAS) महापालिका आयुक्तांच्या घरात बेकायदेशीरपणे घुसतो, त्यांच्या पत्नी व लहान मुलांसमोर त्यांना तब्बल 3 ते 4 तास ओलीस (बंधक) ठेवतो आणि पोलिसांवर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी दबाव आणतो. हा संपूर्ण प्रकार म्हणजे लोकशाहीची उघड हत्या आणि सत्तेचा नंगानाच आहे. अशा गुंड प्रवृत्तीच्या आमदार नरेंद्र मेहता यांची आमदारकी तत्काळ रद्द करण्यात यावी आणि घुसखोरी करणाऱ्या नगरसेवकांचे पद बरखास्त करावे,” अशी आक्रमक आणि खळबळजनक मागणी शिवसेना नेते तथा आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे. मीरा-भाईंदर महापालिकेतील अभूतपूर्व हिंसाचार आणि आयुक्तांच्या बंगल्यावर झालेल्या मध्यरात्रीच्या हायव्होल्टेज राड्यानंतर आमदार प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप आमदार नरेंद्र मेहता आणि त्यांच्या नगरसेवकांवर जोरदार निशाणा साधला. या संदर्भात त्यांनी थेट राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलीस महासंचालक आणि पोलीस आयुक्तांना लेखी पत्र पाठवून उच्चस्तरीय चौकशी व कठोर कारवाईची मागणी केली आहे. 17 वर्षांच्या राजकीय इतिहासात असा काळा दिवस पाहिला नाही! शहरातील ढासळलेल्या राजकीय संस्कृतीवर भाष्य करताना प्रताप सरनाईक म्हणाले, “गेली 17 वर्षे मी स्वतः या परिसराचे विधिमंडळात प्रतिनिधित्व करत आहे. आमच्या आधी अनेक वर्षे विधान परिषदेत राहिलेले मुजफ्फर हुसेन आणि माजी आमदार गीता जैन यांनीही या शहराचे नेतृत्व केले. वेगवेगळ्या पक्षांचे विचार वेगळे होते, पण सभागृहाची आणि पदाची प्रतिष्ठा नेहमी राखली गेली. मात्र, यंदाच्या निवडणुकीत नरेंद्र मेहता आमदार झाले आणि भाजपला पाशवी बहुमत मिळाले, तेव्हापासून मीरा-भाईंदरमध्ये गुंडगिरीचे राज्य सुरू झाले आहे.” बहुमताचा दुरुपयोग “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा समोर ठेवून जनतेने कमळाच्या चिन्हाला भरभरून मतदान केले. मात्र, सत्ता हाती येऊन 8 महिने झाले तरी पालिकेची एकही सर्वसाधारण सभा शांततेत पार पडलेली नाही. दर सभेत गदारोळ, दमदाटी आणि मारहाण हेच सत्ताधाऱ्यांचे धोरण बनले आहे.” पत्रकारांवर पालिकेत हल्ला; 15 ते 20 नगरसेवकांनी फरपटत नेऊन मारले! महापालिकेतील घटनेचा पाढा वाचताना सरनाईक म्हणाले, महापालिकेच्या सभागृहात कामकाज सुरू असताना सत्ताधारी भाजपच्या तब्बल 15 ते 20 नगरसेवक आणि नगरसेविकांनी थेट पत्रकार कक्ष आणि नागरिक गॅलरीत घुसून जागरूक नागरिक आणि पत्रकारांवर हल्ला केला. त्यांना मारहाण करत फरफटत बाहेर काढण्यात आले. हे सर्व सीसीटीव्ही (CCTV) फुटेज आणि व्हायरल व्हिडिओंमध्ये उघड दिसत असतानाही, स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि पत्रकारांना अडकवण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी कट रचल्याचा आरोप त्यांनी केला. मध्यरात्री आयुक्तांच्या निवासस्थानी 250-300 जणांची घुसखोरी रात्री घडलेल्या थरारक घटनेचा तपशील देताना प्रताप सरनाईक यांनी प्रशासकीय यंत्रणेवरील दबावाची पोलखोल केली. “रात्री 11:30 च्या सुमारास आमदार नरेंद्र मेहता स्वतः आपल्या नगरसेवकांसह 250 ते 300 लोकांचा बेकायदेशीर जमाव घेऊन पालिका आयुक्तांच्या शासकीय निवासस्थानी घुसले. रात्री 2:30 ते 3 वाजेपर्यंत त्यांनी आयुक्तांना घरातच घेराव घालून ओलीस ठेवले होते. मणिपूर केडरवरून महाराष्ट्र केडरमध्ये आलेले हे आयुक्त तरुण प्रशासकीय अधिकारी आहेत. घरात त्यांची पत्नी आणि 2 लहान मुले असताना त्यांच्यावर दहशत निर्माण करण्यात आली.” कलम 353चा गैरवापर करण्यासाठी दबाव “पत्रकार आणि सामान्य नागरिकांवर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी (भादंवि कलम 353 अन्वये) गुन्हा दाखल करावा, यासाठी आमदार आणि त्यांच्या टोळक्याने आयुक्तांवर प्रचंड दबाव आणला. पोलिसांनी आधी हा गुन्हा दाखल करण्यास नकार दिला होता; मात्र आयुक्तांना घरात कोंडून ठेवल्यामुळे शेवटी पहाटेच्या सुमारास दबावापोटी पोलिसांनी गुन्हा नोंदवला.” परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे समजताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आयुक्तांना सुरक्षितपणे बेडरूममध्ये नेऊन या जमावाला बंगल्याबाहेर काढले. आमदारकी रद्द करा, नगरसेवक पदे बरखास्त करा! या गंभीर प्रकरणावर कठोर कायदेशीर कारवाईची मागणी करताना आमदार सरनाईक म्हणाले, एका वरिष्ठ आयएएस (IAS) अधिकाऱ्याच्या घरात मध्यरात्री बेकायदेशीर जमाव जमवून घुसखोरी करणे, अधिकाऱ्याला ओलीस ठेवणे, धमकी देणे या आरोपांखाली आमदार नरेंद्र मेहता आणि संबंधित नगरसेवकांवर तत्काळ एफआयआर (FIR) दाखल करण्यात यावा. सभागृहाचे सदस्य राहण्याचा अधिकार नाही लोकशाही व्यवस्था पायदळी तुडवणाऱ्या अशा आमदाराला पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यामुळे घटनेची उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशी करून नरेंद्र मेहतांची आमदारकी आणि नगरसेवकांची पदे तत्काळ रद्द करण्यात यावीत, अशी मागणी राज्यपालांकडे करण्यात आल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले. ————————————————— हेही वाचा… ‘गोकुळ’मध्ये सतेज पाटलांचा करिष्मा; मंत्र्यांची फौज पराभूत:25 पैकी 13 जागांवर आघाडीचा विजय कोल्हापूर जिल्ह्याची आर्थिक जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या “गोकुळ’ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीने विजय मिळवत सत्ता राखली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, दोन कॅबिनेट मंत्री, खासदार आणि आमदारांची संपूर्ण ताकद विरोधात उभी असताना, अटीतटीच्या लढतीत सतेज पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि दत्त दालमियाचे गणपतराव पाटील यांच्या आघाडीने २५ पैकी १३ जागांवर विजय संपादन केला. महायुतीच्या पदरात १२ जागा पडल्या. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
नरेंद्र मेहतांची आमदारकी रद्द करा, प्रताप सरनाईकांची राज्यपालांकडे मागणी:म्हणाले- पत्रकारांवर हल्ला, मध्यरात्री महापालिका आयुक्तांच्या घरात घुसून ओलीस ठेवले!