![]()
वय वाढले, जबाबदाऱ्या बदलल्या आणि आयुष्याच्या वाटा वेगवेगळ्या झाल्या; कुणी नोकरीतून निवृत्त झाले, कुणी संसारात रमले, तर कुणी आजोबाही झाले, मात्र शालेय दिवसांतील मैत्रीचा गोडवा आजही तसाच कायम असल्याचे पाहायला मिळाले. उंडणगाव येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये १९८२ च्या माजी विद्यार्थ्यांचे तब्बल ४४ वर्षांनंतर रविवारी स्नेहमिलन पार पडले. या सोहळ्यामुळे शाळेच्या परिसरात पुन्हा एकदा बालपणाचा आनंद आणि मैत्रीचा गोड दरवळ पसरला होता. चार दशकांहून अधिक काळानंतर एकत्र आलेल्या या जुन्या मित्रांनी शाळेच्या आठवणींना मनमोकळा उजाळा दिला. एकेकाळी याच वर्गखोल्यांत बसून शिक्षण घेणारे, मैदानावर खेळणारे आणि एकमेकांच्या खोड्या काढणारे मित्र आज आयुष्याच्या उत्तरार्धात पुन्हा एकदा एकत्र आले. काळाच्या ओघात चेहऱ्यांवर सुरकुत्या आल्या तरीही त्यांच्यातील मैत्रीचा ओलावा तसूभरही कमी झालेला नव्हता. १९८२ मध्ये या शाळेतून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनी पुढे विविध क्षेत्रांत आपली ओळख निर्माण केली. काहींनी शासकीय सेवेत काम केले, काही शिक्षक व अधिकारी झाले, तर अनेकांनी शेती आणि व्यवसायाच्या माध्यमातून संसार उभा केला. आज अनेक जण निवृत्त जीवन जगत असून काहींच्या अंगाखांद्यावर नातवंडे खेळत आहेत. तरीही शाळेतील पहिला दिवस, वर्गातील गंमती-जमती, मित्रांसोबत केलेली मस्ती आणि शिक्षकांच्या आठवणी सर्वांच्या मनात जिवंत होत्या. स्नेहमिलनात प्रत्येकाने आपली ओळख करून देत जुन्या आठवणी ताज्या केल्या. गप्पांच्या रंगलेल्या मैफलीत हास्याचे फवारे उडाले आणि काही भावुक क्षण अनुभवत अनेकांचे डोळे पाणावले. ज्या शाळेने आयुष्याला योग्य दिशा दिली, संस्कारांची शिदोरी दिली आणि मैत्रीची अमूल्य नाती जोडली, त्या शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सर्व माजी विद्यार्थ्यांनी शाळेला एक दर्जेदार नामफलक भेट दिला. निरोप घेताना विद्यार्थ्यांच्या डोळ्यात तरळले अश्रू माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेशी असलेले नाते जपत ऋणातून उतराई होण्याचा एक भावपूर्ण प्रयत्न केला. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली, ज्यानंतर सर्वांनी एकत्र सहभोजनाचा आनंद घेतला. निरोप घेताना पुन्हा भेटण्याच्या आश्वासनासोबतच प्रत्येकाच्या मनात बालपणीच्या आठवणींचा गोडवा साठला होता. ४४ वर्षांनंतर घडून आलेला हा सोहळा केवळ मित्रांची भेट नसून आयुष्यभर जपलेल्या मैत्रीचा आणि ऋणानुबंधांचा एक अविस्मरणीय उत्सव ठरला.
Source link
44 वर्षांनंतर जुन्या आठवणींना मिळाला उजाळा:उंडणगाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये 1982 च्या माजी विद्यार्थ्यांची उपस्थिती