![]()
अमेरिकेतील इलॉन मस्क यांच्या मालकीच्या टेस्लाशी साधर्म्य असलेल्या कंपनीत बॅटरी, इन्व्हर्टर आणि सोलार पॅनल व्यवसायात भागीदारी देण्याच्या बहाण्याने छत्रपती संभाजीनगर शहरातील एका व्यापाऱ्याची १ कोटी २२ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
.
शक्तिनगर येथील ए. पी. एंटरप्रायजेसचे मालक अतुल नारायण पायगव्हाण (५१) यांनी ही फिर्याद दिली. ऑगस्ट २०२१ मध्ये त्यांना टेस्ला पॉवर यूएसए इंक (गुरुग्राम) या कंपनीला महाराष्ट्र आणि गोव्यासाठी भागीदार हवा असल्याची माहिती मिळाली. त्यांनी कंपनीचे एरिया सेल्स मॅनेजर निशित सिंह यांच्याशी संपर्क साधून ऑक्टोबर २०२१ मध्ये करार केला. पायगव्हाण यांनी सुरक्षा ठेव म्हणून तब्बल १ कोटी रुपये कंपनीकडे जमा केले. यावर ६ टक्के परतावा आणि विक्रीवर ३.७५ टक्के कमिशन ठरले होते. करोडी येथे गोदाम घेऊन दीड वर्ष व्यवसाय सुरळीत चालला. पण डिसेंबर २०२४ मध्ये विक्री घटल्याने परस्पर संमतीने व्यवसाय बंद करून पायगव्हाण यांनी सर्व माल कंपनीला परत केला.
मालासोबत कमिशनही बुडाल्याने अखेर तक्रार
परत केलेला माल आणि कंपनीकडील १ कोटींची सुरक्षा ठेव व थकीत रक्कम असे १ कोटी २२ लाख १२ हजार ८४८ रुपये मार्च २०२५ पर्यंत परत करण्याचे आश्वासन संचालकांनी दिले होते. मुदत उलटूनही पैसे न मिळाल्याने पायगव्हाण यांनी पोलिसांत धाव घेतली.
पैसे बुडवण्यासाठी नाव बदल
सप्टेंबर २०२३ मध्ये टेस्ला पॉवर यूएसए इंक या विदेशी नावाऐवजी टेस्ला पॉवर इंडिया लिमिटेड असे नाव बदलले. सरकारी योजनेंतर्गत करसवलतीचे कारण व्यवस्थापकीय संचालक कविंदर खुराना आणि वृतिका खुराना (रा. गुरुग्राम) यांनी त्या वेळी दिले होते. मात्र, मूळ कंपनीचे दायित्व टाळण्यासाठी व व्यापाऱ्यांचे पैसे बुडवण्यासाठीच हा बदल केल्याचा संशय आहे.