“मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याबद्दल आणि त्यांनी समाजासाठी घेतलेल्या कष्टांबद्दल आम्हाला पूर्ण आदर आहे. मात्र, पत्रकार परिषदेत ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपची कोणतीही अधिकृत सत्यता अद्याप सिद्ध झालेली नाही. एका अज्ञात कॉन्फरन्स कॉलमध्ये क
.
मनोज जरांगे पाटील यांनी 500 कोटींच्या देवाणघेवाणीचा उल्लेख असलेली कथित 32 मिनिटांची ऑडिओ क्लिप जाहीर केल्यानंतर, ठाण्यात तातडीने पत्रकार परिषद घेत आनंद परांजपे यांनी पक्षाची अधिकृत भूमिका मांडली.
डॉ. श्रीकांत शिंदेंचा चार शब्दांत उल्लेख करून बदनामीचा कुटील डाव!
ऑडिओ क्लिपमधील उल्लेखावर आक्षेप नोंदवताना परांजपे म्हणाले, “खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे लोकसभेतील शिवसेनेचे गटनेते असून गेली 12 वर्षे संसदेत त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेशात पाठवलेल्या खासदारांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले होते. अशा जबाबदार नेत्याचा एका अज्ञात महिलेच्या तोंडून चार शब्दांत उल्लेख झाला म्हणून त्यांच्यावर थेट आरोप करणे अनाकलनीय आहे.”
षड्यंत्राचा तपास व्हावा
“या ऑडिओ क्लिपमध्ये बोलणाऱ्या व्यक्ती कोण आहेत, कुठून बोलत आहेत आणि संभाषणाचा हेतू काय होता, हे शोधणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे जरांगेंनी स्वतः चौकशीची मागणी केली आहे. सरकार निश्चितपणे या क्लिपची सायबर आणि फॉरेन्सिक तपासणी करेल आणि सत्य बाहेर आणेल.”
मुख्यमंत्री असताना शिंदेंनीच मराठ्यांना 10 टक्के आरक्षण दिले
मराठा समाजासाठी एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयांची आठवण करून देत ते म्हणाले, “मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनादरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः नवी मुंबईतील वाशी येथे गेले आणि त्यांनी जरांगेंचे उपोषण सोडवले. मराठा समाजाला दिलेले 10 टक्के आरक्षण असो, निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे समितीची स्थापना असो, सारथी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे बळकटीकरण असो, अथवा वसतिगृहांची उभारणी आणि मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा निर्णय असो; हे सर्व ऐतिहासिक निर्णय एकनाथ शिंदेंनी घेतले आहेत.”
राजकीय हेतूने प्रेरित आरोप नकोत
“मराठा आरक्षणाच्या लढ्यात शिंदे साहेब सदैव समाजासोबत राहिले आहेत. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असताना अशा खोट्या क्लिपच्या आधारे राजकीय चिखलफेक करणे अयोग्य आहे. जरांगेंनी समाजाच्या हक्कासाठी काम करावे, मात्र राजकीय दबावाखाली येऊन शिवसेनेवर हल्ले करू नयेत.”
2029ची भाकिते करू नका, महायुती पुन्हा सत्तेत येईल
जरांगेंनी सत्ताधाऱ्यांना दिलेल्या राजकीय इशाऱ्यांवर आणि रामदास कदमांच्या वक्तव्यावर बोलताना परांजपे यांनी स्पष्ट केले. “जेव्हा पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्यावर थेट आरोप केले जातात, तेव्हा पक्षाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम किंवा इतर नेत्यांकडून आक्रमक प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक आहे. शेवटी तथ्य आणि सत्य हे एकनाथ शिंदेंच्याच बाजूने आहे.”
लोकशाहीत जनताच ठरवते
“जरांगे पाटील 2029 ची भाषा करत आहेत; मात्र लोकशाहीत सरकार निवडून देण्याचे काम जनता करत असते. महायुती सरकारने लाडकी बहीण योजना, शेतकरी आणि युवकांसाठी घेतलेल्या लोकोपयोगी निर्णयांमुळे राज्यातील जनता सरकारसोबत आहे. त्यामुळे 2029 मध्येही महायुतीचेच सरकार पुन्हा पूर्ण ताकदीने सत्तेवर येईल,” असा विश्वास आनंद परांजपे यांनी शेवटी व्यक्त केला.
——————————————–
हेही वाचा…
मनोज जरांगेंकडून गुप्त ऑडिओ क्लिप जाहीर: “जरांगेंना डॅमेज करण्यासाठी मराठ्यांनाच रसद पुरवा, 500 कोटी दिल्याची चर्चा”; शिंदे-फडणवीसांना इशारा

“मराठा आरक्षण आंदोलन चिरडण्यासाठी, मला बदनाम करण्यासाठी आणि आंदोलनात फूट पाडण्यासाठी गेल्या 3 वर्षांपासून सत्ताधारी वर्तुळात एक अतिशय भयानक आणि नियोजनबद्ध कट शिजत आहे. माझ्या विरोधात बोलणाऱ्या मराठा तरुणांनाच हाताशी धरून, त्यांना पक्षाचा किंवा वैयक्तिक फंड पुरवून, गाड्या आणि मोर्चांचा खर्च देऊन मला राजकीयदृष्ट्या उद्ध्वस्त करण्याची रणनीती आखली गेली. ‘बाप दाखवा नाहीतर श्राद्ध घाला’ म्हणणाऱ्यांनी आता हे पुरावे ऐकावेत. जर हे षड्यंत्र थांबवले नाही, तर माझ्याकडे असा महास्फोट आहे की या राज्यात सत्ताधाऱ्यांना पाय ठेवायलाही जागा उरणार नाही,” असा खळबळजनक इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी