“मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेली कथित 500 कोटींची ऑडिओ क्लिप ही अत्यंत गंभीर बाब आहे. भाजपच्या मीडिया सेलचे काम पाहणारी एक महिला उघडपणे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत 500 कोटी रुपये जरांगेंना पोहोचल्याचा दावा करत आहे.
.
छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत अंबादास दानवे यांनी जरांगे यांनी उघडकीस आणलेली ऑडिओ क्लिप, आंदोलने पैशाने खरेदी करण्याची भाजपची कार्यपद्धती, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा दुर्घटनेवरून सुरू असलेले गलिच्छ राजकारण आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या ‘रेझिम चेंज’च्या विधानावर सविस्तर भाष्य केले.
आंदोलने पैशाने खरेदी करणे ही भाजपची इंग्रजी नीती
ऑडिओ क्लिपमधील संभाषणावर तीव्र संताप व्यक्त करत अंबादास दानवे म्हणाले, “भारतीय जनता पार्टीने देशात आणि महाराष्ट्रात आंदोलने हाताळण्याची एक अत्यंत डरपोक पद्धत सुरू केली आहे. इंग्रजांप्रमाणे आधी आंदोलने फोडायची, नाही जमले तर तोडायची आणि शेवटी पैशाच्या बळावर आंदोलन खरेदी करायचे, ही भाजपची ठरलेली नीती आहे. मात्र, या देशातील 150 कोटी जनतेला भाजप पैशाने कधीही विकत घेऊ शकत नाही.”
त्या महिलेला तत्काळ अटक करा
“उदय सामंत म्हणतात की शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय. मग शिवसेनेला बदनाम कोण करत आहे? ज्यांच्या गळ्यात गळा घालून तुम्ही फिरताय, त्याच भाजपच्या मीडिया सेलची महिला हे बोलत आहे. यात काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी किंवा आमचा संबंध नाही. त्यामुळे गृहमंत्रालयाने कुठलाही वेळ न दवडता त्या महिलेला अटक करून 500 कोटींचा खरा स्रोत शोधून काढला पाहिजे.”

स्वयंघोषित पत्रकारांचा बुरखा फाटला
“या ऑडिओ क्लिपमध्ये पत्रकारांना मॅनेज करण्याच्या आणि आदिवासींच्या आंदोलनांना थेट देशविरोधी ठरवण्याच्या चर्चा ऐकायला मिळतात. मनोज जरांगेंनी आज या भाजपच्या दलाल पत्रकारांचा बुरखा फाडला, हे फार चांगले झाले.”
पुतळा पडला यांच्या भ्रष्टाचाराने आणि नाव घेताय ठाकरे कुटुंबीयांचे?
सिंधुदुर्ग येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा दुर्घटनेवरून सुरू असलेल्या राजकारणावर दानवे यांनी सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला. “सिंधुदुर्गच्या समुद्रकिनाऱ्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचारी प्रवृत्तीमुळे कोसळला. मी स्वतः आदित्य ठाकरेंना घेऊन तिथे गेलो होतो. आता स्वतःचे पाप लपवण्यासाठी हे लोक उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे नाव त्यात गोवण्याचा प्रयत्न करत आहेत. इतकी नीच प्रवृत्तीचे लोक आपले पाप कुठे फेडणार, असा प्रश्न पडतो.”
संभाषण जास्त जुने नाही
“ही ऑडिओ क्लिप फार जुनी नाही, तर 1 ते 1.5 वर्षांपूर्वीची म्हणजेच विधानसभा निवडणुकीच्या आधीची दिसते. देशात आज शेतकरी, तरुण आणि सर्वसामान्यांमध्ये असंतोष खदखदत असताना, आंदोलने बदनाम करण्यासाठी भाजप कसे नॅरेटिव्ह सेट करते, याचे हे जिवंत उदाहरण आहे.”
देवेंद्र फडणवीसांना पक्षातच मागे खेचण्याचे कारस्थान
क्लिपमध्ये भाजपच्या अंतर्गत वादाची चर्चा असल्याच्या मुद्द्यावर दानवे यांनी मोठा दावा केला. “या संभाषणात देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्याचे आणि बदनाम करण्याचे षड्यंत्र भाजपमधीलच लोक करत असल्याचे ऐकायला मिळते. फडणवीस हे महाराष्ट्रात भाजपचे सर्वोच्च नेते आहेत; तरीही त्यांना मागे खेचण्याचा प्रयत्न पक्षात होत असेल, तर या षड्यंत्राला दिल्लीतील वरच्या नेत्यांचीच फूस आहे का, असा संशय येतो.”
प्यारेखान टोलनाका वाद आणि राज ठाकरेंच्या भाकिताचे समर्थन
नागपूरमधील आंदोलन आणि देशातील राजकीय परिस्थितीवर बोलताना ते म्हणाले, “विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल हे भाजपचेच अंग आहेत. नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गाचे नागपूर ते मुंबईपर्यंतचे सर्व टोलनाके प्यारेखान यांच्या कंपनीला चालवायला दिले आहेत. आता एकीकडे विरोध करायचा आणि दुसरीकडे स्वतःच त्यांना टेंडर द्यायचे, हा यांचा ठरलेला दुटप्पी खेळ आहे.”
राज ठाकरेंचे भाकीत खरे ठरेल
“राज ठाकरे म्हणाले की पुढील 2 ते 4 महिन्यांत देशाला पंतप्रधान नसतील; मला वाटते हे वास्तव आहे. जंतरमंतरवरून कॉक्रोचचा एक साधा मोर्चा संसदेकडे गेला, तरी पंतप्रधान आणि गृहमंत्री संसदेतून पळून गेले होते. उद्या जेव्हा देशातील जागा झालेला सामान्य नागरिक रस्त्यावर उतरेल, तेव्हा या सत्ताधाऱ्यांना पळता भुई थोडी होईल,” असा इशारा अंबादास दानवे यांनी दिला.
———————————————————–
हेही वाचा…
माझ्याविरोधात बोलणाऱ्यांना भाजपने पार्टी फंड पुरवला!:मनोज जरांगेंकडून 500 कोटींच्या दाव्याची स्फोटक ऑडिओ क्लिप जाहीर; शिंदे-फडणवीसांना षड्यंत्र थांबवण्याचा इशारा

“मराठा आरक्षण आंदोलन चिरडण्यासाठी, मला बदनाम करण्यासाठी आणि आंदोलनात फूट पाडण्यासाठी गेल्या 3 वर्षांपासून सत्ताधारी वर्तुळात एक अतिशय भयानक आणि नियोजनबद्ध कट शिजत आहे. माझ्या विरोधात बोलणाऱ्या मराठा तरुणांनाच हाताशी धरून, त्यांना पक्षाचा किंवा वैयक्तिक फंड पुरवून, गाड्या आणि मोर्चांचा खर्च देऊन मला राजकीयदृष्ट्या उद्ध्वस्त करण्याची रणनीती आखली गेली. ‘बाप दाखवा नाहीतर श्राद्ध घाला’ म्हणणाऱ्यांनी आता हे पुरावे ऐकावेत. जर हे षड्यंत्र थांबवले नाही, तर माझ्याकडे असा महास्फोट आहे की या राज्यात सत्ताधाऱ्यांना पाय ठेवायलाही जागा उरणार नाही,” असा खळबळजनक इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी