![]()
सम्राट क्रीडा मंडळाच्या ६५ वर्धापन दिनानिमित्त आयोजित शहर पातळीवरील कबड्डी स्पर्धेत उदय क्रीडा मंडळाने अंतिम सामन्यात समता क्रीडा मंडळाचा ४१-१९ असा २२ गुणांच्या फरकाने पराभव करीत विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत शहरातील १५ संघांनी सहभाग घेतला होता. अंतिम सामन्याच्या सुरुवातीला दोन्ही संघांमध्ये चुरस पाहायला मिळाली. मध्यंतरापर्यंत उदय क्रीडा मंडळाने २०-१५ अशी अवघ्या पाच गुणांची आघाडी घेतली होती. मात्र, मध्यंतरानंतर उदय क्रीडा मंडळाच्या खेळाडूंनी भेदक चढाया आणि अचूक पकडी करीत सामन्यावर वर्चस्व मिळवले. त्यामुळे समता क्रीडा मंडळाला पराभवाला सामोरे जावे लागले. दोन दिवस सुरू असलेल्या या कबड्डी स्पर्धेतील सामने पाहण्यासाठी कबड्डीप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. स्पर्धेतील विजेत्या संघांना सम्राट क्रीडा मंडळाचे प्रमुख, माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक राजाभाऊ पगारे यांच्या हस्ते रोख पारितोषिके, तर दादाभाऊ शार्दुल यांच्या हस्ते चषक प्रदान करण्यात आले.कबड्डी खेळासाठी योगदान देणारे राष्ट्रीय पंच प्राध्यापक डॉ. दत्ता शिंपी यांना क्रीडा कार्यकर्ता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. लोकनियुक्त नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी शिवसेना शहरप्रमुख मयुर बोरसे, नगरसेवक डॉ. सुहास जाधव, अमोल नरवडे, लोकेश साबळे, सतीश सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
Source link
मनमाडमध्ये उदय क्रीडा मंडळाने पटकावले कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद, अंतिम सामन्यात समता क्रीडा मंडळाचा पराभव; 15 संघांनी घेतला सहभाग