![]()
छत्रपती संभाजीनगरमधील सिडको भागात भरदिवसा एका तरुणाची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. या थरारक घटनेचे तीव्र पडसाद आता राजकीय वर्तुळात उमटू लागले असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी यावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. “ही हत्या म्हणजे राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेचा भर रस्त्यात पाडलेला मुडदा आहे,” अशा कठोर शब्दांत त्यांनी सरकारला धारेवर धरले आहे. सरकारवर ‘पतंग काटण्याच्या राजकारणा’चा आरोप रोहित पवार यांनी सोशल मीडियावर या घटनेचा तीव्र निषेध नोंदवताना सत्ताधाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, “आपापसातील पतंग काटण्याच्या राजकारणात गुंतलेल्या सरकारला सामान्य माणसाच्या जीवाचे काहीही पडलेले नाही. त्यामुळेच दिवसाढवळ्या भर रस्त्यात असे रक्ताचे पाट वाहताना दिसत आहेत.” सत्तेच्या साठमारीत राज्याच्या गृह विभागाचे आणि प्रशासनाचे गुन्हेगारांवरील वचक संपले असल्याचा थेट आरोप त्यांनी यातून केला आहे. नेमकी घटना काय होती? छत्रपती संभाजीनगरमध्ये दुचाकीवरून घरी परतणाऱ्या एका तरुणाला पाठीमागून कारने जाणीवपूर्वक धडक देण्यात आली. त्यानंतर खाली पडलेल्या त्या तरुणावर गुंडांनी हॉकी स्टिक आणि लोखंडी रॉडने सपासप वार केले. रस्त्यावरील वर्दळीच्या वेळी आणि भरदिवसा घडलेल्या या हत्याकांडामुळे शहरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. ‘आणखी किती दिवस सहन करायचं?’ राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याकडे लक्ष वेधत रोहित पवार यांनी जनतेच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आणला आहे. “सामान्य माणसांचे असे बळी जाताना आणखी किती दिवस हे सहन करायचे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. हत्येचा थरार आणि घटनाक्रम.. व्यावसायिक वादातून ठेवली पाळत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत देवेश उर्फ बंटी दीक्षित आणि आरोपी पवन पराशर यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून व्यावसायिक आणि पैशाच्या कारणावरून वाद धुमसत होता. घटनेच्या दिवशी सकाळी बंटी नेहमीप्रमाणे जिम आटोपून आपल्या दुचाकीवरून घरी जात होता. आरोपी पवन हा आधीपासूनच कारमध्ये दबा धरून त्याच्या हालचालींवर पाळत ठेवून होता. जाणूनबुजून घडवला भीषण अपघात बंटीची दुचाकी एन-७ सिडकोतील मंगेश गॅस एजन्सीसमोर पोहोचताच, पाठीमागून येणाऱ्या आरोपी पवनने कारचा वेग वाढवला आणि दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, बंटी हवेत उडून थेट रस्त्यावर कोसळला, तर त्याची दुचाकी तब्बल १५० फूट दूर असलेल्या विश्वास वाईन्स शॉपजवळ जाऊन आदळली. यू-टर्न घेतला अन् रॉडने संपवले कारच्या धडकेने बंटी गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडला होता. मात्र, आरोपीने गाडी न थांबवता पुढे जाऊन चौकातून अचानक यू-टर्न घेतला आणि कार पुन्हा जखमी बंटीच्या अंगाजवळ आणून थांबवली. कारमधून खाली उतरताना आरोपीने लाकडी दांडा आणि जाड लोखंडी रॉड काढला. रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या बंटीच्या डोक्यात आणि चेहऱ्यावर त्याने अत्यंत क्रूरपणे एकापाठोपाठ एक घाव घातले. डोक्यात वर्मी घाव बसल्याने बंटी दीक्षितचा जागीच मृत्यू झाला. आरोपी कारसह पोलीस ठाण्यात हजर भररस्त्यात हा थरार घडवून आणल्यानंतर, हल्लेखोर पवन पराशरने घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, तो थेट कार घेऊन सिडको पोलीस ठाण्यात पोहोचला आणि पोलिसांसमोर स्वतःहून हजर झाला. भरदिवसा घडलेल्या या निर्घृण हत्याकांडामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, सिडको परिसरात प्रचंड दहशत पसरली आहे. ————————————– हेही वाचा.. बंटी दीक्षित खून प्रकरण: रामलीला मैदानावर रावणदहन कार्यक्रमात बंटीला गोळ्या घालून मारण्याचा होता डाव, गावठी कट्टा जप्त
सिडकोतील एन-७ परिसरात भररस्त्यात बंटी दीक्षितचा खून केल्यावर पवन पराशर स्वतःहून सिडको ठाण्यात शरण आला होता. शुक्रवारी (२३ ऑक्टोबर) न्यायालयात हजर केल्यावर त्याला १० दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती निरीक्षक अतुल येरमे यांनी दिली. ‘बंटी माझ्या कामांत अडथळा ठरत होता. त्याला तोच भाई वाटायचा, मी पण काही कमी नाही हेच मला सिद्ध करायचं होतं,’ असे आरोपी पवन पोलिस कोठडीत बडबडत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कारने धडक आणि त्यानंतर लाकडी दांड्याने प्रहार करून खून करणाऱ्या पवनचा मूळ प्लॅन वेगळाच होता. तो दसऱ्याच्या दिवशी बंटीला गोळ्या घालणार होता. दरम्यान, दुपारी सेंट्रल नाका स्मशानभूमीत देवेश ऊर्फ बंटी दीक्षित यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी नागरिकांची गर्दी होती. सविस्तर वाचा
Source link
संभाजीनगर हत्याकांडावरून रोहित पवारांचा सरकारवर घणाघात:म्हणाले- हा तर राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेचा रस्त्यात पाडलेला मुडदा