Headlines

मोदींनी जागतिक व्यासपीठावर राहुल गांधींवर टीका केली:काँग्रेसचा सवाल, 'ते अपयशी असतील तर वेळ का घालवता?'




राहुल गांधी यांना अपयशी आणि अनुत्पादक ठरवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी जागतिक व्यासपीठावर त्यांच्यावर टीका करण्यात वेळ का घालवतात? देशाच्या प्रगतीचा लेखाजोखा मांडण्याऐवजी विरोधी पक्षनेत्यावर टीका करण्यात पंतप्रधानांना धन्यता वाटते का, असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केला. ‘एनडीटीव्ही वर्ल्ड समिट’मध्ये मोदी यांनी केलेल्या वक्तव्यांवर तिवारी यांनी टीका केली. देशाच्या पंतप्रधानांकडून आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताची विविध क्षेत्रांतील प्रगती, सरकारची कामगिरी आणि देशासमोरील आव्हानांवर भाष्य अपेक्षित असते. मात्र, मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करण्यातच भाषणाचा अधिक भर दिला. ही बाब पंतप्रधानपदाच्या प्रतिष्ठेला बाधा आणणारी आहे, असे तिवारी म्हणाले. राहुल गांधी खरोखरच अपयशी आणि अनुत्पादक असतील, तर त्यांच्यावर टीका करण्यात पंतप्रधानांनी भारतासाठी मिळालेला मौल्यवान वेळ का खर्च करावा? महागाई, बेरोजगारी, आंतरराष्ट्रीय स्तरावरील आव्हाने आणि अमेरिकेच्या आक्रमक भूमिकेसारख्या महत्त्वाच्या विषयांवर पंतप्रधानांनी भूमिका मांडणे अधिक आवश्यक होते. विरोधकांवरील टीकेपेक्षा स्वतःच्या सरकारची कामगिरी सांगणे हेच पंतप्रधानांकडून अपेक्षित असल्याचे तिवारी यांनी नमूद केले. ‘भाजपला जनादेशाचा विसर’ २०१९ च्या तुलनेत २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आपले संख्याबळ ५२ वरून ९९ जागांपर्यंत वाढवले, तर भाजपच्या जागा ३०३ वरून २४० पर्यंत घसरल्या. जनतेने दिलेला हा कौल भाजपचे नेते सोयीस्करपणे विसरत असल्याचा आरोप तिवारी यांनी केला. भाजपला केंद्रात सत्ता टिकवण्यासाठी चंद्राबाबू नायडू आणि नितीशकुमार यांच्या पाठिंब्यावर अवलंबून राहावे लागत आहे. मात्र, भाजपचे नेतृत्व या राजकीय वास्तवाकडे दुर्लक्ष करत असल्याची टीकाही त्यांनी केली. मोदी यांनी विरोधकांवर टीका करण्याऐवजी देशाच्या प्रश्नांवर आणि सरकारच्या कामगिरीवर बोलावे, असे आवाहन तिवारी यांनी केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *