![]()
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चित्तेपिंपळगाव येथे धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघात घडला आहे. मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिल्याने 18 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला, तर तिचे वडील या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. मृत तरुणीचे ‘मोठी अधिकारी’ होण्याचे स्वप्न या अपघातामुळे कायमचे अधुरे राहिले असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खोडेगाव (जि. छत्रपती संभाजीनगर) येथील रहिवासी प्रतीक्षा गणेश ढगे (वय 18) आणि तिचे वडील गणेश ढगे हे आपल्या दुचाकीने (क्र. एम.एच.20 बी.डब्ल्यू.3100) संभाजीनगरकडे जात होते. चित्तेपिंपळगाव जवळ आले असता, पाठीमागून येणाऱ्या ट्रकने (क्र. आर.जे.32 जी.डी.7439) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे वडील गणेश ढगे बाजूला फेकले गेल्याने गंभीर जखमी झाले. मात्र, प्रतीक्षा ट्रकच्या पुढच्या टायरमध्ये अडकली आणि ट्रकने तिला सुमारे 250 फुटांपर्यंत फरफटत नेले. या अत्यंत भीषण घटनेत प्रतीक्षाचा जागीच मृत्यू झाला. अधिकारी होण्याचे स्वप्न अधुरे प्रतीक्षा ही अभ्यासात अत्यंत हुशार होती. तिने नुकतीच 11 वीची परीक्षा दिली होती आणि सीईटी (CET) परीक्षेच्या तयारीसाठी ती वडिलांसोबत संभाजीनगरला जात होती. शिक्षण पूर्ण करून मोठी अधिकारी व्हायचे आहे, अशी तिची जिद्द होती. मात्र, काळाने तिच्यावर झडप घातल्याने एका गुणवंत विद्यार्थिनीचा अंत झाला. तिच्या पश्चात आई, वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे. पोलिस प्रशासनाची कारवाई अपघाताची माहिती मिळताच चिकलठाणा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रविकिरण दरवडे, दीपक देशमुख, गणेश कोरडे आणि बीट जमादार सचिन ढवळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर येथे पाठवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बीट जमादार सचिन ढवळे करत आहेत. स्थानिक आणि शैक्षणिक क्षेत्रातून दुःख व्यक्त पिंपळगाव पांढरी येथील माध्यमिक विद्यालयाचे प्राध्यापक युसुफ बागवान यांनी शोक व्यक्त करताना सांगितले की, “प्रतीक्षा आमच्या विद्यालयातील अत्यंत हुशार विद्यार्थिनी होती, तिच्या मृत्यूची बातमी ऐकून मन व्यथित झाले आहे.” तसेच, पंचायत समिती सदस्य शैलेश चौधरी यांनी आवाहन केले की, “धुळे-सोलापूर महामार्गावरील झाल्टा फाटा, आडगाव फाटा, भालगाव फाटा, निपाणी फाटा या ठिकाणी वाहनधारकांनी आणि पादचाऱ्यांनी रस्ता ओलांडताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.” वाहनधारकांना महत्त्वाच्या सूचना चिकलठाणा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रविकिरण दरवडे यांनी या निमित्ताने दुचाकीधारकांना सावध केले आहे. ते म्हणाले की, “ज्या ठिकाणी उड्डाणपूल आहेत, तिथे जड वाहने भरधाव वेगाने धावत असतात. अशा ठिकाणी अपघाताचा धोका टाळण्यासाठी दुचाकीधारकांनी सर्व्हिस रोडचा वापर करावा. तसेच आपल्या दुचाकीला दोन्ही बाजूंनी आरसे लावावेत, जेणेकरून मागून येणारे वाहन स्पष्ट दिसेल आणि स्वतःचा बचाव करता येईल.”
Source link
अधिकारी होण्याचे स्वप्न भंगले!:चित्तेपिंपळगावात भीषण अपघातात 18 वर्षीय तरुणी ठार, वडील गंभीर जखमी