![]()
दिवाळीच्या कालावधीत खासगी प्रवासी बसमालकांनी शासनाने निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा अधिक भाडे आकारू नये. निर्धारित भाड्यापेक्षा अधिक आकारणी करणाऱ्या बसमालकांविरुद्ध मोटार वाहन कायदा, 1988 व संबंधित नियमांनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी दिला आहे. दिवाळीच्या काळात प्रवाशांची संख्या वाढत असल्याने काही खासगी बसमालकांकडून मनमानी पद्धतीने अधिक भाडे आकारले जात असल्याच्या तक्रारी येतात. या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथे बसमालक संघटनेच्या प्रतिनिधींसमवेत बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रवाशांची आर्थिक पिळवणूक रोखणे आणि रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले, परिविक्षाधीन सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल फसले, परिविक्षाधीन सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित आर्सुळ यांच्यासह बसमालक संघटनेचे एकूण 26 प्रतिनिधी उपस्थित होते. शासनाने 20 एप्रिल 2018 रोजीच्या निर्णयानुसार खासगी बसमालकांना निर्धारित केलेल्या भाड्याच्या मर्यादेतच प्रवासी भाडे आकारणे बंधनकारक आहे. या मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर दिवाळीच्या कालावधीत विशेष लक्ष ठेवून कारवाई करण्यात येणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी बसचालकांनी मद्यपान करून वाहन चालवू नये, वाहन चालविताना भ्रमणध्वनीचा वापर करू नये, वाहन चालविताना सुरक्षिततेचे नियम पाळावेत, प्रवाशांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी आणि वाहनातील सर्व आवश्यक कागदपत्रे वैध स्थितीत ठेवावीत. प्रवाशांनी अधिक भाडे आकारणी किंवा इतर नियमभंग आढळल्यास व्हॉट्सॲप क्रमांक 8275330209 यावर संबंधित तक्रार नोंदवावी. आपले नाव, भ्रमणध्वनी क्रमांक आणि तिकिटाचा छायाचित्रासह वरील व्हॉट्सॲप क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केले आहे.
Source link
दिवाळीत खासगी बसकडून जास्त भाडे घेतल्यास कारवाई:प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा इशारा, तक्रारीसाठी व्हॉट्सॲप नंबर जारी