![]()
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाला 9 महीने पूर्ण होत आहेत. अद्यापही या अपघाताच्या चौकशीचा अहवाल समोर आलेला नाही. यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे नेते व प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अजितदादांचा घात की अपघात? हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर आले पाहिजे, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे. सुरज चव्हाण म्हणाले, आमच्या पक्षाची भूमिका नेहमी हीच राहिली आहे की वारंवार आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार यांच्या नेतृत्वात माननीय मुख्यमंत्र्यांना भेटलेत, माननीय गृहमंत्र्यांना भेटलो आहोत, अपघाताची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केलेली आहे. परंतु, ज्या गतीने तपास होत आहे, तो कुठेतरी आम्हाला सुद्धा त्यातून निराशा निर्माण होत आहे. नेमका अजितदादांचा घात की अपघात? हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर आले पाहिजे, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे. पुढे बोलताना सुरज चव्हाण म्हणाले, पोलिस खातं नेमकं काय करत आहे? की पोलिस खातं फक्त कोणीतरी ट्विटरवर पोस्ट केली आणि ती डिलीट करण्यासाठी आहे का? असा सवाल चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. सीपींकडे एवढीच कामं राहिली आहेत का, की कोणी तरी पोस्ट केली असेल तर त्याच्या घरी जाऊन डिलीट कर म्हणणं? महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांचा अपघात झाला आहे आणि अजून साधा अहवाल समोर येत नाही, अशी खंत यावेळी बोलताना सुरज चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. 28 जानेवारी रोजी झाला होता अजित पवारांचा मृत्यू माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा 28 जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास अपघात झाला होता. या अपघातात अजितदादांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यानंतर या अपघाताची चौकशीची मागणी करण्यात आली होती, त्यानुसार चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली होती. मात्र अद्यापही या अपघाताच्या चौकशीचा अहवाल समोर आलेला नसल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान, रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील सायडोंगर, कोतवाल आणि खलाटी परिसरात गुजरातमधील टोरंट पॉवरचा जलविद्युत प्रकल्प प्रस्तावित आहे. त्यासाठी 32 हजारांहून अधिक झाडांची कत्तल होणार आहे. याला महाविकास आघाडीकडून तसेच पर्यावरण प्रेमींकडून कडाडून विरोध होत आहे. त्यातच आता सत्तेतील राष्ट्रवादीचे नेते सुरज चव्हाण यांनी देखील पर्याय सुचवला आहे. कर्जत येथील वृक्षतोडीला सुरज चव्हाण यांचा विरोध सुरज चव्हाण यांनी या वृक्षतोडीला आपला विरोध दर्शवला आहे. ते म्हणाले की, एकीकडे आपण घोषणा देतो वृक्ष लावा म्हणून तर दुसरीकडे आपण वृक्षतोड करतोय हे काही योग्य नाही. वृक्ष तोड करणे हे चुकीचे आहे. टोरंट कंपनीच्या प्रकल्पासाठी वृक्ष तोड होत आहे. मराठवाड्यात हा प्रोजेक्ट करता येतो का याचा विचार करायला हवा, कारण तिकडे वृक्षतोड होणार नाहीत. आपण सध्या दुष्काळाला सामोरे जात आहोत. या संकटाला आपण सामोरे जात असताना निसर्गाची हाआणि होऊ नये. तिकडे होणाऱ्या या प्रकल्पाला माझा विरोध आहे. हाच प्रकल्प दुसरीकडे राबावला पाहिजे. हा प्रोजेक्ट दुसरीकडे करावा अशी विनंती आम्ही करू. पक्षाचा प्रवक्ता म्हणून आणि निसर्ग प्रेमी म्हणून मी माझी भूमिका मांडली, माझा विरोध आहे, अशी स्पष्ट भूमिका चव्हाण यांनी मांडली आहे.
Source link
अजित पवारांचा घात की अपघात?:सुरज चव्हाण यांचा सवाल; म्हणाले- अपघाताला 9 महिने उलटूनही चौकशी अहवाल नाही