Headlines

पाणलोट प्रकल्पांसाठी 1251 कोटींची तरतूद:85 टक्के निधी खर्च; केंद्रीय सचिव दिलीप कुमार उद्या पुणे जिल्ह्यात पाहणी करणार




प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना-पाणलोट विकास घटक २.० अंतर्गत राज्यातील ३० जिल्ह्यांत १४० प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पांसाठी १,२५१.११ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यापैकी २६ ऑक्टोबरपर्यंत १,०५७.५३ कोटी रुपये खर्च झाले असून, आर्थिक प्रगती ८५ टक्के आहे. या कामांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय भूमी संसाधन विभागाचे सचिव दिलीप कुमार शुक्रवारी, ३० ऑक्टोबरला पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. ते खेड प्रकल्पांतर्गत वरुडे, गुळाणी, वाफगाव आणि कन्हेरसर गावांतील पाणलोट विकासकामांची पाहणी करतील. या वेळी कामांची गुणवत्ता, अंमलबजावणी आणि पाणलोट क्षेत्राच्या माथ्यापासून पायथ्यापर्यंत केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला जाणार आहे. राज्यातील १४० प्रकल्पांपैकी ४८ पूर्ण झाले आहेत. आणखी ५७ प्रकल्पांमध्ये ८० टक्क्यांहून अधिक निधी खर्च झाला आहे. नैसर्गिक संसाधन व्यवस्थापनांतर्गत मंजूर २५ हजार ४९६ कामांपैकी २१ हजार ६१५ पूर्ण झाली आहेत. या कामांसाठी ५८८.०३ कोटी रुपयांची तरतूद आहे. पूर्ण झालेल्या कामांचे मूल्य ५१३.३८ कोटी रुपये आहे. उत्पादन प्रणाली घटकांतर्गत ३९ हजार ७१५ कामांपैकी ३८ हजार १७५ पूर्ण झाली आहेत. या घटकासाठी १८७.६७ कोटी रुपयांची तरतूद असून, पूर्ण कामांचे मूल्य १८३.४५ कोटी रुपये आहे. शेततळी, नाला खोलीकरण, सिमेंट नाला बांध, सलग समतल चर, बांधबंदिस्ती आणि भूजल पुनर्भरणातून पाणीसाठा वाढवण्यावर भर दिला जात आहे. दुष्काळग्रस्त घोषित ३०४ तालुक्यांपैकी ७६ तालुक्यांचा योजनेत समावेश आहे. या भागांत जलसाठे निर्माण करणे आणि भूजल पुनर्भरण वाढवणे हे उद्दिष्ट आहे. आगामी पाणलोट विकास कार्यक्रमाच्या तिसऱ्या टप्प्यासाठी भौगोलिक माहिती प्रणाली आणि वैज्ञानिक निकषांच्या आधारे संभाव्य क्षेत्रांची निवड करण्याचे नियोजन आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *