![]()
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नोंदणीकृत बांधकाम कामगार आणि रोजगार हमी योजनेतील मजुरांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी १० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने देण्यात यावे, अशी मागणी करीत बिल्डिंग पेंटर बांधकाम व इतर असंघटित मजूर संघाने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. कामगारांकडून प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे कामगार उपकरातून जमा झालेली ७ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम बँकेत पडून असल्याचा दावा बिल्डिंग पेंटर बांधकाम व इतर असंघटित मजूर संघाकडून निवेदनात करण्यात आला आहे. राज्यात ५० लाखांपेक्षा अधिक नोंदणीकृत बांधकाम कामगार असून, त्यांच्या कुटुंबांची संख्या दोन कोटींपेक्षा अधिक असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.या पार्श्वभूमीवर पात्र व सक्रिय नोंदणीकृत बांधकाम कामगार आणि रोजगार हमी योजनेतील मजुरांना दिवाळीपूर्वी १० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात यावे, अशी मागणी संघटनेने केली आहे. याप्रसंगी प्रशांत मेश्राम, इंटक जिल्हाध्यक्ष पद्माकर वासनिक, अब्दुल बशीर, विनोद जपसरे, मनोज बावीस्कर, आत्माराम साठे, अब्दुल जमीर, गणेश सावळे, सुरेश कारंडे, नागेश नेमाडे, अरुणा लबडे, शेख जावेद, अनिल अटकर, शेख मोबीन आदी उपस्थित होते. बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी बंद करण्यात आलेल्या प्राथमिक, माध्यमिक तसेच व्यावसायिक शिक्षणाच्या शिष्यवृत्ती योजना पुन्हा सुरु करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
Source link
बांधकाम कामगारांना 10 हजार अनुदान द्या:बिल्डिंग पेंटर बांधकाम, इतर असंघटित मजूर संघाची मागणी; जिल्हाधिकारी