Headlines

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या सरकारला जाब विचारणार:आमदार आदित्य ठाकरे यांचा इशारा; वैजापूर येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली पाहणी




राज्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. अतिवृष्टी, पीक विमा, नुकसानभरपाई आणि कर्जमाफी यापैकी कोणत्याही बाबतीत शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला नाही. सरकारने जाहीर केलेली पाच हजार रुपयांची मदतही अनेक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही. पाच हजार रुपयांत शेतकऱ्यांची दिवाळी होणार आहे का? शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला जाब विचारण्यासाठी मोठा मोर्चा काढणार असल्याचा इशारा शिवसेना नेते तथा आमदार आदित्य ठाकरे यांनी दिला. वैजापूर तालुक्यातील गारज व कन्नड तालुक्यातील जेहूर गावातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष शेतातील सोयाबीन, तूर, मूग आणि कापूस पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी, नुकसान आणि व्यथा जाणून घेतल्या. गारज येथील तरुण शेतकरी कडुबा त्रिभुवन यांनी आपली व्यथा मांडताना शेतीतील नुकसानीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाची माहिती दिली. मुलींची दिवाळी कशी करायची, त्यांना दिवाळीसाठी माहेरी आणायचे कसे, असा प्रश्न आमच्यासमोर उभा आहे. मुलींना माहेरी आणण्याचीही भीती वाटत असल्याची भावनिक व्यथा या शेतकऱ्याने मांडली. सरकारने जाहीर केलेली पाच हजार रुपयांची मदत म्हणजे ‘लबाडाचे आवतन’ ठरल्याची टीकाही शेतकऱ्यांनी केली. मागील वर्षीचा पीक विमा, अतिवृष्टीची नुकसानभरपाई आणि जाहीर केलेली ३२ हजार कोटी रुपयांची मदत अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही. कर्जमाफीच्या यादीत नाव येऊनही प्रत्यक्ष कर्जमाफी मिळत नसल्याची परिस्थिती आहे. पाच हजार रुपयांत शेतकऱ्यांची दिवाळी कशी होणार? राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला असताना प्रत्यक्ष मदत मात्र मिळत नाही. राज्यात आणि केंद्रात एकाच विचाराचे सरकार असतानाही शेतकऱ्यांना न्याय मिळत नसल्याची टीका शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केली. नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कार्यक्रमांसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात असताना संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मात्र मदतीसाठी वाट पाहावी लागत आहे. महाराष्ट्रातील परिस्थिती अत्यंत बिकट असून दुष्काळावर केवळ घोषणा करून चालणार नाही, तर ठोस कृती करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी आता एकजूट होऊन आपल्या हक्कासाठी आवाज उठवण्याची गरज आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला जाब विचारण्यासाठी मोठा मोर्चा काढण्यात येईल. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले. यावेळी शिवसेना नेते अंबादास दानवे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, उपनेते सुभाष पाटील, माजी आमदार उदयसिंग राजपूत, बाबासाहेब मोहिते,बबन जाधव, रमेश सावंत, मनाजी पाटील मिसाळ, संजय मोटे, मनोज गायके, संजय निकम, कल्याण चव्हाण, भरत मिसाळ, सतीश जिवरख,बाळासाहेब बडक, धर्मराज दानवे, विठ्ठल डमाळे, उमेश मोकासे,अक्षय साठे, योगेश पवार, हरिष पाटील, महिला आघाडी पद्मा शिंदे व अर्चना सोमासे यांच्यासह शिवसैनिक व शेतकरी बांधव उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *