![]()
डोंबिवली पश्चिमेत एका तरुणाने आपल्याच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेच्या सुमारे तीन आठवड्यांनंतर आरोपीने स्वतःहून पोलिसांत जाऊन गुन्ह्याची कबुली दिली. मयत मित्राची सतत पडणारी स्वप्ने आणि त्यामुळे उडालेली झोप यामुळे अस्वस्थ होऊन त्याने हा निर्णय घेतला. मयत व्यक्तीचे नाव विशाल कदम (वय 42) असून, त्याचा खून त्याचाच जवळचा मित्र प्रभू करकडे (वय 24) याने केला आहे. हा धक्कादायक प्रकार 20 दिवसांपूर्वी प्रभू ज्याच्या घरात भाड्याने राहायचा, त्या संदेश म्हात्रे (वय 42) याच्या घरात घडला. दारूच्या नशेत वाद मिळालेल्या माहितीनुसार, विशाल आणि प्रभू हे दोघे संदेश म्हात्रे याच्या घरात बसून मद्यपान करत होते. यादरम्यान त्यांच्यात अचानक शाब्दिक चकमक उडाली आणि या वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाले. रागाच्या भरात प्रभूने विशालला लाथाबुक्क्यांनी इतकी भयंकर मारहाण केली की त्यात विशालचा जागीच मृत्यू झाला. मयत मित्राची स्वप्ने मित्राची हत्या केल्यानंतर आणि मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर प्रभूला तीव्र मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. त्याला झोप लागणे कठीण झाले होते, कारण मयत विशाल सतत त्याच्या स्वप्नात येऊ लागला आणि तो दचकून जागा व्हायचा. जवळपास तीन आठवडे याच अस्वस्थतेत आणि भीतीच्या सावटाखाली काढल्यानंतर शेवटी प्रभूने पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्याचे ठरवले. पोलिसांत जाऊन गुन्ह्याची कबुली प्रभूने ठाणे गुन्हे शाखेच्या कार्यालयात जाऊन स्वतःची शरणागती पत्करली आणि गुन्ह्याची सर्व माहिती दिली. गुन्हे शाखेने विष्णूनगर पोलिसांना याची कल्पना दिल्यानंतर, पोलिसांनी प्रभूने सांगितलेल्या खाडीकिनाऱ्यावरील ठिकाणाहून मृतदेह ताब्यात घेतला. तसेच, शवाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत केल्याच्या आरोपाखाली घरमालक संदेश म्हात्रे यालाही पोलिसांनी अटक केली आहे.
Source link
'तो' सतत स्वप्नात यायचा अन् दचकून उठायचा!:मित्राची हत्या करणाऱ्या तरुणाची पोलिसांत शरणागती; दारूच्या नशेत मित्राचाच घेतला होता जीव