![]()
मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या संघटनात्मक बांधणीसाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. राज्यातील मराठा आणि कुणबी समाजातील तरुणांसह इच्छुक नागरिकांना समाजसेवेत सहभागी करून घेण्यासाठी त्यांनी हेल्पलाईन क्रमांक जारी केला आहे. मराठा समाजातील मुलांचे भविष्य, समाजाची प्रगती आणि समाजातील एकजूट कायम राखण्यासाठी राज्याच्या प्रत्येक गावात आणि घराघरात मराठा सेवक तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. यासाठी इच्छुकांनी दिलेल्या क्रमांकावर आपली माहिती पाठवावी, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले आहे. काय आहे मनोज जरांगेंचा संकल्प? मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले की, दसऱ्याच्या दिवशीच मराठा समाजाच्या हितासाठी काम करणारी एक मोठी टीम उभी करण्याचा विचार मांडला होता. समाजातील मुलांच्या भविष्यासाठी आणि समाजाच्या प्रश्नांसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यात काम करणारे सेवक तयार व्हावेत, अशी भूमिका त्यांनी मांडली होती. त्यावेळी यासाठी संपर्क क्रमांक जाहीर करण्याचेही सांगितले होते. त्यानुसार आता मराठा आणि कुणबी समाजातील इच्छुकांसाठी हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाने समाजाला प्राधान्य दिले पाहिजे. राजकारणापेक्षा समाजहित महत्त्वाचे मानून काम करण्याची गरज आहे. मराठा समाजाची प्रगती, समाजातील लहान मुलांचे आणि तरुणांचे भविष्य तसेच समाजाची एकजूट टिकवणे, हा मराठा सेवक म्हणून काम करण्यामागचा मुख्य उद्देश असल्याचे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. उपोषण आणि सभांच्या ठिकाणी मराठा सेवकांनी सक्रिय राहावे हेल्पलाईन सुरू करण्यामागील उद्देश स्पष्ट करताना जरांगे पाटील यांनी समाजातील नागरिकांना एकत्र आणण्यावर भर दिला. मराठा समाजाच्या हितासाठी ज्या ज्या ठिकाणी उपोषणे, सभा किंवा इतर सामाजिक उपक्रम आयोजित केले जातील, त्या ठिकाणी मराठा सेवकांनी सक्रिय सहभाग घ्यावा. समाजातील लोकांना जागृत करून त्यांना एकत्र आणण्याचे काम सेवकांनी करावे, असे त्यांनी म्हटले. समाजासाठी काम करताना कोणत्याही प्रकारचा स्वार्थ मनात ठेवू नये. कितीही अडचणी आणि संकटे आली तरी प्रामाणिकपणे समाजाच्या हितासाठी काम करण्याची भूमिका प्रत्येकाने ठेवली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. हेल्पलाईन क्रमांकावर कोणती माहिती पाठवायची? मराठा सेवक म्हणून काम करण्याची इच्छा असलेल्या नागरिकांसाठी 9421292222 हा संपर्क क्रमांक जारी करण्यात आला आहे. या क्रमांकावर इच्छुकांनी आपले पूर्ण नाव, पत्ता आणि सध्या कोणते कार्य करतात, याची माहिती संदेशाद्वारे पाठवायची आहे. मात्र, या क्रमांकावर थेट फोन करू नये, असे स्पष्ट निर्देश मनोज जरांगे पाटील यांनी दिले आहेत. एकूणच, मराठा समाजातील तरुणांसह इच्छुक नागरिकांना संघटित करून समाजाच्या प्रश्नांवर काम करणारी यंत्रणा उभी करण्याचा मनोज जरांगे पाटील यांचा प्रयत्न आहे. आता या आवाहनाला राज्यभरातून किती प्रतिसाद मिळतो आणि या माध्यमातून मराठा सेवकांचे जाळे कितपत विस्तारते, याकडे लक्ष लागले आहे. हेही वाचा…… SC आरक्षणात बोगस प्रमाणपत्रांद्वारे घुसखोरी:भाजप आमदार अमित गोरखेंचा गंभीर आरोप, उपवर्गीकरणाची मागणी अनुसूचित जातींच्या (SC) आरक्षणातील उपवर्गीकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आरक्षणाचा लाभ मिळवण्यासाठी काही इतर प्रवर्गातील व्यक्तींनी नामसाधर्म्याचा फायदा घेत अनुसूचित जातींची बोगस जात प्रमाणपत्रे मिळवल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार अमित गोरखे यांनी केला आहे. अशा प्रकारांमुळे अनुसूचित जातींमधील खऱ्या अर्थाने मागास आणि अतिवंचित घटकांच्या हक्कांवर गदा येत असून, त्यांना शिक्षण, रोजगार आणि शासकीय योजनांच्या लाभांपासून वंचित राहावे लागत असल्याचे गोरखे यांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने बोगस जात प्रमाणपत्रांच्या प्रकरणांची सखोल चौकशी करावी आणि अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण तातडीने लागू करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. सविस्तर वाचा…..
Source link
मराठा बांधवांसाठी मनोज जरांगेंनी हेल्पलाईन क्रमांक केला जारी:तरुणांना मराठा सेवक होण्याचे आवाहन