Headlines

अदानींच्या फायद्यासाठी सरकारकडून पर्यावरणाची आणि सरकारी तिजोरीची उघड लूट:कराडी प्रकल्पाची मंजुरी तात्काळ रद्द करा- विजय वडेट्टीवार




अदानी समूहाच्या ऊर्जा प्रकल्पांसाठी जंगल आणि पर्यावरणाचा बळी दिला जात आहे, अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. अदानींच्या कराडी एनर्जी प्रकल्पाला परवानगी देताना पर्यावरणीय मंजुरीसाठी सुरुवातीला कमी क्षेत्र दाखवण्यात आले. १५०० मेगावॅट क्षमतेच्या या प्रकल्पाचे मूल्य ५७७५ कोटी रुपये असताना ते केवळ ५६ कोटी रुपये दाखवण्यात आले. त्यामुळे सरकारच्या तिजोरीत जमा होणाऱ्या महसुलाचे मोठे नुकसान झाल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली. नियमानुसार चार टक्के भरणा अपेक्षित असताना केवळ २ कोटी २७ लाख रुपये जमा करण्यात आल्याचे समोर येत आहे. मग उर्वरित रकमेचे काय झाले? सरकारच्या महसुलाचे नुकसान कोणाच्या फायद्यासाठी केले जात आहे? मंत्रालयातील कोणाच्या आशीर्वादाने हा प्रकार सुरू आहे? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. गाव उद्ध्वस्त करण्याचे काम सुरू ग्रीन एनर्जीच्या नावाखाली जंगल आणि गाव उद्ध्वस्त करण्याचे काम सुरू आहे. सुरुवातीला कमी जागा दाखवायची आणि अंतिम मंजुरी देताना जागा वाढवून द्यायची, हा प्रकार म्हणजे अदानींना रेड कार्पेट घालण्याचाच प्रकार आहे. या प्रकल्पासाठी वनक्षेत्र, पर्यावरणीय परिणाम आणि महसुलाचे नुकसान यांची स्वतंत्र चौकशी झाली पाहिजे. कराडी प्रकल्पासह नियमबाह्य मंजुरी दिलेल्या प्रकल्पांची चौकशी करून संबंधित मंजुरी तात्काळ रद्द करावी, अशी मागणी त्यांनी केली. ग्रीन एनर्जीच्या नावाखाली सरकारी तिजोरीवर डल्ला सरकार स्वतः वीज स्वस्तात उपलब्ध करून देऊ शकत नाही आणि दुसरीकडे तब्बल २३ रुपये दराने वीज खरेदी करत असेल, तर ही जनतेच्या पैशांची उधळपट्टी आहे. ग्रीन एनर्जीच्या नावाखाली सरकारी तिजोरीवर डल्ला मारण्याचा हा प्रकार असून यामागील आर्थिक व्यवहारांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. वनमंत्री गणेश नाईक झोपले आहेत का? राज्यात मानव-वन्यजीव संघर्ष गंभीर बनला आहे. वाघांच्या हल्ल्यात सामान्य नागरिकांचा, शेतकऱ्यांचा आणि कामगार महिलांचा जीव जात आहे. वाघ मानवी वस्त्यांमध्ये घुसून हल्ले करत आहेत,मात्र वनमंत्री गणेश नाईक झोपले आहेत का? लोकांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी सरकारकडे ठोस उपाययोजना का नाहीत? जंगलाचे रक्षण केले म्हणून नागरिकांचा गुन्हा काय? एखाद्या जंगली डुकराला मारले तरी वन विभाग दहा-दहा लोकांवर कारवाई करतो. मात्र वाघांच्या हल्ल्यात माणसे मरत असताना वन विभाग आणि सरकारची जबाबदारी कोण घेणार? लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्याऐवजी सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत आहे, अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी केली. ठोस कृती आराखडा तयार करावा एका बाजूला नागरिकांना वन्यजीवांच्या हल्ल्यापासून संरक्षण देण्यात सरकार अपयशी ठरत आहे, तर दुसरीकडे अदानी-अंबानींसारख्या उद्योगसमूहांना जंगलातील जमिनी देण्याचा सपाटा सुरू आहे. जंगल वाचवण्याच्या आणि पर्यावरण संतुलनाच्या गप्पा मारायच्या आणि प्रत्यक्षात जंगलतोडीला परवानगी द्यायची, हा दुटप्पीपणा आहे. नागरिकांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी तातडीने ठोस कृती आराखडा तयार करावा, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. राज्यात ३५४ तालुके दुष्काळग्रस्त घोषित केल्याचा सरकार गाजावाजा करत आहे. मात्र प्रत्यक्षात पंचनामे पूर्ण झाले आहेत का? किती शेतकऱ्यांना मदत मिळाली? पाच हजार रुपयांची मदत किती शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली? याची उत्तरे सरकारने द्यावीत. सिंचनाच्या सुविधा नेमक्या कुठे आहेत? पीक पाहणी आणि आणेवारी निश्चित करताना काही जिल्ह्यांमध्ये अधिकाऱ्यांवर दबाव टाकून चुकीची आकडेवारी दाखवण्यात आल्याचा संशय आहे. गडचिरोलीसारख्या जिल्ह्यात ६५ टक्क्यांपेक्षा जास्त आणेवारी दाखवली जात असेल, तर तिथे सिंचनाच्या सुविधा नेमक्या कुठे आहेत? प्रत्यक्षात पिकांचे नुकसान झालेले असताना कागदोपत्री परिस्थिती चांगली दाखवून शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवण्याचा हा प्रकार आहे असा आरोप वडेट्टीवार यांनी केला. सरकारकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम सुरू गडचिरोलीत दोन तालुके दुष्काळग्रस्त घोषित करताना सरकारने नेमके कोणते निकष लावले? दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार? शेतकरी संकटात असताना त्यांना दिलासा देण्याऐवजी त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम सरकार करत आहे. दुष्काळग्रस्त भागातील सर्व पंचनामे पारदर्शकपणे पूर्ण करून पात्र शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावर बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, या चर्चेशी आमचा काहीही संबंध नाही. काही लोकांना सत्तेशिवाय राहवत नाही. सत्तेसाठी त्यांची घालमेल सुरू आहे. मात्र निवडणुकीत जनतेने ज्या विचारांना आणि पक्षाला मतदान केले, त्या जनादेशाचा अनादर करून केवळ सत्तेसाठी वेगळ्या राजकीय भूमिकेत जाणे म्हणजे जनतेशी बेइमानी आहे. ज्यांच्या विरोधात जनतेने मतदान केले, त्यांच्यासोबत सत्तेत जाण्याची मानसिकता असेल तर तो मतदारांचा विश्वासघात आहे, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *