![]()
सेनगाव तालुक्यातील देऊळगाव जहागीर येथे पाणीटंचाईने त्रस्त झालेल्या महिला अन गावकऱ्यांनी शनिवारी ता. १४ पाण्यासाठी हंडे घेऊन गावातून घागर मोर्चा काढला. गावातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाला आठ दिवसांची डेडलाईन देण्यात आली आहे. या शिवाय नळ योजनेचे अर्धवट काम करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाईची मागणीही यावेळी करण्यात आली. देऊळगाव जहागीर या गावाचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी ५१ लाख रुपये खर्चुन जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजना करण्यात आली. मात्र लाखो रुपये खर्चुनही गावाला पाणी मिळाले नाही. एवढेच नव्हे तर अर्ध्या गावात जल वाहिन्यात अंथरण्यात आल्या नाहीत. सध्या गावात तिव्र पाणीप्रश्न निर्माण झाला आहे. गावातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी यापुर्वी गावकऱ्यांनी जिल्हा परिषदेकडे वेळोवेळी निवेदन दिले. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या महिला व गावकऱ्यांनी आज सकाळी १० वाजता रिकामे हंडे घेऊन गावातून घागर मोर्चा काढला. त्यानंतर सर्वजण गावालगत जलकुंभाजवळ एकत्र आले. यावेळी गावकऱ्यांनी सेनगाव पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला मात्र अधिकाऱ्यांकडून उडवा उडवीची उत्तरे देण्यात आली. दरम्यान, क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे, जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे यांनी या आंदोलनास पाठिंबा देऊन त्यामध्ये सहभाग नोंदविला. जलजीवन मिशनचे काम अपूर्ण ठेवणाऱ्या कंत्राटदाराची चौकशी करून त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. जलजीवन मिशनच्या कामाचा उपयोग नेमका कोणाला होत आहे, असा संतप्त सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला. या आंदोलनानंतर ग्रामपंचायत अधिकारी राजू मोरे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन आठ दिवसांत पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. ..तर यापुढील आंदोलन जिल्हा परिषदे समोर- गजानन कावरखे मराठवाडा क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष गजानन कावरखे म्हणाले की, गावात लाखो रुपये खर्चुन पाणी मिळत नसेल तर अशा कुचकामी योजना कामाच्या नाहीत. गावकऱ्यांची पाण्यासाठी भटकंती होत असतांनाही प्रशासन का दुर्लक्ष करीत आहे. आठ दिवसांत पाणी पुरवठा न झाल्यास यापुढील आंदोलन जिल्हा परिषदेसमोर केले जाईल. त्यासाठी प्रशासनाचे अधिकारी जबाबदार असतील.
Source link
देऊळगाव जहागीरमध्ये पाण्यासाठी महिलांचा घागर मोर्चा:जलजीवन मिशनचे काम अपूर्ण ठेवणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याचीही मागणी