![]()
पाटण तालुक्यात अदानी ग्रीन एनर्जीकडून 1500 मेगावॉट क्षमतेचा तारळी पंप्ड स्टोरेज प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर आणि बफर क्षेत्रात बेसुमार वृक्षतोड आणि उत्खनन सुरू आहे. त्याला पर्यावरणप्रेमींचा विरोध वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर सह्याद्री-देवराईचे प्रणेते, अभिनेते सयाजी शिंदे हे अदानी प्रकल्पाची पाहणी करून जनजागृती रॅली काढणार आहेत. सयाजी शिंदे यांनी या प्रकल्पाला विरोध करण्याचे आवाहन जनतेला केले आहे. बेसुमार उत्खनन आणि वृक्षतोडीमुळे तारळी पंप्ड स्टोरेज प्रकल्प सुरूवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडला असताना आता खर्चातील कोट्यवधींची तफावत देखील समोर आली आहे. या प्रकल्पाची सुरूवातीचा खर्च 5,675 कोटी इतका होता. प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या 4 टक्के रक्कम म्हणजेच 227 कोटी इतकी रक्कम वन्यजीव संवर्धन व संरक्षणाच्या उद्देशाने सह्याद्री व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठानच्या खात्यात जमा करणे आवश्यक असल्याचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाकडून अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडला पूर्वसूचित करण्यात आले होते. आता या प्रकरणात अत्यंत गंभीर व धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे. अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचे मुख्य कार्यकारी परिचालन अधिकारी नरेश तेलगू यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्या कार्यालयाला सादर केलेल्या पत्रासोबत 500 रूपयांच्या स्टॅंपवर नोटरी केलेले हमीपत्र सादर केले आहे. तारळी पंप्ड स्टोरेज प्रकल्पाची किंमत 5,675 कोटींऐवजी केवळ 56.75 कोटी इतकी असल्याचे नमूद केले आहे. या रकमेप्रमाणे वन्यजीव संवर्धन व संरक्षणासाठीचा निधी शंभर पट कमी होऊन फक्त 2.27 कोटी झाला आहे. निसर्गाची प्रचंड हानी आणि हा सर्व फसफसवीचा खेळ उघड झाल्यानंतर पर्यावरणप्रेमी खडबडून जागे झाले आहेत. सह्याद्री-देवराईचे प्रणेते आणि ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे हे उद्या (रविवारी) या प्रकल्पाची पाहणी करणार आहेत. त्यानंतर जनजागृती रॅली काढून जाहीर सभा घेणार आहेत.
Source link
अदानी ग्रीन एनर्जीचा 'तारळी' प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात!:सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात बेसुमार वृक्षतोड, सयाजी शिंदे काढणार जनजागृती रॅली